रविवार, १ जानेवारी, २०१२

वेडं वेड - संगीत, नाटक, चित्रपटांसाठी ...

आजपर्यंत संगीत, नाटकं, चित्रपटे, भजनं, चालू असलेले सामने (Live Games), सांघिक खेळ, गाण्यांचे कार्यक्रम, खेळणे, एखाद्या कार्यक्रमात सहभागी होणे किंवा आपल्याही समूहाचे / ग्रुपचे काही तरी असावं वगैरे वगैरे साठी खूप मरमर / धडपड केली. पण तरी हि काही गोष्टी राहूनच गेल्या - :( ... उदाहरणच द्यायचे झाले तर भीमसेन जोशी यांचे गाणे समोर बसून काही ऐकायला मिळाले नाही.

माझं बालपण सोलापूर बसस्थानकापासून ६ कि. मी. अंतरावर असणाऱ्या देगाव या गावी / खेडेगावी / ग्रामीण भागामध्ये जिथे शि** म्हंटलं कि झ** म्हंटलं जातं अशा ठिकाणी गेलं. इथे केवळ दूरदर्शनवरील शनिवारी - रविवारी होणारे चित्रपटच पाहणे व्हायचे. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे - ना मुन्ना ना ... जेंव्हा एखादा चित्रपट ५० आठवडे / २५ आठवडे पूर्ण करील तेंव्हाच सहकुटुंब सहपरिवार चित्रपट पाहणे व्हायचे. उदा: हम आप के है कौन, माहेरची साडी ... आता भावनिक स्वभाव असल्याने घरच्यांबरोबर असे चित्रपट बघताना रडून घ्यावे लागे.

मग पुढे एकदा खुष्कीच्या मार्गाने ४ ते ५ कि.मी. अंतर देगावजवळील ओढा, गवताचे वाफे पार करीत प्रेम हा संजय कपूर आणि अमरीश पुरी यांचा चित्रपट पाहिला. परत जाताना पुन्हा चालत. वरून माझ्याबरोबर असणाऱ्यांना त्यांच्या ओळखीचे कोणी पाहू नये म्हणून लपत छपत वेगवेगळ्या मार्गांनी घर गाठले होते. मला कुठून हि गेले तरी काही हरकत नव्हती. बारावीची परीक्षा संपल्यानंतर पैसे साठवून चित्रपट पाहण्यासाठी पुन्हा धडपड. एकदा तर चित्रपट गृहात आसनांचा घोळ झाल्याने मला उभे राहून चित्रपट पाहावा लागला. भांडत बसलो असतो तर चित्रपट पाहता आला नसता. पुढे एकदा रात्री ९ ते १२ वाजताचा चित्रपट पाहून झाल्यावर चित्रपट गृहातून घरी निघतोय तर माझ्या दुचाकीने हवेत पलायन केलेले होते (दुचाकी / सायकल पंक्चर झाली होती). रात्रीच्या वेळेला पंक्चर काढण्याचे किंवा हवा भरण्याचे दुकान काही सापडले नाही. मग काय एकच पर्याय - दांडी यात्रा ५ ते ५.५ कि.मी. ची ... पुढे बारामतीमध्ये शिकत असताना सोलापूर वरून बारामतीला निघालो असताना अचानक नुकताच प्रदर्शित झालेला अजय देवगणचा रामगोपाल वर्माने दिग्दर्शित केलेला कंपनी चित्रपट पाहण्याची हुक्की आली म्हणून बारामतीला जाण्याचे रद्द करून ६ ते ९ चा प्रयोग पाहून घेतला आणि आज्जीकडे देगावी मुक्काम. दुसऱ्या दिवशी बारामती.

बारामतीला असताना हि चित्रपट पाहण्याची लाख इच्छा होती पण यक्ष प्रश्न होता तो पैशांचा ... घरचे हिशोबांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, आणि भागाकार करीत तडजोड करीत पैसे पाठवत होते आणि त्यामध्ये हा असला छंद परवडणारा नाही म्हणून मुग गिळून गप्प बसणे आणि कधीतरी एखादा चित्रपट पाहणे यातच समाधान मानले.

बारावीपर्यंत व्यासपीठावर येणे कधी झालेच नाही. पण स्नेहसंमेलनाच्या वेळी मात्र गोंधळ घालण्यात पटाईत, वाटायचे साला आपण हि एखादा प्रयत्न करून पाहावा पण ते काही माझ्या हातून झाले नाही. जवळपास दरवर्षीच्या स्नेहसंमेलनांमध्ये  माझ्याबरोबर शिकत असलेल्या नीरज गोडबोले चा तबल्याचा कार्यक्रम आणि अपसिंगेकर आडनाव असलेल्या पोरीचे 'चाफा बोलेना, चाफा चालेना ...' हे गाणे ठरलेलं असायचं. यांचे खूप अप्रूप वाटायचे त्यावेळेला. पण त्यावेळेला हे साध्य कसे करायचे हे काही माहित नव्हते आणि जाऊ दे हे आपल्यासाठी नाहीच असे समजून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष्य करायचो मी.

बारामतीत शिकत असताना माझं बोलणं गावठी असल्याने काही पोरींनी मी नाटकामध्ये काम करावे म्हणून मला विनंती केली. पण माझा साफ नकार होता. आजपर्यंत कधी व्यासपीठावर आलो नाही आणि आता वगैरे वगैरे ... मग शेवटी म्हंटलं काय व्हायचं ते होऊ दे आणि त्या नाटकामध्ये काम केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते नाटक अगदी अफलातून झालं आणि त्या नाटकाला पहिलं बक्षिस मिळालं. मग तिथून नाटकांचं वेड लागलं. मग आपल्या समूहाचे / ग्रुपचे हि नाटक, नाच किंवा काही तरी असावं यासाठी धडपड, सगळ्यांना विनंत्या, आपण पण करूयात, आपण करू शकतो वगैरे वगैरे ... शेवटच्या वर्षी आपल्या समूहाचा / ग्रुपचा काहीतरी वेगळा कार्यक्रम असावा म्हणून माझ्या दहावीपर्यंतच्या हरीभाई देवकरण प्रशाला शाळेतील शिक्षकांना भेटणं झालं - पूर्वी शाळेमध्ये झालेल्या पहिला क्रमांक मिळालेल्या एका महाराष्ट्रीयन संस्कृतीवर आधारलेल्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी. हा कार्यक्रम इंग्लिश पुराण या टिपणामध्ये नमूद केलेल्या लिमये बाईंनी बसविला होता. पण त्या शिक्षिका तेव्हा पर्यवेक्षकगृहामध्ये नव्हत्या. मग हिरमुसल्या चेहऱ्याने परत बारामती.

बारामतीत असताना ठरलेले कार्यक्रम करण्यासाठी लागणारी गाणी ध्वनीमुद्रित करण्यासाठी बारामतीत बाजारपेठेत जावे लागे. मग संदीप माळवे बरोबर कधी त्याच्या गाडीवर, कधी रिक्षाने, कधी सायकलवर साधारण ४ ते ५ कि.मी. चा प्रवास. आपल्या पोरांचाही काही तरी कार्यक्रम असावा हा अट्टाहास पूर्ण करण्यासाठी हि धडपड आणि स्वखर्च. हा खर्च कॉलेजला मागायला गेलो तर दोन शिक्षकांच्या मतभेदाची शिक्षा मला - एक म्हणतोय त्या शिक्षकाला भेट आणि दुसरा म्हणतोय पहिल्याला भेट. काय हे? आणि दुसऱ्यांच्या  नाटकाचा रु. ७००० किंवा त्याहून अधिक झालेला खर्च मंजूर ... असे का? इथे झक मारायला मी न्याहारी / नाश्ता न करता चेंगटपणा करीत स्वखर्चाने धडपड करतोय तर मग माझ्याच बाबतीत असे का व्हावे?

लगान चित्रपटामधील चले चलो या गाण्यावर नाच बसवताना काही धोतरांची आवश्यकता होती. मग मी नेहमी जात असलेल्या गणपती मंदिरात ओळख झालेल्या सनातन प्रभात वाल्या काकूंकडे विचारपूस, कॉलेजपासून जवळ असलेल्या गावात ओळखीच्या सलूनवाल्याबरोबर जाऊन धोतरांची चौकशी. मग इकडून एक, तिकडून एक असे करीत करीत एक एक धोतराची जमवाजमव आणि शेवटी ऐनवेळेला दुसऱ्या एका कार्यक्रमातील मंडळींकडून धोतरांची झालेली सोय. बारामतीतील शिक्षण संपल्यानंतर असे कळाले कि मी जेव्हा वसतिगृहावर / हॉस्टेलवर पोरांना रात्रीच्या वेळेला नाटकासाठी वगैरे भेटायला जायचो तर बरेच जण अमरया आला रे म्हणून लपायचे वगैरे वगैरे ... (काय खरे काय खोटे कुणास ठाऊक ...)

बारामतीतील तिसऱ्या वर्षी फुकटची नाटकं / नृत्ये पाहण्यासाठी उपाशीपोटी ५ कि. मी. सायकल प्रवास, कधी जरा जास्तीची भूक लागली असेल किंवा सायकल चालवायचा कंटाळा आला असेल तर रिक्षाने प्रवास. एकदा असाच उपाशी पोटी एक कार्यक्रम पाहायला गेलो होतो बिना सायकलचा. कार्यक्रम पाहून झाल्यावर रात्री १२ वाजता परत राहत्या खोलीवर येणार कसा? ५ रु.त सोडेल अशी रिक्षा मिळतेय का म्हणून वाट पाहत होतो. पण तशी रिक्षा काही मिळत नव्हती. मग थोड्या वेळाने विद्या प्रतिष्ठान कनिष्ठ महाविद्यालयात काम करीत असलेल्या एका शिक्षिकेच्या पतीने कुठे जायचे आहे म्हणून विचारले आणि MIDC चौक म्हंटल्यावर ते मी सोडतो म्हणाले. मग त्यांच्या M 80 वर बसून घरी निघालो. गाडीवर जात असताना काय करतो, कुठे राहतो, मी इथे काम करतो, माझी बायको विद्या प्रतिष्ठान मध्ये इथे इथे आहे वगैरे वगैरे विचारपूस झाल्यानंतर साहेब मागे मागे सरकायला लागले आणि म्हणायला लागले कि त्या कार्यक्रमातील ती ती पोरगी मस्त होती ना वगैरे वगैरे आणि मला चिटकायला सुरुवात केली. मी तो जसजसा मागे सरकतोय तसतसा M 80 च्या कॅरेजकडे सरकत होतो आणि कधी एकदा City Inn हॉटेल येतेय याची वाट पाहत होतो. City Inn हॉटेल आल्यावर मला इथेच उतरायचे आहे म्हणून तिथेच उतरलो आणि पुढे MIDC चौकात जाणे टाळले. उतरल्यावर मनामध्ये संताप व्यक्त करीत मनामध्येच शिव्या देत त्याची आई बहिण काढत राहत्या खोलीवर गेलो. हा असा प्रकार घडल्याने यापुढची नाटके मग सायकल प्रवास करूनच पाहिली - कधी उपाशी पोटी तर कधी अर्धपोटी. आतापर्यंत ७० % नाटके हि अशीच उपाशी पोटी किंवा अर्धपोटी पाहिली.

अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षी जरनलचे सबमिशन सोडून लता मंगेशकर, सुरेश वाडकर, सोनू निगम, उषा मंगेशकर यांचा गाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी कशाची हि पर्वा न करता, चौकशी न करता पुणे दौरा. कार्यक्रम निगडीला होता. कार्यक्रम संपल्यावर जाणार कुठे? निगडी परिसरातील मला काहीच माहित नव्हते. किमानपक्षी स्वारगेट बसस्थानकापर्यंत कसे पोहचायचे, तिथे जाण्यासाठी या वेळेला बस आहे कि नाही, बस कुठून मिळते कशाचाही थांगपत्ता नाही. पोटात भुका तर लागलेल्या. मग सहाध्यायी सागर भोसले ला फोन करावा कि नको, करावा कि नको, होय नाही, होय नाही म्हणत शेवटी त्याला फोन केला. त्याच्या घरी गेल्यावर काकूंनी गरम गरम पूर्ण जेवण केलं माझ्यासाठी. याबद्दल त्यांचे आभार कसे मानावेत?

पुढे २००६ साली मला कळले कि पुण्यामध्ये दरवर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सवाई गंधर्व नावाचा शास्त्रीय संगीताचा महोस्तव होतो म्हणून ... आणि २००६ पासून मी न चुकता या महोस्तवातील श्रोतृवर्गामध्ये सामील होतोय. २००६ साली अगदी एखाद्या भुकेल्या माणसासारखा व्यासपीठापासून ६० - ७० फुटांवर बसून ऑफिसला दांडी मारून, खोटी कारणे सांगून शास्त्रीय संगीत ऐकून घेतलं. पण सवाई गंधर्व महोस्तवात भीमसेन जोशींची वयोमानामुळे तब्येत ठीक नसल्याने त्यांचे गाणे काही ऐकायला मिळाले नाही. ते अधून मधून महोस्तवाच्या ठिकाणी यायचे, ते आले कि सगळा श्रोतृवर्ग चिडीचूप, सगळ्यांचे लक्ष्य त्यांच्याकडेच, मग कला सदर करणारी व्यक्ती कलेचे सादरीकरण थांबवून भीमसेन जोशींचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे जायची वगैरे वगैरे ... आणि सगळं वातावरण काही वेळासाठी कसं भावनिक ...

पुढे पुढे सवाई गंधर्व महोस्तवासाठी पंच्याहत्तरी पार केलेल्या तरकटी माणसाबरोबर राहणं झालं. याच तरकटी माणसाला ऑफिस सोडून सवाई गंधर्व महोस्तवात सोडणं झालं. नंतर ऑफिसमध्ये काम करून मग स्वत: सवाई गंधर्वच्या श्रोतृवर्गात सामील होणे झालं. ऑफिस करीत करीत ऑफिसमध्ये व्यवस्थापक / मॅनेजर ला न सांगता ऑफिसमधून पळून जाऊन एका दिवशी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोस्तवातील  ३ - ३ चित्रपट पाहणे झालं. सलग ५ दिवस अर्धपोटी मराठी नाटकं / चित्रपट पाहणे झालं.

पुढे २४ जानेवारी २०११ ला माझ्या जुन्या संस्थेतील / कंपनीतील व्यवस्थापक / मॅनेजर यांचा फोन आला कि भीमसेन जोशी निवर्तले. खूप खूप खूप वाईट वाटलं. त्याच दिवशी मला एका लग्नाला जायचे होते आणि नंतर ऑफिसला. काय कुणास ठाऊक मी भीमसेन जोशी यांच्या अंत्यविधी वेळी गेलो असतो कि नाही. पण अगदी मनापासून सांगायचे झाले तर कदाचित गेलो हि असतो. पण का कुणास ठाऊक कि लोक काहीही माहित नसताना, समोरच्याचा स्वभाव व्यवस्थित माहित नसताना काहीही का बोलतात? त्यांच्या बोलण्याचा विषय होता - लग्न ... जे बोललं जात होतं ते अत्यंत चुकीच होतं, मला न पटण्यासारख होतं, आणि विरोधाभासी होतं म्हणून मी न जेवता लग्न आटोपत घेत ऑफिसला गेलो. ऑफिसला गेल्यावर माझी मॅनेजर म्हणाली कि, मला वाटले कि तू आज येणार नाही कारण ... (ते आम्हा दोघांना समजण्यासारखं एक मूक संभाषण होतं ... ) ... मग वाटलं कि चुकलच माझं ... मी भीमसेन जोशींच्या अंत्यविधीसाठी जायला हवं होतं ...


- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) (+ ४ १ ७ ६ ५ १ ० ६ ८ ३ ४)
शनिवार, ०१/०१/२०१२

गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

प्रवास वर्णन - तितलिस, स्वीत्झर्लंड

रविवार, ११ डिसेंबर २०११

खरं तर या आठवड्यात हिटलरच्या एके काळच्या साम्राज्यात म्हणजे बर्लिन, जर्मनीला जायचे ठरवले होते. पण व्यवस्थित माहिती न काढल्या कारणाने आणि 'जायचे' की 'नाही जायचे' या निर्णयाच्या द्वंद्व युद्धामध्ये 'नाही जायचे' या निर्णयाने बाजी मारल्याने बर्लिनला जाण्याची योजना / प्रस्ताव रद्द केला. बर्लिनचा प्रस्ताव रद्द ऐकल्याने आता कुंभकर्ण स्वरूप निद्राधीन होण्याचे ठरवल्याने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत थोडसं लिखाण करून घेतलं आणि निद्राधीन झालो. शनिवारी मध्यान्हाच्या वेळेला उठून पहिला पैसे वाचवायची कामे करून घेतली. उदा: बँकेचे सगळे व्यवहार, बँकेच्या खात्यावरील जमाखर्चाचा तपशील माहिती तंत्रज्ञानाच्या मायाजालावरून करण्यासाठीची व्यवस्था करून घेतली. यामुळे प्रति महिना ५ फ्रँक्स् वाचणार आहेत. आणि दुसरं काम म्हणजे हैद्राबादमध्ये असताना माझ्या नावावर कंपनीमार्फत झालेल्या खर्चासंदर्भातील कामे करून घेतली. (मध्यमवर्गीय जीव आहे हो, समजून घ्या ... थोड्याश्या आळसाचा जबरदस्त फटका बसण्याची शक्यता असते म्हणून आपलं ...)

अख्खा शनिवार असली कामं करण्यात आणि घरच्यांशी, ओळखीच्यांशी बोलण्यातच गेला. उद्या कुठे जायचे हे अजून काही ठरवले नव्हते. मग म्हंटलं चला तितलिसला जाऊयात. तितलिसबद्दल असं ऐकलं होतं की इथे अगदी उंचावर जाण्यासाठी ३ रोप वे बदलावे लागतात, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे, इथे हिंदीमध्ये तितलिस की पहाडीयो पे आपका स्वागत है| असे लिहिले आहे वगैरे वगैरे ... स्वीत्झर्लंड मधील सगळी पर्यटन स्थळं तेथील हवामानावर अवलंबून आहेत म्हणून पहिला माहिती तंत्रज्ञानाच्या मायाजालावर जाऊन तितलिसचे उद्याचे / रविवारचे हवामान पाहून घेतलं. सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत हवामान उत्तम (पण अति उत्तम नाही). माझा सहकारी संजय सिंगला विचारले की तितलिसला येणार का म्हणून. पण त्याची तब्येत व्यवस्थित नसल्याने तो येणार नव्हता. मग उद्या खरचं असेच हवामान रहावे अशी मनातल्या मनात इच्छा व्यक्त केली आणि झोपलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आठवड्याचे कपडे धुऊन घेतले, आवरून घेतले. वेळोवेळी हवामान पाहत होतो मी कारण उगाच हेलपाटा नको आणि पैसे वाया जायला नको म्हणून. तांदूळ संपले असल्या कारणाने तितलिसला जाताना खायला काय नेणार याचा प्रश्न पडला होता. मग पोट भरून न्याहरी करून घेतली, बरोबर ३ सफरचंद घेतले, आणि साधारण ०९:४५ ला तितलिसला जाण्यासाठी चालत रेल्वे स्थानकावर गेलो. निघायला उशीर तर केला नाही ना म्हणून हुरहूर लागली होती. स्वीत्झर्लंडमध्ये सगळ्या ठिकाणांची माहिती तुम्हाला रेल्वेस्थानकावरून मिळू शकते. २५ नोव्हेंबरपर्यंत तितलिस बंद होते आणि सध्या ते चालू आहे कि नाही हे तपासूनच मला तिकीट देण्यात आले. मी स्वीत्झर्लंडमधील अर्ध्या तिकिटाचा पास काढला असल्याने आणि माझ्याकडे बासेल शहराचा मासिक पास असल्याने माझे अर्ध्या तिकिटाच्या किमतीपेक्षा आणखी १० फ्रँक्स् वाचणार होते. पण २ ठिकाणी रेल्वे बदलावी लागणार होती. मग म्हंटलं ठीक आहे ८८ फ्रँक्स्ऐवजी ७८ फ्रँक्स् मध्ये काम होतंय आणि १० फ्रँक्स् = ५०० रु. वाचताहेत.

१०:०१ च्या रेल्वेने मी प्रवासास सुरुवात केली. उगाच घोळ / लोचे नको म्हणून योग्य त्याच रेल्वे मध्ये बसलो आहे ना हे तपासून घेतले. आता फोटो काढायला कोणी नाही म्हणून स्वतः स्वतःचे काही फोटो काढण्याचा प्रयत्न केला.

 स्वतःने स्वतःचे काढलेले फोटो

बाहेर पाहिले तर हवामान अतिशय उत्तम होते आणि असचं हवामान तितलिसला हि असावं अशी मी मनोमन पार्थना करीत होतो. १०:४० वाजता मी ऑल्टेन / Olten ला पोहचलो. ०९ मिनिटात दुसरी रेल्वे. तिथून लुझर्न / Luzern  ला ११:३० वाजता पोहचलो. इथे ३६ मिनिटे थांबावे लागले तितलिससाठीच्या रेल्वे साठी. मग चला म्हंटलं पोटातील अनावश्यक पाण्याची टाकी खाली  करून घ्यावी आणि स्वच्छतागृहाची शोधाशोध केली. है साला २ फ्रँक्स् = १०० रु. नको, म्हंटलं आता रेल्वेमध्येच. मागच्या वेळेला पॅरीस (फ्रान्स) ला जाताना पर्याय नसल्याने १.५ फ्रँक्स् = ७५ रु. विसर्जित करावे लागले होते पण यावेळेला नाही म्हणजे नाही. मग १२:०६ वाजता तितलिसकडे प्रस्थान केले. रेल्वे निघून अजून ५ मिनिटे झाली नाहीत तर हे अप्रतिम निसर्ग सौंदर्य. माझ्या जवळपासच्या आसनांवर चीनी समूह बसला होता. असं म्हणूयात कि सर्व वयोगटातला (छोटा गट सोडून) - युवा पिढी, प्रौढ पिढी, आणि म्हतारपणाकडे झुकत चाललेली पिढी. या समूहातील एक मुलगी सुंदर दिसत होती - सुंदरतेपेक्षा तिच्यामध्ये फिरण्यासाठीचा उस्ताह दाटून भरला होता. नाही तर नुसतं सौंदर्य असून काय उपयोग जर त्याला उस्ताहाची जोड नसेल तर ... आणि माझ्या मागील बाजूला दुसऱ्या दिशेला नुकतच लग्न झालेलं जोडपं बसलं होतं. नुकतच  लग्न झाल्यानंतरचं एखाद्या जोडीचं बोलणं, हावभाव, आणि इतर बाबी / गोष्टी ... अगदी तसचं ह्यांचही चालू होतं. यांच्या तोंडून मराठी आवाज ऐकला - बर वाटलं. किमानपक्षी मधुचंद्राच्या बाबतीत तरी परदेशात जाऊन मराठी पाऊल पुढे पडतंय, जरी इतर बाबतीत मागे पडत असलं तरी ... असोत ...

मग जसं जमलं तसं कॅमेऱ्याचे फोटो काढण्याचे बटण कचाकचा दाबत काही फोटो काढून घेतले. याच दरम्यान चीनी समूह अचानक रंगात आला होता. माझ्यासमोरील चीनी माणसाकडे अतिशय छोट्या अक्षरात लिहिलेलं अतिशय छोट्या आकाराच किशात सहज बसेल असं एक पुस्तक होतं. आतापर्यंत मी संग्रहालयांमध्येच अशी पुस्तके पाहिली होती. आज हे दृश्य समोर पहायला मिळाले. बरचसं अंतर गाढल्यानंतर एक बोगदा लागला आणि तो काही संपता संपेना. हा बोगदा कदाचित चढण असणारा होता. अगदी तितलिसच्या पायाथ्याजवळच्या रेल्वेस्थानकाच्या अलीकडे तो बोगदा संपला.


१२:५३ वाजता पोहचल्यावर चौकशी केंद्रात चौकशी केली आणि आईस फ्लायर / Ice Flyer चे तिकीट काढले. वरती तितलिसला पोहचल्यावर हे तिकीट वापरावे लागते. मग बाहेर आल्यावर रेल्वेमधील भारतीय जोडप्याशी बोलणे झाले. ते जोडपं मराठी निघालं. कुठले? - महाराष्ट्र - उमरगा, मी सोलापूर ... म्हणजे आम्ही जवळपास गाववालेच. सोलापूर ते उमरगा अंतर ११० कि.मी. आहे. मग थोडेफार ओळखीपाळखींवर बोलणे झाले - उमरग्याचे राजकारणी बाबा पाटील, त्यांचे भाऊ रवी पाटील हे माझ्या आईचे सख्खे आत्येभाऊ वगैरे वगैरे ...

आमचे असे बोलणे चालू असताना आम्हाला तितलिसच्या पायथ्याला घेऊन जाणारी बस आली. बसमधून तितलिसच्या पायथ्याला आलो. इथून साधारण उंची असलेले बर्फाच्छादित डोंगर दिसत होते. मग पुढे रोप वे ने आणि या प्रेमी युगुलाच्या मध्ये कबाब मी हड्डी नको म्हणून मी आपला वेगळ्या डब्यात बसलो.

रोप वे मधून निघालो रे निघालो सगळीकडे बर्फच बर्फ, बर्फांचे डोंगर, अगदी निसर्गरम्य वातावरण. मग कचाकचा काही फोटो काढून घेतले. थोड्या वेळाने या रोप वे तून उतरून दुसऱ्या रोप वे मध्ये - पुन्हा सगळीकडे बर्फ, बर्फ आणि फक्त बर्फ ... फोटो काढीत असताना अधून मधून मी यांनी हे कसे साधले असेल, भौतिक शास्त्राचा उपयोग कसा आणि कुठे कुठे केला असेल वगैरे वगैरे वर विचार करीत होतो. इथून पुढे हा रोप वे सोडून सगळ्यांसाठी एकच रोटेटर केबिन. यामध्ये रोप वे चा डबा जसजसा पुढे जातो तसतसे याचा खालचा भाग फिरत राहतो आणि तुम्हाला सभोवतालचा परिसर सर्व बाजूंनी पाहता येतो.


तितलिसला वरती पोहचल्यावर स्कीइंग / Skiing करण्यासाठी आलेले बरेच जण होते. प्रौढ, तरुण - तरुणी, लहान मुले - एकदम उस्ताही. पोहचल्या पोहचल्या आईस पॅलेस पाहून घेतले. ते पाहून झाल्यावर आम्ही तितलिसच्या मुख्य ठिकाणी गेलो. वातावरण अगदी अप्रतिम होते. मायाजालावर दाखविलेल्यापेक्षा खूपच छान होते. मग आम्ही एकमेकांचे फोटो काढून घेतले. आणि याच वेळेला मधुचंद्रासाठी आलेले आणखी एक महाराष्ट्रीयन जोडपं भेटलं आणि त्यांनी फोटो काढण्यासाठी मला विनंती केली. मग जय महाराष्ट्र ची घोषणाबाजी झाली आणि हे उमरग्याचे जोडपं आणि हे मुंबईचं जोडपं अशी ओळख पटवून देण्यात आली. मग त्यांचे २ फोटो काढले. त्यानंतर त्यांचे अचानक स्कीइंगवाल्या आकृतीकडे लक्ष्य गेले आणि इथेही फोटो काढण्याचे ठरले. मला फक्त व्यवस्थित क्लिक करायचे होते. हा फोटो काढल्यानंतर धन्यवाद! वगैरे म्हणून मुंबईचं जोडपं पुढे गेलं. आता दुसऱ्या जोडप्यालाही इथे फोटो काढायचा होता. म्हणून ते दोघे स्कीइंगवाल्या आकृतीजवळ गेल्यावर त्यांच्या ध्यानात आले कि फोटो दुसऱ्या बाजूने काढायचा आहे म्हणून. मग त्यांचा व्यवस्थित समोरील बाजूने फोटो काढून घेतला. त्यांचा फोटो काढून झाल्यावर मी पहिल्या जोडप्याजवळ जाऊन त्यांना फोटो विरुद्ध दिशेने काढला गेला आहे याबद्दल सांगितले, सगळ्यांनी हसून घेतलं, आणि त्यांचा व्यवस्थित फोटो काढला. जाता जाता अलविदा म्हणताना अतिउस्ताहामुळे असं झालं म्हंटल्यावर दोघेही स्मितहास्य करीत म्हणाले कि - स्वीत्झर्लंडला आले कि असच होणार - :)


असे फोटोसेशन झाल्यानंतर उमरगावासियांनी खाण्यासाठी घेतलं आणि मी आजूबाजूचे फोटो काढून घेतले. मग नंतर मी हि कॉफी घेऊन त्यांच्यामध्ये सामील झालो. दोघांनीही कमी प्रमाणात गरम कपडे घातले होते त्यामुळे त्यांना जरा जास्तीच थंडी वाजत होती. साहेब तर रेल्वे सुटेल म्हणून हातमोजे देखील विसरून हॉटेलवरच ठेऊन आले होते. पोरीला जरा जास्तीच थंडी वाजत होती म्हणून तिने सौम्य बिअर घेतली - वड ... पोराने कॉफी आणि पोरगी बिअर - :) ... मग मला हे गाणं आठवलं - हर किसी को नही मिलता यहा प्यार जिंदगी मे, खुशनसीब हो ... :) ... मग पुढे गप्पा मारता मारता कळलं कि हे दोघे नातेवाईक आहेत आणि हा मुलगा या पोरीचा मामा आहे आणि यांचा प्रेमविवाह आहे. नात्यातली पोरगी असल्यामुळे लग्नामध्ये काही अडचणी नाही आल्या. हा मुलगा युगोस्लावाकीया ला असतो, काही दिवसांच्या सुट्टीवर आला आहे लग्न उरकण्यासाठी  वगैरे वगैरे ...

खाणपिणं झाल्यावर आम्ही एकमेकांचे फोटो काढून घेतले.




नंतर आईस फ्लायर ४ वाजता बंद होते म्हणून आम्ही धावत धावत तिकडे गेलो. वाटेत पाहिले तर तिथे २ चित्रे होती - एक आईस फ्लायर आणि दुसरे आईस स्लेजिंग. आईस फ्लाइंग म्हणजे पुन्हा वेगळ्या पद्धतीचा रोप वे कि ज्याला डबा नाही. फक्त पाळण्यात बसल्यासारखे बसायचे आणि चक्कर मारून यायची. मला आईस स्लेजिंग करायची इच्छा होती म्हणून मी आईस फ्लायरवाल्याकडून विचारपूस करून घेतली तर तो म्हणाला कि आईस स्लेजिंग खाली जाऊन दुसऱ्या रोप वे स्थानकावरून करता येते आणि ते हि ४ वाजेपर्यंतच चालू असते. तुम्ही वेळेअभावी दोन्हीपैकी एक करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला आईस स्लेजिंग करायचे असेल तर लवकर निघा. घाई करून आम्ही रोटेटरने रोप वे च्या दुसऱ्या स्थानकावर गेलो आणि तिथे रोटेटरच्या स्त्री चालकाकडे चौकशी केली तर असे कळाले कि, "आईस स्लेजिंग बंद आहे. आईस स्लेजिंगसाठी बर्फाचा जाड थर लागतो आणि तो अजून तयार झालेला नाहीये. आम्ही बर्फाची आतुरतेने वाट पाहत आहोत." मग तिने तेथील इतर ओळखीच्यांना विचारून आईस स्लेजिंगबद्दल विचारपूस केली आणि आईस फ्लाइंग करून १२ फ्रँक्स् वाचवण्याचा सल्ला दिला. या गडबडीत मी उमरागावासियांना अलविदा करू शकलो नाही आणि त्याच रोटेटरने परत वरती गेलो.

वरती पोहचल्यावर पळत पळत आईस फ्लायरजवळ गेलो आणि आईस फ्लाइंगचा अनुभव घेतला. पुन्हा बर्फाच्छादित डोंगर अगदी जवळून पाहत होतो. स्कीइंग करणारी लहान मुले, त्यांचा उस्ताह, त्यांचे कौशल्य हे सगळं काही मी न्याहाळत होतो. आईस फ्लायरमधून उतरल्यावर जवळच एक दगडी सुळका होता तो जणू काही निसर्गाला वाकोल्या दाखवत होता कि मला बर्फाने बुजवून दाखव ना ... मग खाली उतरल्यावर जवळपासच निसर्ग सौंदर्य पाहून घेतलं आणि एका ब्राझील पर्यटकाकडून काही फोटो काढून घेतले. ४ वाजता आईस फ्लायर बंद होते म्हणून ०३:५५ ला मी आणि ब्राझीलवाला पर्यटक भारत आणि ब्राझीलबद्दल गप्पा मारत परतीच्या मार्गाला लागलो. वाटेत पुन्हा काही फोटो काढून घेतले. रोटेटरकडे जाताना एक चीनी समूह दिसला. सगळ्यांमध्ये उस्ताह अगदी दाटून भरलेला होता. मस्त वाटलं - फिरायला येणाऱ्या प्रत्येकाकडे किमानपक्षी असा उस्ताह असावा असं वाटतं मला. मग त्यांना त्यांचा बर्फामध्ये उड्या मारतानाचा फोटो काढून देऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.



रोटेटरजवळ आलो तर सगळीकडे चीन आणि भारतच दिसत होता. जिकडे जावे तिकडे चीनी लोक पर्यटन स्थळी भरभरून दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा चलनाचा दर पाहिला तर १ युरो = ८ युआन (चीनी चलन). मग वाटलं कि कदाचित हेच कारण असावे.

मग भारतीय समूहाशी बोलणं झालं. हा समूह भारतीय सरकारतर्फे प्रदूषण नियंत्रणाचा अभ्यास करण्यासाठी आला होता. माझ्यासमोर त्यांनी त्यांच्या समूहाचे काही फोटो काढले. पण कुणीच हसत नव्हते आणि कुणामध्येही उस्ताह जाणवत नव्हता. मग गप्पा मारता मारता मी इथला, मी तिथला अशी विचारपूस झाली. त्यांच्यातील एक जण मुंबईचे होते. मी सोलापूर, महाराष्ट्र म्हंटल्यावर ते मुंबई से आया मेरा दोस्त म्हणून जोरात ओरडले आणि सगळ्यांना सांगायला लागले. त्यांनी त्यांच्या स्वीत्झर्लंडमधील गाईडला देखील माझ्याबद्दल सांगितले. हे सगळं झाल्यावर मी त्यांना म्हंटलं कि एक फोटो काढायचा आहे आणि सगळ्यांनी हसलं पाहिजे. फोटो काढताना हसा म्हंटलं कि सगळ्यांनी चेहरे खुलवले, मुंबईचे काका तर एकदमच जोश मध्ये होते.



०४:१५ - ०४:३० नंतर सूर्य मावळायला लागल्यावर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. मग पुन्हा संध्याकाळच्या वेळेचे निसर्ग सौंदर्य पाहत आम्ही खाली निघालो. रोप वे च्या दुसऱ्या स्थानकावर जिने मला आईस स्लेजिंग बद्दल स्वतः चौकशी करून सांगितले होते तिला पुन्हा एकदा धन्यवाद! म्हणून तिला विनंती करून तिचा फोटो काढून घेतला. मग रोप वे बदलत बदलत निसर्ग सौंदर्य पाहत पाहत फोटो काढत तितलिसच्या पायथ्याला आलो. खाली येताना माझ्या रोप वे च्या डब्यात एक भारतीय होता. तो ६ वर्षांपासून लंडन, इंग्लंड मध्ये आहे. भारतीय असून देखील साहेब हिंदी / मराठी काही बोलायला तयार नव्हते. इंग्लिश एके इंग्लिश! मी त्याच्याशी हिंदीमध्ये बोलतोय पण साहेबांचे उत्तर मात्र इंग्लिशमध्येच. चेहऱ्यावरून तरी मराठी वाटत होता पण म्हंटलं उगाच कशाला चांभार चौकश्या?, जाऊ देत, उसकी जिंदगी ही, ओ कैसे भी जिये|


पायथ्याला आल्यावर ब्राझील पर्यटकाचा व भारतीय समूहाचा निरोप घेतला आणि घराच्या परतीच्या वाटेला लागलो. बसने रेल्वे स्थानक, रेल्वे लागलेलीच होती, आत जाऊन बसलो. माझ्या सीटच्या समोरील बाजूस 'F' लिहिले होते.शेजारच्याला विचारले स्त्रियांसाठी राखीव का? NO, NO way. Till date NO. At least NOT in Switzerland. हा शेजारचा आईस स्कीइंगचा शिक्षक होता. तिथून लुझर्नला आलो. लुझर्नकडे जाताना बोगद्यातून गाडी खूपच सावकाश जात होती - एवढी सावकाश कि सायकलवालाही तिला सहज गाठू शकेल. येताना हि याच रेल्वेने आलो होतो पण येताना लागणाऱ्या आणि जाताना लागणाऱ्या वेळांमध्ये १३ मिनिटांचा फरक होता.

लुझर्नला पोहचलो रे पोहचलो कि ३ मिनिटात बासेलची रेल्वे होती. मी आईस स्कीइंगच्या शिक्षकाला रेल्वेबद्दल विचारून घेत होतो तर तो म्हणाला कि मलाही तिकडेच जायचे आहे म्हणून मी त्याच्याबरोबर निघालो. तो म्हणत होता कि ३ मिनिटात बासेलची रेल्वे निघणार आहे पण मला काही हि माहिती कुठेच दिसायला तयार नाही आणि रेल्वे कुठे लागलीय हे हि कळायला तयार नाही. तो म्हणतोय तर चला त्याच्या मागे. जर हि रेल्वे चुकली तर २० ते ३० मिनिटे थांबावे लागणार होते. स्कीइंगच्या शिक्षकाकडे स्कीइंगचे भरपूर सामान होते आणि त्याची बॅगदेखील होती. आम्ही चालत चालत रेल्वेकडे निघालो होतो आणि एका मिनिटात रेल्वे सुटणार होती. म्हंटलं तुझी बॅग दे माझ्याकडे आणि चल पळत पळत. मग पळत पळत जाऊन रेल्वे पकडली, आम्ही रेल्वे मध्ये चढलो रे चढलो कि रेल्वे निघाली. पण मला शंका होती कि मी योग्य त्या रेल्वे मध्ये बसलोय कि नाही म्हणून. कारण माझे तिकीट ठराविक रेल्वेमध्येच चालणार होते. जाऊदेत म्हंटलं, बघुयात काय होते ते (जरा घाबरतच बर का ...). मग तिकीट तपासणारा आला, त्याला तिकीट दाखवले तर त्याचे काही समाधान होईना. त्याने आणखी काही तिकिटे आहेत का म्हणून विचारल्यावर मी सगळी तिकिटे, रेल्वेचे हाफ कार्ड, बासेलचा मासिक पास अशी सगळी तिकिटांची मालमत्ता दाखवली पण त्याचे काही समाधान झाले नाही. याचे कारण होते मी माझ्या तिकिटासाठी योग्य असणाऱ्या रेल्वेमध्ये बसलो नव्हतो जरी ती रेल्वे बासेलला जाणारी असली तरी. तिकीट तपासणाऱ्याने मला माफ केले आणि दंड केला नाही. जर तिकीट काढले नसेल तर इथे ९० फ्रँक्स् = ४५०० रु. दंड आहे. वाचलो म्हंटलं. २० ते ३० मिनिटे वाचली, ९० फ्रँक्स् वाचले, आणि वाटेत रेल्वे बदलायचे कष्ट आणि वेळ वाचला. मग गप्पा मारता मारता स्कीइंगच्या शिक्षकाचे रेल्वेस्थानक आल्यावर तो निघून गेला. तो जाताजाता त्याच्याकडून इथे रेल्वेचा वार्षिक आणि सहामाही पास असल्याचे कळाले. तो गेल्यानंतर शांत बसून अधून मधून दुसऱ्या बाजूला बसलेल्या सुंदर मुलीकडे पाहत पाहत रात्री ०७:५० ला बासेलला पोहचलो आणि मग चालत घरी.

- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) (+ ४ १ ७ ६ ५ १ ० ६ ८ ३ ४)
शनिवार, ३१/१२/२०११

पहिल्या परदेश प्रवासातील एक खेददायक अनुभव ...


येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही हा लेख इंग्लिशमध्ये Disappointing Experience in my first Foreign Travel या ठिकाणी वाचू शकता.


जून २०११ पासून परदेशात जाऊन काम करण्याची संधी मिळणार याबाबत चर्चा चालू होती. पण कुठे जायचे आहे, कधी जायचे आहे याबद्दल कुणालाही काहीच माहिती नव्हती आणि शेवटी जूनच्या शेवटाला ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात त्या स्वीत्झर्लंडला जायचे आहे असे ठरले. पण कधी जायचे आहे हे काही ठरत नव्हते आणि व्यवस्थापक /  मॅनेजर लोकांच्या नुसत्याच बड्याबड्या बाता असे काहीसे वातावरण निर्माण झाले होते.

आणि ही बातमी मी काम करतो त्या संस्थेतील /  कंपनीतील माझ्या विभागामध्ये मी या संधीबद्दल कुणाशीही बोललेलो नसताना वाऱ्यासारखी फैलावली होती. बातमी इतकी फैलावली होती कि कुणाला कामकाजाबद्दलचे किंवा साधेसे इ-पत्र पाठवले तर त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये परदेशातील कामाबद्दलच्या संधीबद्दल विचारपूस - कधी जाणार आहेस?, कब जा राहे हो?, कब उड रहे हो?, तो ऑनसाइट /
onsite गेला वगैरे वगैरे ... कुणाशी बोलायला जावे तर या संधीबद्दल एखादे वाक्य ठरलेलेच. तसे पाहता ०१ ऑगस्ट २०११ पासून स्वीत्झर्लंडमधून काम सुरु करायचे ठरले होते पण जुलै उजाडला तरी गाडी / विमान काही पुढे ढकलले जात नव्हते. मग शेवटी अक्षरशः या संधीबद्दल विचारही सोडून मी आधीच ठरलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स / Valley of Flowers , गढवाल, उत्तराखंड, आग्रा सहलीला गेलो.

२३ ऑगस्ट २०११ ला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स कडे जाणाऱ्या गढवाल / उत्तराखंड मधील श्रीनगर जवळच्या घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे आम्हाला घाटामध्येच उघड्यावर मुक्काम करावा लागला होता आणि त्याच वेळेला  आमच्या विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापक /  मॅनेजरचा २ महिन्यांसाठी हैद्राबादमध्ये जोपर्यंत तुमचे विझा /
VISA चे काम होत नाही तोपर्यंत काम करावे लागणार आहे आणि जर आपण हैद्राबादमधून काम सुरु केले नाही तर आपल्याला मिळालेले काम (प्रोजेक्ट) आपल्या हातून जाणार आहे. या २ महिन्यांमध्ये तुम्ही कंपनीच्या खर्चाने तुमच्या खाजगी कामासाठी घरी जाऊ शकता वगैरे वगैरे ... तर तू तयार आहेस का? हे ऐकून झाल्यावर मी सांगितले की उद्या सकाळपर्यंत विचार करून सांगतो. मग भ्रमणध्वनी / Mobile वरून यासंदर्भातील इ-पत्र वाचलं आणि खरचं प्रोजेक्ट हातातून जाण्याची शक्यता होती म्हणून हैद्राबादमधून २ महिन्यांसाठी काम करण्याचे मान्य केले.

व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या सहलीवरून आल्याआल्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे ०४ सप्टेबर २०११ ला हैद्राबादमध्ये कामासाठी रुजू झालो. हैद्राबादमध्ये पोहचलो रे पोहचलो तर विझा / VISA मंजूर झाल्याचे इ-पत्र आलेले. मग आमच्या व्यवस्थापकीय मंडळींना विझा / VISA आलेला आहे, परत पुणे कधी? याबद्दल विचारले तर साले एकही जण उत्तर द्यायला तयार नाही, परदेशगमन कधी याबद्दलही काही वाच्यता नाही. मी आणि माझा सहकारी संजू बाबा ने पण केला होता की ३१ ऑक्टोबर २०११ नंतर एकही दिवस हैद्राबादमध्ये राहायचे नाही म्हणून ... दिढ महिना काम झाल्यानंतर ऑक्टोबरच्या मध्यामध्ये परदेशगमनाबद्दल इ-पत्रांवर इ-पत्रे पाठविल्यानंतर परदेशगमनाची पानं हलायला लागली आणि ३० ऑक्टोबर २०११ ला मुंबईवरून स्वीत्झर्लंडला निघायचे आहे असे ठरले.

मग दिवाळीच्या दरम्यान घरच्यांनाच दिवाळीसाठी पुण्याला बोलावून घेतले. त्याच दरम्यान आमचे सोलापूरचे मित्र विवेक बुधतराव आणि माझे जुन्या संस्थेतील / कंपनीतील व्यवस्थापक /
मॅनेजर रविंद्र फुलमामडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली थंडीचे कपडे खरेदी करून बॅगा भरून घरच्यांचा निरोप घेऊन मी ३० ऑक्टोबरला पुढील प्रवासासाठी के.के.ट्रॅव्हल्स च्या गाडीतून पुण्यातून मुंबईला प्रस्थान केले.

लुफ्थान्झा विमानामध्ये २३ किलोची एक चेक-इन बॅग आणि ८ ते १० किलोची एक केबिन बॅग नेण्याची परवानगी होती. पण माझ्या बॅगांचे वजन अनुक्रमे २३.५ आणि १४ किलो झाले होते त्यामुळे विमानतळावर सामान फेकून तर द्यावे लागणार नाही ना याची चिंता लागून राहिली होती. पण तसे काही झाले नाही.

मी साधारण रात्रीच्या ०८:४५ ते ०९:०० च्या दरम्यान विमानतळावर पोहचलो आणि संजू बाबाची वाट पहात बसलो. के.के. ट्रॅव्हल्स मधील सहकारी लविन गोपवाणी ने माझ्या भ्रमणध्वनीवरून त्याच्या आईला फोन करून सुखरूपपणे मुंबई विमानतळावर पोहोचल्याचे सांगितले आणि आम्ही आमच्या जोडीदारांची वाट पहात बसलो.

 थोड्या वेळाने संजू बाबा आणि तो आत येत असतानाच मागून माझे जुन्या कंपनीतील व्यवस्थापक / मॅनेजर साहेब. मग तिघांनी मिळून बॅगा चेक-इन करून घेतल्या, सिक्युरिटी चेक-इन करून टर्मिनल २ वर विमानाची वाट पाहत बसलो. त्याआगोदर लविनचा भ्रमणध्वनी बंद असल्याने त्याच्या आईला काळजी लागली होती त्यामुळे काकूंनी मला फोन करून तो कुठेय, पोहचलाय ना व्यवस्थित, आज तो असा का करतोय, त्याचा फोन लागत नाहीये, त्याला मला फोन करायला सांग, मला खूप काळजी वाटतेय त्याची वगैरे वगैरे ... खूप भावनिक होऊन म्हणत होत्या त्या (आईची माया, काळजी ... पोरगं कितीही मोठं झालं तरी तिच्यासाठी ते छोटं बाळच ठरत ...). मग इमिग्रेशन / Immigration च्या आगोदर लविनला त्याचा फोन लागत नव्हता म्हणून SMS करून घरी फोन करण्याबद्दल सांगितले आणि सिक्युरिटी चेक-इन करून घेतलं. गोपवाणी काकू खूपच काळजी करीत होत्या म्हणून सिक्युरिटी चेक-इन झाल्यानंतर गोपवाणी काकूंना फोन करून लविनशी संपर्क झाला का म्हणून विचारून घेतले. बोलताना त्यांनी Thank you so much for your help and GOD bless you! असा आशीर्वाद दिला.

रात्री १२:४५ वाजता आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि आपापल्या विमानांकडे निघालो. विमान हे भलं मोठं - ३ रंग होत्या | २ | | ४ | | २ | च्या ... आतापर्यंत भारतातल्या भारतात विमानाने प्रवास झाला होता त्यामुळे एवढे मोठे विमान आतून पाहणे झाले नव्हते. ती हि हौस फेडून झाली यावेळी. विमानामध्ये तरुण आणि वयोवृद्ध हवाई सुंदरी होत्या तसेच विमानातली व्यवस्था देखील अगदी पद्धतशीर - आपण किती उंचीवर आहोत, अजून किती वेळ प्रवास राहिला आहे, विमान कोणत्या मार्गाने जात आहे वगैरे वगैरेची माहिती, सीटच्या समोर छोटासा टीव्ही असं सगळं काही व्यवस्थित होतं. भारतीय वेळ ऑक्टोबर महिन्यापर्यंत जर्मनी आणि स्वीत्झर्लंडच्या वेळेच्या ०३:३० पुढे आहे. पण विमानामध्ये मी जेंव्हा म्युनिकला पोहचण्यासाठी उरलेल्या वेळेची भारतीय वेळेत बेरीज-वजाबाकी करीत होतो तेंव्हा ०४:३० तासांचा फरक येत होता आणि काही तरी लोचा आहे किंवा काही तरी लोचा होत आहे असे वाटत होते.

माझ्या शेजारी स्वीत्झर्लंडमधील झ्युरिक शहरातील एक प्रेमी युगुल बसलं होतं. म्युनिकला पोहचायला २० मिनिटे राहिली असताना मी त्या जोडीशी म्युनिकमधील हवामानाबद्दलची विचारपूस करण्यासाठी म्हणून बोलायला सुरुवात केली जेणेकरून विमानातून बाहेर पडताना किती गरम कपडे घालावे लागतील याची कल्पना येईल म्हणून. मग त्यांच्याकडून बऱ्यापैकी माहिती मिळाली. हे जोडपं नुकतचं भारतभ्रमंती करून आलं होतं आणि त्यांना भारत आवडला देखील होता. मग २० मिनिटे आम्ही छान गप्पा मारल्या - ते म्हणत होते की स्वीत्झर्लंडची लोकसंख्या ६० लाख आणि एकट्या मुंबईची लोकसंख्या ६ कोटी, खूप वेगळं वाटत होतं, राजस्थान, दिल्ली मधील पर्यटन स्थळे वगैरे वगैरे ... मी ही माझे गाव सोलापूर, मुंबईपासून एवढ्या एवढ्या अंतरावर आहे, इथे अशी अशी ठिकाणे आहेत वगैरे वगैरे माहिती सांगितली.

माझ्या नेहमीच्या प्रत्येक भाषेतील २ - ४ शब्द शिकून घेण्याच्या सवयीप्रमाणे त्यांच्याकडून जर्मन भाषेतील २ - ४ शब्द शिकून घेतले.

English
German
Respectful Hello
Grüezi (Used in Switzerland and border of German)
Good Morning
Guten Morgen
Thank you
Danke

त्यांच्याशी बोलताना मस्त वाटले आणि नंतर असे जाणवले की जरा लवकर बोलायला सुरुवात करायला हवी होती म्हणजे आणखी मजा आली असती. तो मुलगा स्वीत्झर्लंडमधील चित्रपट निर्माता होता आणि आतापर्यंत त्याने १७ - २० लघुचित्रपटांची निर्मिती केली होती. मग आम्ही एकमेकांचे इ-संपर्क दिले आणि साधारण ०७:०० वाजता आम्ही म्युनिकला पोहचलो. तुम्ही झ्युरिकला येण्याआगोदर आम्हाला इ-पत्र पाठवा मग आपण मिळून फिरुयात असे म्हणून त्यांनी आमचा निरोप घेतला.

३० ऑक्टोबरला युरोपमध्ये दिवसाचा जास्ती वेळ कामासाठी मिळावा म्हणून (Day Light Saving) घड्याळे एका तासाने मागे घेतली जातात पण म्युनिक विमानतळावर घड्याळ एका तासाने मागे घेतलेले नव्हते. त्यामुळे आम्हाला विमानतळावर पोहचूनही १० मिनिटे विमानतळावरच बसावे लागले. (उशीर होण्याचे विमानातील कर्मचाऱ्यांनी सांगितलेले कारण. तुम्हाला कदाचित याचे आश्चर्य वाटेल पण आहे ते आहे.). म्युनिकवरून स्वीत्झर्लंडला (बासेल / Basel शहर) २ तासाने विमान असल्याने आम्ही सिक्युरिटी चेक-इन करून विमानाची वाट पाहत बसलो.

संजू बाबाने Airtel ला रेंज येते का, Airtel चे सिमकार्ड चालते का, आणि किती रक्कम बाकी आहे पाहण्यासाठी म्हणून २ SMS करून पाहिले तर रु. ५० ला बांबू. १ SMS - रु. २५. विमानतळावरून घरी फोन करण्याचे काही आम्हाला जमले नाही म्हणून घरी SMS करून कळवले आणि २ तासाने स्वीत्झर्लंडकडे प्रस्थान केले. प्रवासामध्ये शिकलेल्या जर्मन शब्दांचा वापर करीत आणि समोरच्यांचे स्मितहास्य पाहत पाहत प्रवासास सुरुवात केली. स्वीत्झर्लंडला (बासेल / Basel) जाणारे हे विमान अगदी मोकळे होते - बोटांवर मोजण्याइतके लोक.  बासेलला पोहोचेपर्यंत सगळं काही व्यवस्थित चालू होतं आणि भरपूर उस्ताह होता. पण बासेलच्या विमानतळावर पोहचल्या पोहचल्या आतापर्यंतच्या सुखरूप आणि उस्ताही प्रवासाला नजर लागावी त्याप्रमाणे किंवा त्यावर काळा डाग पडावा या पद्धतीने लोचे सुरु झाले.

बासेलच्या मस्त थंडीमध्ये विमानातून प्रचंड उस्ताहामध्ये खाली उतरत असताना आणि तिथून विमानतळाकडे जात असताना माझे लक्ष्य जिथे विमानातून प्रवाशांचे सामान बाहेर काढले जात होते तिकडे गेले. तेंव्हादेखील तोच उस्ताह होता पण नेमके जेंव्हा माझे लक्ष्य विमानातून एक काळी "American Tourister" कंपनीची चैन तुटलेली बॅग काढून प्रवाशी सामानाच्या गाडीमध्ये ठेवली जात होती तिकडे गेले तेंव्हा मात्र माझ्या मनात "च्याआयला, ही बॅग माझी तर नाही न?" पाल चुकचुकून गेली. "असोत, ती बॅग माझी नसेल / नसावी " असे म्हणून विमानतळाकडे निघालो. संजू बाबाने विमानामध्ये एका जर्मन नागरिकाकडून आम्हाला जायच्या पत्त्याबद्दल बऱ्यापैकी माहिती काढली होती आणि त्या नागरिकाने त्याच्या मोबाईलवरून आवश्यक त्या व्यक्तींना फोन करण्यास स्वतःहून परवानगी दिली होती. पण योगायोगाने विमानतळाकडे जाताना आम्हाला इन्फोसिस / Infosys मधील एकाने त्याच्या मोबाईलवरून आम्हाला आवश्यक त्या व्यक्तींना फोन लावून दिला पण रविवार असल्याने स्वीत्झर्लंडमधील व्यावसायिक पद्धती / संस्कृती प्रमाणे सगळ्यांनी त्यांचा मोबाईल वॉइस मेल / Voice Mail वर ठेवला होता ... हाय रे पंचाईत. २ -३ वेळा फोनचा प्रयत्न झाल्यावर सामान घेण्याच्या जागी गेलो आणि ती चैन तुटलेली अर्धवट उघडी बॅग पुन्हा मला दिसली आणि उघडून पाहतो तर ती बॅग माझीच होती. कालच विकत घेतलेल्या बॅगची अशी अवस्था ... मग तिला प्रेमाने बाहेर घेतले आणि सामानाची पडताळणी करण्यास सुरुवात केली.

बॅगच्या चैनची झिप मध्येच आणून सोडली होती आणि बॅग अर्धवट म्हणण्यापेक्षा उघडीच होती असे म्हंटलं तर वावगे ठरणार नाही. सामान उघडून पाहतो तर तांदळाची पिशवी फाटलेली, अर्धे तांदूळ गायब, डिओचे टोपण तुटलेले, रव्याची पिशवी फाटलेली, सामान अस्ताव्यस्त ... हे बॅगचे असे अस्ताव्यस्त सौंदर्य पाहून झाल्यावर चैन दुरुस्त होते का ते पाहिले, चैन कशीबशी बसली आणि थोडेसे हायसे वाटले. हे सगळं पाहून मी जरा नाराजच झालो. जर संशय आलाच असेल तर सामान तपासणे - अगदी मान्य, सामान ठेवताना थोडेफार अस्ताव्यस्त होणे - हे ही अगदी मान्य. पण किमानपक्षी बॅगची चैन आणि बॅग बाह्यरुपी तरी व्यवस्थित मिळावी अशी माझी अपेक्षा होती / आहे. तसे पाहता विमानतळावर चेक-इन बॅगची दृष्टी परिक्षा / scanning होतच असेल आणि तरीसुद्धा असे?

"असोत ... झाले गेले होऊन गेले" असे म्हणून मी नाराजी लपविण्याचा प्रयत्न करीत होतो आणि झाल्या प्रकाराबद्दल कसल्याही परिस्थितीत विमानतळावर जाब विचारायचाच हा विचार माझ्या मनात घोळत होता. आणि या सगळ्यात आणखी भर म्हणून की काय आवश्यक त्या व्यक्तींशी संपर्क होत नव्हता. मग पुन्हा एकदा इन्फोसिस च्या व्यक्तीकडून फोन लावण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा तोच अनुभव. शेवटी त्याला आवश्यक त्या व्यक्तीला SMS करायला सांगितले आणि त्यांचा निरोप घेतला. लुफ्थान्झाचे ऑफिस कुठे आहे, बाहेर कुठून पडायचे याची विचारपूस करायला लागलो तर सगळेच जर्मन बोलणारे. मग कसेबसे बाहेर कसे पडायचे याचा अंदाज बांधून आम्ही सिक्युरिटी-चेक च्या परिसरातून बाहेर पडलो. बाहेर गेल्यावर चौकशी केंद्रामध्ये चौकशी करून घेतली - फोन बुथ कुठे आहे, विमानतळावर नवीन SIM मिळते का, SIM चे दुकान कुठे आहे, लुफ्थान्झाचे ऑफिस कुठे आहे वगैरे वगैरे ... या सर्व प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तरे मिळाल्यावर मग घरच्यांना सुखरूप पोहोचल्याचे सांगण्यासाठी म्हणून फोन करण्याचा प्रयत्न केला तर ते काही जमेना. त्या फोन मशीनमध्ये फक्त क्रेडीटकार्डच चालत होते आणि मी HDFC च्या प्रीपेड कार्डने प्रयत्न करीत होतो. मी घरच्यांना बासेलला पोहचण्याची वेळ ०३:३० तासांच्या फरकाने सांगितली होती पण आजपासून ०४:३० तासांचा फरक झाला होता आणि विमानतळावर अर्धा तास झाला होता त्यामुळे घरचे अतीव काळजी करीत असतील म्हणून मला कसल्याही परिस्थितीत घरी सुखरूपपणे पोहोचल्याचे कळवायचे होते आणि त्यासाठी माझी धडपड चालू होती. पुन्हा प्रयत्न केला पण पुन्हा अपयशी. ही धडपड चालू असताना बासेलवरून इंग्लंडला निघालेल्या श्रीलंकन पोराने आम्हाला मदत केली आणि आम्हाला आवश्यक त्या व्यक्तीला फोन लावून दिला. योगायोगे यावेळी आमचा फोन लागला. आम्ही बासेलमध्ये पोहोचल्याचे सांगून आम्हाला मिळालेल्या घराच्या चावीची सोय करण्यास सांगून आम्ही पुढील कामास सुरुवात केली. हा संपर्क झाल्याने थोडेसे हायसे वाटले. पण या सर्व गडबड गोंधळात मी स्वीत्झर्लंडमधील आवश्यक त्या व्यक्तींची संपर्क माहिती असणारा कागद आणि एक चांगला पेन फोनबुथवरच विसरलो.

आता संपर्क साधून झालाच आहे तर बॅगच्या अवस्थेबद्दलचा जाब विचारण्यासाठी माझी धडपड सुरु झाली. पुन्हा चौकशी केंद्रावर जाऊन चौकशी केली तर तिथे असलेल्या फोनवरून तुम्ही फोन लावा असे सांगण्यात आले. फोन लावून झाल्या प्रकाराबद्दल सांगितल्यावर त्यांनी मला ऑफिसमध्ये येण्यास सांगितले. पण ऑफिसमध्ये कुठून आणि कसे जायचे हे काही मला कळले नाही आणि बोलतानाही जर्मन-इंग्लिशचा लोचा. मग शेजारच्या कॅफेमध्ये विचारले तर पुन्हा जर्मन-इंग्लिश लोचा, पुन्हा चौकशी केंद्र, पुन्हा फोन वगैरे वगैरे ... पुन्हा फोन करून आम्ही कसेबसे ऑफिसमध्ये पोहचलो. तिथे जाऊन झाल्या प्रकाराबद्दल सांगितले तर - जर सामान खराब झाले असेल तर आम्ही तक्रार नोंदवू शकतो पण सामान गायब झाले असेल,  बॅग खराब झाली असेल तर पोलिसांकडे तक्रार करावी लागेल आणि तुम्हाला तक्रार करायची असेल तर पोलिसचौकी इथे इथे आहे. तुम्ही झाल्या प्रकाराबद्दल लुफ्थान्झाकडे या या संपर्कावर इ-पत्र पाठवू शकता. आता नवीन ठिकाणी पहिल्याच दिवशी पोलीस तक्रार आणि परत नवीन आफत ओढवून घेण्यापेक्षा इ-पत्र पाठवून काय होते का ते पाहूयात असे ठरवून धन्यवाद / Danke / Thank You म्हणून आम्ही तेथून निघालो.

विमानतळावर उतरल्यापासून सगळीकडे सामसूम होती. त्यात आज रविवार म्हणून विमानतळावरील दुकानेदेखील बंद होती. ही सर्व नाराजी पत्करून विमानतळावरून बाहेर पडून  पाहतोय तर टॅक्सी होत्या खऱ्या पण सगळे ड्रायव्हर गायब. हाय रे देवा! मग पुन्हा आम्ही विमानतळाकडे जाऊन एका धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीस विचारले तर हे महाशयच टॅक्सी ड्रायव्हर होते. त्याच्याशी बोलताना पुन्हा जर्मन - इंग्लिश लोचा. त्याला पत्ता दाखवला आणि सोड बाबा इथे म्हंटलं. काही वेळातच ५ -७ कि.मी. अंतरावर असलेल्या सांगितलेल्या जागी आम्ही पोहचलो. ज्या रत्याने आम्ही जातोय तो रस्ता पहिला तर - है साला, सामसूम, रस्त्यावर कुत्रदेखील नाही. च्यामारी, भारतामध्ये एखादा संप / कर्फ्यू / Curfew असेल, राजीव गांधी मेला होता तेंव्हा, किंवा मयत झालेल्या घराजवळ सुद्धा एवढी सामसूम नसेल असे जाणवले.

सांगितलेल्या पत्त्यावर पोहचल्यावर घराचे आणि घरभाडयाचे काम करणारी प्रतिनिधी / एजंट / Agent तिथे हजर होती. आम्ही पोहचल्या पोहचल्या - "Sorry, I thought you will come by …" वगैरे वगैरे ... मग सगळं सामान घेऊन घरामध्ये गेल्यावर तिने घराबद्दल माहिती दिली - हे असे आहे, हे तसे आहे, हे असे असते, हे तसे असते वगैरे वगैरे ... ह्या बयेच २ - ३ वाक्ये झाली कि हसणं चालू असायचं तसेच प्रत्येक गोष्टीत घाई घाई घाई. एखादी वस्तू दाखवताना ती तुटेल, खराब होईल याचा विचार न करता निष्काळजीपणे इकडे तिकडे हलवणे आणि वरून हसणे. हसण्याबद्दल विशेष वाटलं मला. हसत राहणं आवडलं मला.

घरातील मायाजाल / Internet चालू होत नव्हते. हे मायाजाल म्हणजे जणू काही आम्हाला शापच आहे कि काय असे वाटले. हैद्राबादमध्येदेखील अशीच बोंब होती. मग पुन्हा धडपड करून मायाजाल चालू केले. सगळी माहिती घेऊन झाल्यावर हातपाय धुऊन घेतले आणि मायाजालावरून घरी सुखरूप पोहोचल्याचा SMS  पाठवला. घरी निरोप देण्यासाठी मायाजालावर बोलण्यासाठी कुणी भेटते का ते पाहिले तर योगायोगे एक मैत्रीण भेटली. तिच्याकरवे मी  स्वीत्झर्लंडला सुखरूप पोहोचल्याचा आणि आईवडिलांच्या पासपोर्टचे काम व्यवस्थित पार पाडण्याबद्दलचा घरी निरोप दिला. घरी एकदाचा निरोप पोहचल्यानंतर मला हायसे वाटले आणि समाधान वाटले.

मग पोटाला थोडासा नैवेद्य दाखवून आम्ही नवीन SIM घेण्यासाठी म्हणून मुख्य रेल्वेस्थानकावर गेलो. रेल्वेस्थानकावरून SIM, पोटपुजेसाठी आवश्यक त्या भाज्या, आणि खाद्यपदार्थ घेऊन आम्ही परत घरी आलो. मग घरच्यांना फोन करून (सकाळपासूनच्या खेददायक अनुभवाबद्दल सांगून चिंता वाढवण्याचे टाळण्यासाठी त्याबद्दल 'भ्र' ही न बोलता) सुखरूप पोहोचल्याचे सांगितले. आणि शेवटी आनंद भाटे याने गायलेल्या बालगंधर्व यांचे वद जाऊ कुणाला शरण ... हे पद ४ - ५ वेळा ऐकून दिवसभराचा सगळा शीण घालवून दिवसाची उस्ताहपूर्वक सांगता केली.


काही दिवसांपूर्वी हाती आलेल्या बातमीनुसार आम्हाला परदेशी पगार तसेच भारतीय पगार असे दोन्ही पगार मिळणार असल्याची अफवा आमच्या विभागामध्ये /  Department मध्ये पसरल्याचे कळाले. पण आम्हाला फक्त परदेशी पगारच मिळणार आहे.  काय बोलावे याबद्दल - :)


आमच्या पक्षकार / Client बरोबर नुकत्याच झालेल्या संभाषणानुसार कंपनीच्या अंदाजपत्रकानुसार आम्हाला एका महिन्याने भारतामध्ये परत पाठविले जाणार आहे. आणि याबद्दलचा निर्णय येत्या ३ आठवड्यांमध्ये घेतला जाणार आहे.


टीप: लेखनाचा बाज कायम ठेवण्यासाठी (वाढवण्यासाठी) वरील टिपणामध्ये घराचे आणि घरभाडयाचे काम करणाऱ्या प्रतिनिधी / एजंट / Agent चा एके ठिकाणी 'बये' असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच व्यवस्थापकीय / मॅनेजर मंडळींना 'साले' असे संबोधण्यात आले आहे. 


- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) (+ ४ १ ७ ६ ५ १ ० ६ ८ ३ ४)
मंगळवार, २९/११/२०११

रविवार, २५ सप्टेंबर, २०११

सिक्कीम प्रवास वर्णन – दिवस पाचवा


गुरुवार, ०४/११/२०१०.

सकाळी उठल्या उठल्या प्रशांत ने काढलेले कांचनगंगा शिखराचे फोटो
आज गंगटोकमध्येच फिरायचे असल्याने काल रात्री सर्वांनी थोडेसे उशिरा बाहेर पडण्याचे ठरवले होते. नेहमीप्रमाणे मी सर्वात सर्वप्रथम लवकर उठून शाही स्नान करून माझे आवरून घेतले. मग त्यानंतर एकेकाला उठवायला सुरुवात केली. सगळ्यांचे आवरून झाल्यावर गंगटोकमध्ये पहिल्या दिवशी जिथे सकाळची न्याहरी केली होती तिथेच पुन्हा आम्ही मागच्या वेळच्या टोळक्याने पोट भरून न्याहरी करून घेतली. सिक्किममध्ये मोमो नावाचा खाद्यपदार्थ खूप प्रसिद्ध असल्याने तो खाण्यासाठी मागवला तर तो संपलेला होता. आम्ही फक्त उद्याचाच दिवस इथे असल्याने मोमो खायला मिळेल की नाही अशी माझ्या मनात पाल चुकचुकू लागली होती. न्याहरी करता करता हिरवळ पाहण्यासाठी/शोधण्यासाठी आमच्यातील काही जणांच्या नजरा घारीप्रमाणे इकडेतिकडे भिरभिरत होत्या.
न्याहरी करून झाल्यावर हॉटेलवर परत जाताना गंगटोक फिरण्यासाठी २ टॅक्सी ठरवल्या. टॅक्सीच करण्याचे कारण म्हणजे गंगटोकमध्ये भाडे तत्वावर चालणाऱ्या गाड्यांना फिरण्यासाठी परवानगी नाहीये. गंगटोकमध्ये बहुतेक ११ ते १३ ठिकाणे आहेत पाहण्यासारखी. आता ही ठिकाणे म्हणजे महाराष्ट्रातील महाबळेश्वरची १३ / १४ ठिकाणे जशी आहेत त्याप्रमाणे. गंगटोकमधील एक पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे येथील प्राणी संग्रहालय (झु). पण नेमके आज त्याला साप्ताहिक सुट्टी होती त्यामुळे आम्हाला ते काही पाहता येणार नव्हते. यावरून ध्यानात घ्या कि एखाद्या मोठ्या सहलीला जाताना किती बारीकसारीक गोष्टींची चौकशी करणे आवश्यक असते/आहे. नाहीतर मग एखादे ठिकाण बघणे राहून जाऊ शकते. आम्ही सिक्किममध्ये येताना या प्राणी संग्रहालायाच्या साप्ताहिक सुट्टीचा विचार केलेला नव्हता. असोत ...
मग २ टॅक्सी ठरवल्या गंगटोक फिरण्यासाठी. वाटेत काहीतरी खरेदी होऊ शकते म्हणून एखादं-दुसऱ्याने बरोबर एखादी बॅग घेतली आणि आम्ही गंगटोक दर्शनासाठी निघालो.

पहिले ठिकाण - सिक्किममधील हस्तकलेचं प्रदर्शन आणि विक्री

हे हस्तकलेचे प्रदर्शन आणि विक्री कदाचित सिक्किम सरकार किंवा सिक्किम पर्यटन विभागाच्या अखत्यारीत येत असावे. या ठिकाणी आमच्यातील बऱ्याच जणांनी छोट्या छोट्या वस्तू खरेदी करून घेतल्या. मी ही घरच्यांसाठी आणि ओळखीच्यांना भेटवस्तू देण्यासाठी काही वस्तू खरेदी करून घेतल्या. पण पुण्यातील घरी नवीन नवरी मुलगी पहिल्यांदा आल्यानंतर तिला देण्यासाठी साडी किंवा ब्लाऊजपीस नसल्यामुळे यातील एक भेटवस्तू तिला दिल्यामुळे घेतलेल्या वस्तूंचे वाटप ठरल्याप्रमाणे नाही झाले तो भाग निराळा. या ठिकाणी साधारण तासभर खरेदी करून आम्ही पुढील ठिकाणी निघालो.




दुसरे ठिकाण - एक छोटासा धबधबा

या ठिकाणी पर्यटक थांबावेत म्हणून आजूबाजूचा परिसर आखीवरेखीव पद्धतीने सजवलेला होता. समोरच काही छोटे हॉटेल्स होती. धबधब्याजवळ सिक्किमचे पारंपारिक पोशाख फोटो काढण्यासाठी भाड्याने मिळत होते. आता इथपर्यंत आलोच आहोत तर सिक्किमच्या पारंपारिक पोशाखात फोटो काढण्यासाठी सर्वांनी वेगवेगळे पोशाख भाड्याने घेतले आणि आम्ही सर्वांनी वेगवेगळया छटांमध्ये स्वतःचे फोटो काढून घेतले. मी आणि प्रशांतने शलाम शाहीब च्या छटेमध्ये आमचे काही फोटो काढून घेतले. या ठिकाणी देखील साधारण ४५ मिनिटे ते १ तास थांबून आम्ही पुढील ठिकाणास भेट देण्यासाठी निघालो.






तिसरे ठिकाण - रूमटेक मोनेस्ट्री

हे ठिकाण म्हणजे बौद्ध धर्मियांची गुरुकुल पद्धतीची शिक्षण संस्था भासत होती. याच ठिकाणी बौद्ध धर्मियांचे एक मोठे मंदिर होते. (बौद्धधर्मीय कदाचित अशा ठिकाणांना मंदिर म्हणत नाहीत.) मंदिरामध्ये प्रकाशासाठी विजेवर चालणारे एकही उपकरण नसून मेणबत्त्या होत्या. मंदिराच्या बाजूलाच शालेय वस्तीगृहाप्रमाणे इमारत/इमारती होत्या आणि येथील प्रत्येक मुलाचा पोशाख दलाई लामांसारखा चॉकलेटी रंगाचे धोतर आणि उपर्ण अशा पद्धतीचा होता. आम्ही जेंव्हा तिथे फिरत होतो त्यावेळेला कदाचित त्या मुलांची शाळेची मधली सुट्टी झाली आहे किंवा शाळा भरायची वेळ झाली आहे असे वाटत होते आणि त्या मुलांची खुपच धावपळ, खोड्या करणे चालू होते. या ठिकाणी काही नवीन प्रकारची फुले दिसत होती. प्रशांत आणि समीरने त्यांचे फोटो काढून घेतले. 




चौथे ठिकाण - ताशी व्हू पॉइंट

या ठिकाणाहून तुम्ही कांचनगंगा शिखर लांबून पाहू शकता. कांचनगंगा शिखर पाहण्यासाठी तुम्हाला काही पायऱ्या चढून वरती जावे लागते. येथून कांचनगंगा शिखराबरोबरच गंगटोक शहराचा बराचसा परिसर एका नजरेत दिसतो. या व्हू पॉइंटच्या पायथ्याला खरेदी करण्यासाठी २/३ दुकाने होती. पुन्हा या ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी खरेदी केली. याच ठिकाणी मी काऊ-बॉय सारखी टोपी खरेदी केली आणि फोटो पण काढून घेतला. खरेदी करून झाल्यावर खरेदीच्या सामानाची पिशवी घेऊन गाडीकडे परतत असताना प्रशांतने माझे लक्ष्य नसताना काऊ-बॉय स्टाईलमध्ये २ अप्रतिम फोटो काढले.




पाचवे ठिकाण - गणेशटोक

हे ठिकाण म्हणजे थोड्याशा उंचावर असलेले एक गणेश मंदिर. या मंदिरामध्ये महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे फोटो होते. बोलता बोलता प्रशांतने त्या पुजाऱ्याला आम्ही हे अष्टविनायक ज्या ठिकाणाचे आहेत त्या ठिकाणाहून आलो आहोत हे सांगितले. मंदिरातील अष्टविनायकाचे फोटो पाहून छान वाटले. याही ठिकाणावरून गंगटोक शहराचा बराचसा परिसर एका नजरेमध्ये दिसतो.




सहावे ठिकाण - फुलांचे प्रदर्शन / फुलांची नर्सरी

या ठिकाणी नर्सरीकडे जाण्याच्या पादचारी मार्गाच्या बाजूला सुंदर बाग होती आणि पुढे कारंजे वगैरे होते. नर्सरीत आतमध्ये प्रवेश केल्यावर आम्हाला विविध प्रकारची असंख्य फुले एकाच ठिकाणी पहायला मिळाली. मार्च-एप्रिल मध्ये हीच फुले जर रस्त्याच्या दुतर्फा दिसत असतील तर कसे दिसत असेल, ते पाहताना आपल्याला काय वाटेल असा विचार माझ्या मनात तरळून गेला. प्रशांत साहेबांनी या नर्सरीतील सगळ्या फुलांचे फोटो काढण्यासाठी कॅमेराचा ताबा घेतला होता. 

आम्ही सगळे ही फुले पहात पहात नर्सरीत फिरत होतो तर प्रशांत फुलांचे फोटो काढत काढत आमच्या मागून येत होता. त्या फुलांमध्ये आम्हाला आमचे काही फोटो काढून घ्यायचे होते म्हणून आमचे प्रशांतला विनवणी करणे चालू होते. मग बऱ्यापैकी विव्हळून झाल्यावर प्रशांतला पाझर फुटत होता आणि आमचा एखादं-दुसरा फोटो काढला जात होता. या सगळ्यामध्ये एखादे अप्रतिम फुल दिसल्यावर माझा एकट्याचा त्या फुलाबरोबर फोटो काढण्यासाठी माझी खूप हावहाव चालू होती. अधूनमधून प्रशांत माझ्या या हावरटपणाला कंटाळून माझा एखादं-दुसरा फोटो काढीत होता. नर्सरीमध्ये तासभर वेळ घालवून आम्ही पुढे निघालो. जाता जाता आमच्यातील काही जणांनी फुलांच्या बिया विकत घेतल्या. जाताजाता आम्हाला पुण्यातील एक पंजाबी झोडपे भेटले होते.





सातवे ठिकाण - सिक्किम व्ह्यू पॉइंट

हे ठिकाण पाहण्यासाठी मुख्य रस्त्यावरून थोडेसे अंतर चालून जावे लागते. या ठिकाणाकडे जाताना बरीच माकडे दिसत होती आणि त्यांचे खोड्या करणे चालू होते. माकड/माकडे दिसणे म्हणजे आमच्यासाठी चेष्टा-मस्करी सुरु करण्याचे एक निमित्त असतं. माकडे दिसली रे दिसली कि मग अखंड प्राणीमात्राचे संदर्भ जोडून चेष्टेला सुरुवात. मग चेष्टा करीत करीत आम्ही या ठिकाणापाशी पोहचलो. याच वाटेवर दोन्ही बाजूला मोठमोठी हिरवीगार झाडे होती त्यामुळे चालताना उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. या ठिकाणावरून गंगटोक आणि सिक्किमचा बराचसा परिसर दिसून येतो. याच वाटेवरून जाताना आम्हाला मध्ये एक भरपूर बडबड करणारी पोरगी दिसली. बहुतेक छोटू नानांनी तिच्याबरोबर जुजबी बोलून तिच्याबरोबर फोटो काढून घेतला.




आठवे ठिकाण - असेम्ब्ली पॉइंट आणि रोपवे पॉइंट

वर नमूद केलेल्या ठिकाणाजवळच हे ठिकाण होते. याच ठिकाणी सिक्किम राज्याची / गंगटोक शहराची असेम्ब्ली / assembly होती. दुरूनच तिचे दर्शन घेऊन आम्ही रोपवेकडे प्रस्थान केले. रोपवेमधून पुन्हा  एकदा गंगटोक दर्शन करून घेतले.




नववे ठिकाण - गंगटोक ऐतिहासिक संग्रहालय

येथे गंगटोक मधील जुन्या वस्तू, बौद्ध धर्मियांच्या काही पुरातन वस्तू, हत्यारे संग्रहित करून ठेवण्यात आली आहेत.  येथील वस्तूंमध्ये / बाबींमध्ये मला मानवी हाडांचा बराच वापर केलेला आहे असे जाणवून आले. मानवी हाडांचा वापर करण्याचे कारण काय असावे हे काही कळले नाही आणि नंतर मी शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. बौद्ध धर्माच्या इतिहासात आणि सिक्किमच्या इतिहासात घडून गेलेल्या काही गोष्टी इथे चित्रबद्ध करून संग्रहित करण्यात आल्या होत्या. वरच्या मजल्यावर कदाचित ग्रंथालय असावे. तिथे गेल्यावर सगळीकडे बौद्ध धर्मीय पुस्तकेच पुस्तके दिसत होती. या ठिकाणी आता बोर व्हायला लागले होते आणि कंटाळा यायला लागला होता.




दहावे ठिकाण - बौद्ध मंदिर

हे ठिकाण बौद्ध मंदिरासारखे भासत होते. (बहुतेक बौद्ध लोक आपल्याला मंदिरासारख्या भासणाऱ्या अशा वास्तूंना / ठिकाणांना मंदिर म्हणत नाहीत.) हे मंदिर बंद होते कि बंदच असते हे काही कळले नाही. या मंदिराभोवती भाविकांना प्रदक्षिणा घालण्यासाठी सोय करण्यात आली होती. प्रदक्षिणा मारताना बाजूला पितळेचे / तांब्याचे गोल लोखंडी गोलाकार खांबांवर लावण्यात आले होते. असे बरेच गोल मंदिराभोवती होते. भाविक प्रदक्षिणा घालताना ते गोल फिरवत होते. मला ते गोल फिरवताना मजा येत होती. मग मी ही हे गोल फिरवत फिरवत ११ प्रदक्षिणा मारून घेतल्या. मंदिराजवळच तेलाच्या दिव्यात वाती लावण्याचे आणि दिवे लावण्याचे काम चालू होते. इथेही काही फोटो काढून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. 



आता सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या म्हणून तिथेच जवळ असलेल्या टपरीवर चहा, बिस्कीट, मॅगी, आणि मोमो खाऊन घेतले. शेवटी या ठिकाणी आम्हाला सिक्किमचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ मोमो खायला मिळाला. आम्हाला मोमो काय इतका आवडला नाही तो भाग निराळा. मोमो म्हणजे आपल्याकडील उकडलेले मोदक आहेत असे वाटत होते. आपण मोदकांमध्ये जसे गुळ खोबरे घालतो तसे मोमोमध्ये कोबी आणि काही भाज्या/पदार्थ घातलेले असतात. या ठिकाणी टॅक्सी चालक लवकर चला, मी तुम्हाला आणखी २ भारी पॉइंट दाखवतो असे म्हणत होता पण तो त्यासाठी वेगळे पैसे घेणार होता त्यामुळे तो प्रस्ताव नाकारून आम्ही हॉटेलवर परत जाणे पसंद केले.
हॉटेलवर पोहचल्यावर ताजेतवाने / फ्रेश / fresh होऊन थोडावेळ विश्रांती घेतली. नंतर चहा घेऊन सगळे जण मिळून बाजारपेठ फिरण्यासाठी बाहेर पडलो. छोटू नानांना काही कपडे खरेदी करायचे होते म्हणून आम्ही फिरत होतो आणि कपड्यांच्या दुकानात स्वतःसाठीदेखील कपडे पाहत होतो. समीरने त्याच्यासाठी एक टी-शर्ट निवडला होता पण तो त्याच्या मापाचा नव्हता आणि नेमका तोच टी-शर्ट मलादेखील आवडला. तो टी-शर्ट माझ्याच आकाराचा असल्याने मी लगेच घेऊन टाकला. त्यानंतर शहीद कामठे यांच्यासारखे एक जर्किन आणि आणखी एक टी-शर्ट घेतला. कपडे खरेदी करण्याच्या वेळी भूक लागल्या कारणाने थोडेसे गोड खाऊन घेतले. कपड्यांच्या दुकानांमध्ये बराच वेळ घालवून थोडीफार खरेदी करून आम्ही जेवणासाठी पुन्हा गांधी रस्त्यावरील बाजारपेठेत गेलो. मस्तपैकी जेवण करून पुन्हा हॉटेलवर जाऊन नेहमीप्रमाणे पत्ते, गप्पा, मस्ती, आणि सरते शेवटी झोप ... उद्या ७ वाजता नथूला (भारत - चीन सीमा) ला निघायचे होते. 
संध्याकाळी दीपकबरोबर झालेल्या बोलण्यानुसार उद्या अनुपच आमच्याबरोबर येणार होता. 

पाचव्या दिवसाचा एकूण खर्च: रु. ४८७१ /- फक्त.


- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) (+ ९ १ ९ ९ ६ ० ७ ८ ८ २ ८ ०)


रविवार, २५/०९/२०११

सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

सिक्कीम प्रवास वर्णन – दिवस चौथा



बुधवार, ०३/११/२०१०.

कालच्याला आमच्या ड्रायव्हर साहेबांनी अनुपने भल्या पहाटे ०५:०० वाजता निघुयात म्हणून सांगितले होते. त्याने हे सांगितले होते खरे पण साहेब काल रात्री बिअर/दारू पिऊन तुंग होते त्यामुळे साहेब ०५:०० वाजता उठू शकतील कि नाही याबद्दल आम्हाला शंका वाटत होती.

ठरल्याप्रमाणे पहाटे ०३:३० वाजता उठून मी शाही स्नान करून घेतले आणि माझे आवरून घेतले. माझे आवरून झाल्यावर बाकीच्यांना एक एक करून उठवायला सुरुवात केली. अनुप साहेब ०५:०० वाजता उठले होते. सर्वांचे आवरून झाल्यावर निघताना चहा घेतला तर तो कालचा रात्रीचाच असल्याचे जाणवून आल्याने आम्ही अर्धवट चहा किंवा चहा न घेताच साधारण ०५:१५ वाजता झिरो पॉइंट या स्थळाला भेटण्यासाठी निघालो. निघताना इथे लाचेनपेक्षा कमी थंडी जाणवत होती. पण झिरो पॉइंटला आणखी जास्त थंडी/गारठा आणि थंड वारे वाहते याबद्दल प्रशांत/अनुप ने आगोदरच सांगितले होते त्यामुळे मी कालच्याप्रमाणेच माझी गरम कपड्यांची संपत्ती बरोबर घेतली होती आणि झिरो पॉइंटवर उस्ताहपूर्वक गोंधळ घालण्यासाठी कालच्याप्रमाणेच स्वत:ला गरम कपड्यांमध्ये गुंडाळून घेतले होते.



झिरो पॉइंटच्या प्रवासामध्ये एकदा निघाल्यानंतर झिरो पॉइंटवरच थांबायचे होते. आणि आमचा हा प्रवास कालच्याप्रमाणेच अंधेरी दुनियेतील डोंगरांवरील बर्फाच्या साम्राज्याचे दर्शन घेत, डोंगरांवरील छोट्या/मोठ्या झाडांचं आणि पडणाऱ्या बर्फाचं नातं/करारनामा पाहत, गप्पा मारत, एकमेकांची चेष्टा-मस्करी करीत चालला होता.

झिरो पॉइंटचा रस्ताही बऱ्यापैकी घाटातून होता आणि पुढे पुढे तर कधी उजव्या बाजूला, कधी डाव्या बाजूला, तर कधी दोन्ही बाजूला पूर्णपणे मोकळा परिसर होता आणि या मोकळ्या परिसराच्या पलीकडे एखादा उंचच उंच डोंगर, कधी अर्धवट बर्फाने माखला गेलेला डोंगर तर कधी पूर्णपणे बर्फाने कवटाळलेला डोंगर, नदी किंवा वाहत्या पाण्याचा प्रवाह असे दृश्य होते.


रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे हे नैसर्गिक सौंदर्य आम्ही डोळ्यांमध्ये साठवून पुढे पुढे जात होतो. साधारण तासाभराने उजाडायला सुरुवात झाली होती. ज्याप्रमाणे इथे अंधार खूप लवकर पडतो त्याप्रमाणे इथे उन्हही खूप लवकर पडते. साधारण सकाळच्या ०५:३० - ०५:४५ पासूनच उन्ह पडायला सुरुवात होते. सकाळच्या उन्हामुळे पर्वतशिखरे पिवळसर दिसत होती आणि निसर्ग अजूनच नयनरम्य दिसू लागला होता. जसजसे पुढे जात होतो तसतसे आम्हाला दुरवर असलेल्या डोंगरांवर पडलेले उन्ह दिसत होते आणि त्यावेळेला आम्ही मात्र सावलीतुन जात आहोत असे वाटत होते. पुढे एका ठिकाणी दुरवर असलेल्या एका डोंगरावर आम्हाला ३ मोठेच्या मोठे सुळके दिसत होते. पुढे एका ठिकाणी अनुपला बर्फामध्ये खेळण्यासाठी गाडी थांबवायला सांगितले तर त्याने सांगितले कि झिरो पॉइंटला याच्यापेक्षा जास्ती बर्फ आहे तिथेच मस्ती करून घ्या.


साधारण ०७:१५ - ०७:३० च्या दरम्यान आम्ही झिरो पॉइंट या ठिकाणी पोहचलो. झिरो पॉइंट म्हणजे एक मोठाच्या मोठा खुला परिसर होता. त्याच्यामधून पर्यटकांसाठी एक रस्ता होता. हा रस्ता इथेच संपतो आणि यापुढे गाडी घेऊन जाता येत नाही. एका बाजूला साधारण खुल्या परीसरापलीकडे बर्फांच्छादीत डोंगर होते. दुसऱ्या बाजूला थोड्याश्या अंतरावरून वाहणारी अतिशय स्वच्छ पाणी असलेली नदी (किंवा पाण्याचा प्रवाह) आणि त्याच्या पलीकडे पुन्हा मोकळा परिसर व साधारण जंगल. रस्त्याच्या उजव्या बाजूला खाद्यपदार्थ विक्री करणारे लोक बसले होते.



है साला, झिरो पॉइंटवर गाडी थांबली रे थांबली कि आम्ही हावऱ्यासारखे गाडीतून बाहेर आलो आणि हुल्लडबाजी करायला सुरुवात केली. बाहेर आलो तर थंड बोचरा वारा जोराने वाहत होता आणि झिरो पॉइंट खुपच उंचावर असल्याने श्वासोच्छवासास त्रास होत होता. मग सगळेजण पळत पळत बर्फात खेळण्यासाठी म्हणून एका ठिकाणी गेलो आणि एकमेकांस बर्फाने मारण्यास सुरुवात केली. एकेकट्याला एकेकट्याने व्यवस्थितपणे बर्फ मारता येईना आणि जास्ती मजा पण येईना म्हणून टोळ्या तयार करून एखाद्याला बर्फ मारायचा प्रयत्न सुरु झाला आणि पळापळी सुरु झाली. पळापळी सुरु झाली रे झाली कि जास्तीत जास्त ४५ - ५० सेकंदात आम्ही सगळे गारद - कारण होते श्वासोच्छावासासाठी होणारा त्रास आणि बोचणारे थंड वारे. मग धावपळ थांबवून आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि काही एकत्रित फोटो काढून घेतले.




धावपळीत सगळ्यांचे चेहरे लालभडक झाले होते आणि छोटे सरकार पुरते गारद झाले होते. त्यांना थंडी अजिबात सहन होत नव्हती त्यामुळे त्यांनी माघार घेऊन गाडीत जाऊन बसणे पसंद केले होते. पळापळी केल्यामुळे प्रशांतलाही चक्कर आल्यासारखे वाटत होते त्यामुळे तो ही समीरबरोबर थोड्या वेळासाठी गाडीत जाऊन बसला होता.  ते दोघे गेल्यानंतर आम्ही आणखी काही स्वतःचे फोटो काढून घेतले - काही नदीजवळ, काही बर्फावर लोळताना वगैरे वगैरे. इथे इतकी थंडी होती कि जर तुम्ही थुंकलात तर तुमची थुंकी बर्फ होऊन जमिनीवर पडत होती. कदाचित तुम्हाला हे अतिशयोक्ती वाटेल पण तिथे खरचं इतकी थंडी होती.

या ठिकाणी फिरून झाल्यावर आम्ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला देखील फिरायला गेलो आणि एखादं-दुसरा फोटो काढून घेतला. तसे पाहता बहुतेक आम्हीच सर्वात आगोदर किंवा दुसरे / तिसरे झिरो पॉइंटवर पोहचलो होतो आणि आता हळूहळू गर्दीही वाढू लागली होती. मला या ठिकाणी एखादा स्टायलिश/हटके फोटो काढून घ्यायचा होता. मग प्रशांतला विनंती करून मी तसा फोटो काढून घेतला. झिरो पॉइंटवर मी इतका उस्ताही होतो कि काही मिनिटांसाठी मी उघडादेखील फिरू शकलो असतो.


हे नैसर्गिक सौंदर्य पाहून डोळ्यांचे समाधान झाले असले तरी पोटाचे समाधान करणे अजून बाकी होते. मग काय तेथेच उभे असलेल्या लोकांकडून उकडलेले हरभरे, अंडा-ऑम्लेट, जाम-ब्रेड, चहा या पदार्थांवर आम्ही ताव मारला. छोटे सरकार पार गारठून गेले होते आणि जर कुणाकडून गाडीचा दरवाजा चुकून उघडा जरी राहिला तर साहेब चीडचीड करीत होते. गारठलेल्या अवस्थेमुळे साहेबांना प्रत्येक गोष्ट हातात द्यावी लागत होती. गारठलेल्या अवस्थेतून बाहेर यावे म्हणून तेथेच असलेल्या रम विक्रेत्याकडून त्याने एक ग्लासभर रम घेतली आणि पिली. रम पिल्यानंतर त्याला थोडे बरे वाटू लागले. त्यानंतर त्याने फक्त टी-शर्ट वर आणि अनवाणी पायांनी त्या ठिकाणी फेरफटका मारला.

बोचरा वारा अजूनच जोरात वाहत होता. मी खाताना देखील हातात हातमोजे घालून खात होतो. सकाळची न्याहरी व्यवस्थितपणे उरकून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. आमच्या परतीच्या मार्गावर वाटेत एक झिरो पॉइंटकडे जाणारी गाडी बंद पडली होती. मग त्या गाडीला मदत करण्यासाठी अनुपने आमची गाडी तिथे थांबवली. आमच्या गाडीप्रमाणेच आगोदरच काही गाड्या तिथे मदतीसाठी थांबल्या होत्या आणि त्या मार्गावरून जाणाऱ्या सगळ्या गाड्या थांबत होत्या. बराच वेळ झाला तरी ही गाडी चालू होत नव्हती म्हणून अनुपला आम्ही आपण निघुयात म्हणून विनंती केली पण तो काही निघाला नाही. बंद पडलेली गाडी सुरु होईपर्यंत एकही गाडी तिथून हलली नाही. ती गाडी सुरु झाल्यावरच बाकीच्या गाड्यांनी पुढील प्रवासास सुरुवात केली. सिक्किममधील एकमेकांना मदत करण्याची ही वृत्ती खरचं खूप नावाजण्यासारखी आहे. अहो इथे महाराष्ट्रात मी लोकांना मदत करणाऱ्यांचा उद्धार करणारे आणि त्यांची कळा खाणारे लोक पाहिले आहेत आणि त्याचा स्वतःही अनुभव घेतला आहे. असोत ... गाडी चालू व्हायला बराच वेळ लागत होता म्हणून आम्ही पुन्हा एकदा फोटो सेशन करून घेतले आणि परतीच्या मार्गावरून पदयात्रा करून घेतली.


मग पुढे युंगथान व्हॅली या ठिकाणी थांबलो. या ठिकाणी उजव्या बाजूला बर्फाच्छादित डोंगर आणि डाव्या बाजूला मोकळा परिसर, नंतर स्वच्छ पाण्याची नदी, आणि त्यापलीकडे जंगल होते. मग गाडीतून उतरून थोडेसे अंतर चालून आम्ही नदीकडे निघालो. जाताजाता वाटेमध्ये सर्वांनी वेगवेगळया पद्धतीने स्वतःचे फोटो काढून घेतले. पुढे वाटेत एक भला मोठा दगड होता त्यावर उभे राहून, नंतर सर्वजण एकदम त्या दगडावरून उडी मारतानाचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण तो काय एवढा यशस्वी झाला नाही. मग पुढे पुन्हा नदीकाठी आणि नदीमध्ये असलेल्या एका दगडावर बसून सर्वांनी छोटू नानाचा गॉगल घालून वेगवेगळया छटांमध्ये स्वतःचे फोटो काढून घेतले. नदीकाठीसुद्धा गर्दी वाढायला लागली होती आणि हिरवळही वाढायला लागली होती. मग इथली हिरवळ वगैरे पाहून इकडे तिकडे थोडावेळ उंडारून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. परत जाण्याच्या वेळेला नदीकाठी कदाचित आम्हाला एक महाराष्ट्रीयन समूह भेटला होता.



युंगथान व्हॅलीच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही / बहुतांशी वेळा साधारण मार्च-एप्रिल मध्ये इथे रस्त्याच्या दुतर्फा फुले उगवलेली असतात आणि हे नैसर्गिक दृश्य खूप नयनरम्य असतं. मार्च आणि एप्रिल मध्ये सिक्किम मध्ये फुलांचा आंतरराष्ट्रीय महोस्तव होतो आणि तो पाहण्यासाठी परदेशातून पर्यटक येत असतात म्हणे. सध्या सिक्किममध्ये एकही विमानतळ नाहीये पण आम्हाला तेथील लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१२ पर्यंत इथे एक विमानतळ तयार होणार आहे. जेंव्हा हे विमानतळ तयार होईल तेंव्हा त्याचा पर्यटनासाठी खूप खूप खूप फायदा होईल.

युंगथान व्हॅलीनंतर आम्ही गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणी गेलो. झऱ्यापाशी जाण्यासाठी रस्त्यापासून थोडेसे अंतर चालावे लागते. चालत असताना वाटेत नदीवर बांधलेला लाकडी पूल लागतो. या ठिकाणी काही फोटो काढून पुढे जाऊन आम्ही गरम पाण्याचे झरे पाहून घेतले. या ठिकाणी फोटो काढताना आमच्यातील   कोणीतरी पाण्यात पडले होते. तेथे काही महाराष्ट्रीयन मंडळी भेटल्यानंतर त्यांच्याबरोबर गरम पाण्याच्या झऱ्यांचे महत्व, फायदे, असे झरे कुठे कुठे आहेत, सिक्किममध्ये काय काय पाहिले आणि आणखी पाहण्यासारखे काय आहे या विषयांवर चर्चा करून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.

परतीच्या मार्गावर वाटेत एका ठिकाणी पिण्यासाठी बिअर/दारू मिळत होती. त्या ठिकाणी छोटू नाना आणि समीर आमच्या आगोदर हजर. हे बिअरचे दुकान २ सुंदर मुली सांभाळत होत्या. मग काय छोटू नानांनी त्या मुलींकडून बिअर मागून घेतली आणि बिअर पीत पीत तो आणि समीर या दोघींशी बोलत बसले.छोटू नानांना बिअर आवडली नाही म्हणून त्याने समीरला दिली. आम्ही तिथे पोहचल्यानंतर आम्हाला हे दृश्य पहायला मिळाले. असे म्हणतात ना कि "रम रमा रमी" च्या पाठीमागे लागू नये. पण आमच्या समूहामध्ये "रमी" (बिन पैशाची) रोजच होतेय, "रम" सकाळीच झाली, आता काय जणू "रमा" चीच बाकी होती म्हणून कि काय छोटू नानांचा असा कारभार चालू होता. छोटू नाना कौशल्यपूर्ण पद्धतीने त्या दोघींशी बोलत होते आणि छोटू नानाचे हे कौशल्य आम्ही न्याहाळत तिथे बसलो होतो. बिअर पिऊन झाल्यावर छोटू नानाने त्या २ पोरींबरोबर त्यांच्या गळ्यात हात घालून फोटो काढून घेतले. फोटो काढून तेथून निघताना त्या २ पोरींमधील एक पोरगी छोटू नानाला "मुझसे शादी करो और मुझे तुम्हारे साथ ले चलो" म्हणाली. मग काय छोटू नानाने "ठीक है| चलो हमारे साथ|" म्हटलं. पण ती पोरगी नंतर नको म्हणाली आणि आम्ही तिथून परत निघालो.

तिथून मग आम्ही हॉटेलवर परत आलो. जेवणाची तयारी होईपर्यंत बॅगा आवरून घेतल्या, झिरो पॉइंटचे फोटो वगैरे पाहून घेतले. थोड्याच वेळात जेवणासाठीचा निरोप आल्यानंतर जेवण करून घेतले. आजचे ही जेवण छान झाले होते. जेवण झाल्या झाल्या सगळे सामान गाडीवर बांधून निघायची तयारी करून घेतली. या हॉटेलमधील जेवण आवडल्याने इथल्या पोरांना खुशी देऊन आम्ही निघण्याच्या तयारीत होतो पण हॉटेलमधील दोघांना दिवाळीसाठी म्हणून त्यांच्या घरी जायचे होते त्यामुळे त्यांनी आम्हाला आमच्याबरोबर गाडीत येण्यासाठी विनंती केली होती. पण आम्ही ७ जण असल्याने एक जण येऊ शकतो असे सांगितले. त्या दोघांना मिळूनच यायचे होते आणि आम्ही दोघांना गाडीत घेऊ शकत नव्हतो. त्यामुळे ते दोघे नाराज झाल्याचे जाणवून येत होते पण त्याला काही पर्याय नव्हता. अशा प्रकारे इथला मुक्काम हलवून आम्ही गंगटोकच्या दिशेने आगेकूच केली.

पुढील प्रवासात आमचीदेखील गाडी एका ठिकाणी बंद पडली होती. गाडीचा गाडी वळवण्यासाठी वापर केला जाणारा कोणता तरी दांडा खराब झाला होता आणि त्यामुळे अनुपला गाडी वळवताना वगैरे थोडासा त्रास होत होता. कदाचित अनुपला तो खराब होत आलेला आहे याची पूर्वकल्पना असावी कारण त्याने नवीन दांडा गाडीमध्ये ठेवला होता. खराब झालेला दांडा काढून नवीन बसवण्यासाठी गाडीचे चाक हाताने वळवावे लागत होते आणि ते आम्हाला लवकर जमत नव्हते. थोडेसे प्रयत्न केल्यानंतर आम्हाला ते शक्य झाले आणि तो दांडा बदलला गेला. जिथे गाडी बंद पडली होती त्याच्याजवळच डोंगराच्या पायथ्याला हायड्रो प्लांटसाठी बोगद्याचे काम चालू होते. हे काम चालू असताना प्रशांत आणि समीरने येथे असलेल्या काही नवीन फुलांचे फोटो काढून घेतले. अनुपनेही काल घडलेल्या एका अपघाताची बातमी आम्हाला सांगितली.

झिरो पॉइंट, युंगथान व्हॅलीच्या प्रवासामुळे आम्ही थोडेसे/बरेच आळसावलो/थकलो होतो. मग आमच्यातील काही जणांनी गंगटोकच्या प्रवासाच्यावेळी गाडीमध्ये डुलक्या मारून घेतल्या. अंधार पडण्याच्या वेळेला आम्ही सिक्किम प्रवास वर्णन - दिवस दुसरा मध्ये नमूद केलेल्या हॉटेलमध्ये चहापाण्यासाठी थांबलो. तिथे पोहचल्यावर पुन्हा त्या हॉटेलमधील बोलक्या बाहुलीचे संभाषण ऐकून/पाहून तिथे थोडा वेळ घालवून आम्ही पुढे निघालो. पुढे एका ठिकाणी वाटेत एक मोठा दगड होता आणि तो अंधार पडल्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हता. त्या दगडाच्या अगदी जवळ पोहचल्यावर अनुपला तो दगड दिसला आणि त्याने समयसूचकतेने गाडी वळवल्याने आमचा अपघात टळला. जर अनुपने समयसूचकता दाखवली नसती तर आमचा भयानक अपघात होण्याची शक्यता होती. अपघात प्रसंगातून वाचल्यानंतर साधारण तासाभराने आम्ही गंगटोक मधील आमच्या हॉटेलजवळ पोहचलो. ३ दिवसापासून अनुप आमच्याबरोबर होता आणि आमची छान मैत्री ही झाली होती. ३ दिवसाच्या अनुपच्या कामगिरीवर खुश होऊन आम्ही त्याला खुशीदेखील दिली.

उद्याचा दिवस सोडून परवा दिवशी आम्हाला नथूला (भारत - चीन सीमा) ला जायचे होते. सिक्किममध्ये भाडे तत्वावर चालणाऱ्या गाड्या सिक्किममधील दोन भागांमध्ये विभागल्या आहेत. एक म्हणजे लाचेन-लुचांग वगैरे वगैरे आणि दुसरे म्हणजे नथूला. या विभागामुळे अनुप आणि अनुपची गाडी आमच्याबरोबर नथूलाला येऊ शकणार नव्हती. पण आता अनुपबरोबर चांगली ओळख झाली होती आणि तो ही आमच्यामध्ये मिळून मिसळून वागत होता त्यामुळे त्यानेच आमच्याबरोबर नथूलाला यावे असे आम्हा सर्वांना वाटत होते. आणि त्याप्रमाणे आम्ही तशी विनंतीही त्याला केली पण तो सिक्किमच्या भाडे तत्वावर चालणाऱ्या गाड्यांचे नियम सांगत होता. शेवटी त्याने "दीपक$ से$ बात$$ कौर$ के$ देखोता$ हू$$ |" असे उत्तर दिले आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.


आम्ही थोडा वेळ विश्रांती घेऊन सगळं आवरून घेतलं, चहा घेतला, आणि सगळे मिळून गंगटोकमधील गांधी रस्त्यावरील बाजारपेठेत फिरण्यासाठी गेलो. आता दिवाळी सुरु झालेली असल्याने बाजारपेठेत फटाकेबाजी वगैरे चालू होती. हे सर्व पाहत बाजारपेठेत आम्ही उंडराउंडरी करून घेतली. फिरून झाल्यावर शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन समूह करून आम्ही दोन वेगवेगळया हॉटेलमध्ये जेवायला गेलो. जेवण झाल्यावर मी आणि प्रशांतने उद्या गंगटोक फिरण्यासाठी टॅक्सीची चौकशी करून घेतली आणि किती पैसे लागतील याचा अंदाज बांधून घेतला. हॉटेलवर गेल्यावर पुन्हा नेहमीप्रमाणे पत्ते, मस्ती, गप्पा, आणि फोटो पाहणे वगैरे वगैरे चालू झाले. मागील ३ दिवसात रोज लवकर उठावे लागत असल्याने उद्या ८ वाजता बाहेर पडायचे ठरवून सगळ्यांनी अंथरुणात प्रवेश केला.

चौथ्या दिवसाचा एकूण खर्च: रु. १५६७/- फक्त.

टीप: हे टिपण लिहिताना मी बऱ्याच गोष्टी विसरलो होतो. हे टिपण लिहिण्यासाठी प्रशांत घोळवे ची खूप मदत झाली. त्याबद्दल त्याचे आभार.



- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) (+ ९ १ ९ ९ ६ ० ७ ८ ८ २ ८ ०)
सोमवार, १९/०९/२०११