रविवार, २५ सप्टेंबर, २०११

सिक्कीम प्रवास वर्णन – दिवस पाचवा


गुरुवार, ०४/११/२०१०.

सकाळी उठल्या उठल्या प्रशांत ने काढलेले कांचनगंगा शिखराचे फोटो
आज गंगटोकमध्येच फिरायचे असल्याने काल रात्री सर्वांनी थोडेसे उशिरा बाहेर पडण्याचे ठरवले होते. नेहमीप्रमाणे मी सर्वात सर्वप्रथम लवकर उठून शाही स्नान करून माझे आवरून घेतले. मग त्यानंतर एकेकाला उठवायला सुरुवात केली. सगळ्यांचे आवरून झाल्यावर गंगटोकमध्ये पहिल्या दिवशी जिथे सकाळची न्याहरी केली होती तिथेच पुन्हा आम्ही मागच्या वेळच्या टोळक्याने पोट भरून न्याहरी करून घेतली. सिक्किममध्ये मोमो नावाचा खाद्यपदार्थ खूप प्रसिद्ध असल्याने तो खाण्यासाठी मागवला तर तो संपलेला होता. आम्ही फक्त उद्याचाच दिवस इथे असल्याने मोमो खायला मिळेल की नाही अशी माझ्या मनात पाल चुकचुकू लागली होती. न्याहरी करता करता हिरवळ पाहण्यासाठी/शोधण्यासाठी आमच्यातील काही जणांच्या नजरा घारीप्रमाणे इकडेतिकडे भिरभिरत होत्या.
न्याहरी करून झाल्यावर हॉटेलवर परत जाताना गंगटोक फिरण्यासाठी २ टॅक्सी ठरवल्या. टॅक्सीच करण्याचे कारण म्हणजे गंगटोकमध्ये भाडे तत्वावर चालणाऱ्या गाड्यांना फिरण्यासाठी परवानगी नाहीये. गंगटोकमध्ये बहुतेक ११ ते १३ ठिकाणे आहेत पाहण्यासारखी. आता ही ठिकाणे म्हणजे महाराष्ट्रातील महाबळेश्वरची १३ / १४ ठिकाणे जशी आहेत त्याप्रमाणे. गंगटोकमधील एक पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे येथील प्राणी संग्रहालय (झु). पण नेमके आज त्याला साप्ताहिक सुट्टी होती त्यामुळे आम्हाला ते काही पाहता येणार नव्हते. यावरून ध्यानात घ्या कि एखाद्या मोठ्या सहलीला जाताना किती बारीकसारीक गोष्टींची चौकशी करणे आवश्यक असते/आहे. नाहीतर मग एखादे ठिकाण बघणे राहून जाऊ शकते. आम्ही सिक्किममध्ये येताना या प्राणी संग्रहालायाच्या साप्ताहिक सुट्टीचा विचार केलेला नव्हता. असोत ...
मग २ टॅक्सी ठरवल्या गंगटोक फिरण्यासाठी. वाटेत काहीतरी खरेदी होऊ शकते म्हणून एखादं-दुसऱ्याने बरोबर एखादी बॅग घेतली आणि आम्ही गंगटोक दर्शनासाठी निघालो.

पहिले ठिकाण - सिक्किममधील हस्तकलेचं प्रदर्शन आणि विक्री

हे हस्तकलेचे प्रदर्शन आणि विक्री कदाचित सिक्किम सरकार किंवा सिक्किम पर्यटन विभागाच्या अखत्यारीत येत असावे. या ठिकाणी आमच्यातील बऱ्याच जणांनी छोट्या छोट्या वस्तू खरेदी करून घेतल्या. मी ही घरच्यांसाठी आणि ओळखीच्यांना भेटवस्तू देण्यासाठी काही वस्तू खरेदी करून घेतल्या. पण पुण्यातील घरी नवीन नवरी मुलगी पहिल्यांदा आल्यानंतर तिला देण्यासाठी साडी किंवा ब्लाऊजपीस नसल्यामुळे यातील एक भेटवस्तू तिला दिल्यामुळे घेतलेल्या वस्तूंचे वाटप ठरल्याप्रमाणे नाही झाले तो भाग निराळा. या ठिकाणी साधारण तासभर खरेदी करून आम्ही पुढील ठिकाणी निघालो.




दुसरे ठिकाण - एक छोटासा धबधबा

या ठिकाणी पर्यटक थांबावेत म्हणून आजूबाजूचा परिसर आखीवरेखीव पद्धतीने सजवलेला होता. समोरच काही छोटे हॉटेल्स होती. धबधब्याजवळ सिक्किमचे पारंपारिक पोशाख फोटो काढण्यासाठी भाड्याने मिळत होते. आता इथपर्यंत आलोच आहोत तर सिक्किमच्या पारंपारिक पोशाखात फोटो काढण्यासाठी सर्वांनी वेगवेगळे पोशाख भाड्याने घेतले आणि आम्ही सर्वांनी वेगवेगळया छटांमध्ये स्वतःचे फोटो काढून घेतले. मी आणि प्रशांतने शलाम शाहीब च्या छटेमध्ये आमचे काही फोटो काढून घेतले. या ठिकाणी देखील साधारण ४५ मिनिटे ते १ तास थांबून आम्ही पुढील ठिकाणास भेट देण्यासाठी निघालो.






तिसरे ठिकाण - रूमटेक मोनेस्ट्री

हे ठिकाण म्हणजे बौद्ध धर्मियांची गुरुकुल पद्धतीची शिक्षण संस्था भासत होती. याच ठिकाणी बौद्ध धर्मियांचे एक मोठे मंदिर होते. (बौद्धधर्मीय कदाचित अशा ठिकाणांना मंदिर म्हणत नाहीत.) मंदिरामध्ये प्रकाशासाठी विजेवर चालणारे एकही उपकरण नसून मेणबत्त्या होत्या. मंदिराच्या बाजूलाच शालेय वस्तीगृहाप्रमाणे इमारत/इमारती होत्या आणि येथील प्रत्येक मुलाचा पोशाख दलाई लामांसारखा चॉकलेटी रंगाचे धोतर आणि उपर्ण अशा पद्धतीचा होता. आम्ही जेंव्हा तिथे फिरत होतो त्यावेळेला कदाचित त्या मुलांची शाळेची मधली सुट्टी झाली आहे किंवा शाळा भरायची वेळ झाली आहे असे वाटत होते आणि त्या मुलांची खुपच धावपळ, खोड्या करणे चालू होते. या ठिकाणी काही नवीन प्रकारची फुले दिसत होती. प्रशांत आणि समीरने त्यांचे फोटो काढून घेतले. 




चौथे ठिकाण - ताशी व्हू पॉइंट

या ठिकाणाहून तुम्ही कांचनगंगा शिखर लांबून पाहू शकता. कांचनगंगा शिखर पाहण्यासाठी तुम्हाला काही पायऱ्या चढून वरती जावे लागते. येथून कांचनगंगा शिखराबरोबरच गंगटोक शहराचा बराचसा परिसर एका नजरेत दिसतो. या व्हू पॉइंटच्या पायथ्याला खरेदी करण्यासाठी २/३ दुकाने होती. पुन्हा या ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी खरेदी केली. याच ठिकाणी मी काऊ-बॉय सारखी टोपी खरेदी केली आणि फोटो पण काढून घेतला. खरेदी करून झाल्यावर खरेदीच्या सामानाची पिशवी घेऊन गाडीकडे परतत असताना प्रशांतने माझे लक्ष्य नसताना काऊ-बॉय स्टाईलमध्ये २ अप्रतिम फोटो काढले.




पाचवे ठिकाण - गणेशटोक

हे ठिकाण म्हणजे थोड्याशा उंचावर असलेले एक गणेश मंदिर. या मंदिरामध्ये महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे फोटो होते. बोलता बोलता प्रशांतने त्या पुजाऱ्याला आम्ही हे अष्टविनायक ज्या ठिकाणाचे आहेत त्या ठिकाणाहून आलो आहोत हे सांगितले. मंदिरातील अष्टविनायकाचे फोटो पाहून छान वाटले. याही ठिकाणावरून गंगटोक शहराचा बराचसा परिसर एका नजरेमध्ये दिसतो.




सहावे ठिकाण - फुलांचे प्रदर्शन / फुलांची नर्सरी

या ठिकाणी नर्सरीकडे जाण्याच्या पादचारी मार्गाच्या बाजूला सुंदर बाग होती आणि पुढे कारंजे वगैरे होते. नर्सरीत आतमध्ये प्रवेश केल्यावर आम्हाला विविध प्रकारची असंख्य फुले एकाच ठिकाणी पहायला मिळाली. मार्च-एप्रिल मध्ये हीच फुले जर रस्त्याच्या दुतर्फा दिसत असतील तर कसे दिसत असेल, ते पाहताना आपल्याला काय वाटेल असा विचार माझ्या मनात तरळून गेला. प्रशांत साहेबांनी या नर्सरीतील सगळ्या फुलांचे फोटो काढण्यासाठी कॅमेराचा ताबा घेतला होता. 

आम्ही सगळे ही फुले पहात पहात नर्सरीत फिरत होतो तर प्रशांत फुलांचे फोटो काढत काढत आमच्या मागून येत होता. त्या फुलांमध्ये आम्हाला आमचे काही फोटो काढून घ्यायचे होते म्हणून आमचे प्रशांतला विनवणी करणे चालू होते. मग बऱ्यापैकी विव्हळून झाल्यावर प्रशांतला पाझर फुटत होता आणि आमचा एखादं-दुसरा फोटो काढला जात होता. या सगळ्यामध्ये एखादे अप्रतिम फुल दिसल्यावर माझा एकट्याचा त्या फुलाबरोबर फोटो काढण्यासाठी माझी खूप हावहाव चालू होती. अधूनमधून प्रशांत माझ्या या हावरटपणाला कंटाळून माझा एखादं-दुसरा फोटो काढीत होता. नर्सरीमध्ये तासभर वेळ घालवून आम्ही पुढे निघालो. जाता जाता आमच्यातील काही जणांनी फुलांच्या बिया विकत घेतल्या. जाताजाता आम्हाला पुण्यातील एक पंजाबी झोडपे भेटले होते.





सातवे ठिकाण - सिक्किम व्ह्यू पॉइंट

हे ठिकाण पाहण्यासाठी मुख्य रस्त्यावरून थोडेसे अंतर चालून जावे लागते. या ठिकाणाकडे जाताना बरीच माकडे दिसत होती आणि त्यांचे खोड्या करणे चालू होते. माकड/माकडे दिसणे म्हणजे आमच्यासाठी चेष्टा-मस्करी सुरु करण्याचे एक निमित्त असतं. माकडे दिसली रे दिसली कि मग अखंड प्राणीमात्राचे संदर्भ जोडून चेष्टेला सुरुवात. मग चेष्टा करीत करीत आम्ही या ठिकाणापाशी पोहचलो. याच वाटेवर दोन्ही बाजूला मोठमोठी हिरवीगार झाडे होती त्यामुळे चालताना उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. या ठिकाणावरून गंगटोक आणि सिक्किमचा बराचसा परिसर दिसून येतो. याच वाटेवरून जाताना आम्हाला मध्ये एक भरपूर बडबड करणारी पोरगी दिसली. बहुतेक छोटू नानांनी तिच्याबरोबर जुजबी बोलून तिच्याबरोबर फोटो काढून घेतला.




आठवे ठिकाण - असेम्ब्ली पॉइंट आणि रोपवे पॉइंट

वर नमूद केलेल्या ठिकाणाजवळच हे ठिकाण होते. याच ठिकाणी सिक्किम राज्याची / गंगटोक शहराची असेम्ब्ली / assembly होती. दुरूनच तिचे दर्शन घेऊन आम्ही रोपवेकडे प्रस्थान केले. रोपवेमधून पुन्हा  एकदा गंगटोक दर्शन करून घेतले.




नववे ठिकाण - गंगटोक ऐतिहासिक संग्रहालय

येथे गंगटोक मधील जुन्या वस्तू, बौद्ध धर्मियांच्या काही पुरातन वस्तू, हत्यारे संग्रहित करून ठेवण्यात आली आहेत.  येथील वस्तूंमध्ये / बाबींमध्ये मला मानवी हाडांचा बराच वापर केलेला आहे असे जाणवून आले. मानवी हाडांचा वापर करण्याचे कारण काय असावे हे काही कळले नाही आणि नंतर मी शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. बौद्ध धर्माच्या इतिहासात आणि सिक्किमच्या इतिहासात घडून गेलेल्या काही गोष्टी इथे चित्रबद्ध करून संग्रहित करण्यात आल्या होत्या. वरच्या मजल्यावर कदाचित ग्रंथालय असावे. तिथे गेल्यावर सगळीकडे बौद्ध धर्मीय पुस्तकेच पुस्तके दिसत होती. या ठिकाणी आता बोर व्हायला लागले होते आणि कंटाळा यायला लागला होता.




दहावे ठिकाण - बौद्ध मंदिर

हे ठिकाण बौद्ध मंदिरासारखे भासत होते. (बहुतेक बौद्ध लोक आपल्याला मंदिरासारख्या भासणाऱ्या अशा वास्तूंना / ठिकाणांना मंदिर म्हणत नाहीत.) हे मंदिर बंद होते कि बंदच असते हे काही कळले नाही. या मंदिराभोवती भाविकांना प्रदक्षिणा घालण्यासाठी सोय करण्यात आली होती. प्रदक्षिणा मारताना बाजूला पितळेचे / तांब्याचे गोल लोखंडी गोलाकार खांबांवर लावण्यात आले होते. असे बरेच गोल मंदिराभोवती होते. भाविक प्रदक्षिणा घालताना ते गोल फिरवत होते. मला ते गोल फिरवताना मजा येत होती. मग मी ही हे गोल फिरवत फिरवत ११ प्रदक्षिणा मारून घेतल्या. मंदिराजवळच तेलाच्या दिव्यात वाती लावण्याचे आणि दिवे लावण्याचे काम चालू होते. इथेही काही फोटो काढून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. 



आता सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या म्हणून तिथेच जवळ असलेल्या टपरीवर चहा, बिस्कीट, मॅगी, आणि मोमो खाऊन घेतले. शेवटी या ठिकाणी आम्हाला सिक्किमचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ मोमो खायला मिळाला. आम्हाला मोमो काय इतका आवडला नाही तो भाग निराळा. मोमो म्हणजे आपल्याकडील उकडलेले मोदक आहेत असे वाटत होते. आपण मोदकांमध्ये जसे गुळ खोबरे घालतो तसे मोमोमध्ये कोबी आणि काही भाज्या/पदार्थ घातलेले असतात. या ठिकाणी टॅक्सी चालक लवकर चला, मी तुम्हाला आणखी २ भारी पॉइंट दाखवतो असे म्हणत होता पण तो त्यासाठी वेगळे पैसे घेणार होता त्यामुळे तो प्रस्ताव नाकारून आम्ही हॉटेलवर परत जाणे पसंद केले.
हॉटेलवर पोहचल्यावर ताजेतवाने / फ्रेश / fresh होऊन थोडावेळ विश्रांती घेतली. नंतर चहा घेऊन सगळे जण मिळून बाजारपेठ फिरण्यासाठी बाहेर पडलो. छोटू नानांना काही कपडे खरेदी करायचे होते म्हणून आम्ही फिरत होतो आणि कपड्यांच्या दुकानात स्वतःसाठीदेखील कपडे पाहत होतो. समीरने त्याच्यासाठी एक टी-शर्ट निवडला होता पण तो त्याच्या मापाचा नव्हता आणि नेमका तोच टी-शर्ट मलादेखील आवडला. तो टी-शर्ट माझ्याच आकाराचा असल्याने मी लगेच घेऊन टाकला. त्यानंतर शहीद कामठे यांच्यासारखे एक जर्किन आणि आणखी एक टी-शर्ट घेतला. कपडे खरेदी करण्याच्या वेळी भूक लागल्या कारणाने थोडेसे गोड खाऊन घेतले. कपड्यांच्या दुकानांमध्ये बराच वेळ घालवून थोडीफार खरेदी करून आम्ही जेवणासाठी पुन्हा गांधी रस्त्यावरील बाजारपेठेत गेलो. मस्तपैकी जेवण करून पुन्हा हॉटेलवर जाऊन नेहमीप्रमाणे पत्ते, गप्पा, मस्ती, आणि सरते शेवटी झोप ... उद्या ७ वाजता नथूला (भारत - चीन सीमा) ला निघायचे होते. 
संध्याकाळी दीपकबरोबर झालेल्या बोलण्यानुसार उद्या अनुपच आमच्याबरोबर येणार होता. 

पाचव्या दिवसाचा एकूण खर्च: रु. ४८७१ /- फक्त.


- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) (+ ९ १ ९ ९ ६ ० ७ ८ ८ २ ८ ०)


रविवार, २५/०९/२०११

सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

सिक्कीम प्रवास वर्णन – दिवस चौथा



बुधवार, ०३/११/२०१०.

कालच्याला आमच्या ड्रायव्हर साहेबांनी अनुपने भल्या पहाटे ०५:०० वाजता निघुयात म्हणून सांगितले होते. त्याने हे सांगितले होते खरे पण साहेब काल रात्री बिअर/दारू पिऊन तुंग होते त्यामुळे साहेब ०५:०० वाजता उठू शकतील कि नाही याबद्दल आम्हाला शंका वाटत होती.

ठरल्याप्रमाणे पहाटे ०३:३० वाजता उठून मी शाही स्नान करून घेतले आणि माझे आवरून घेतले. माझे आवरून झाल्यावर बाकीच्यांना एक एक करून उठवायला सुरुवात केली. अनुप साहेब ०५:०० वाजता उठले होते. सर्वांचे आवरून झाल्यावर निघताना चहा घेतला तर तो कालचा रात्रीचाच असल्याचे जाणवून आल्याने आम्ही अर्धवट चहा किंवा चहा न घेताच साधारण ०५:१५ वाजता झिरो पॉइंट या स्थळाला भेटण्यासाठी निघालो. निघताना इथे लाचेनपेक्षा कमी थंडी जाणवत होती. पण झिरो पॉइंटला आणखी जास्त थंडी/गारठा आणि थंड वारे वाहते याबद्दल प्रशांत/अनुप ने आगोदरच सांगितले होते त्यामुळे मी कालच्याप्रमाणेच माझी गरम कपड्यांची संपत्ती बरोबर घेतली होती आणि झिरो पॉइंटवर उस्ताहपूर्वक गोंधळ घालण्यासाठी कालच्याप्रमाणेच स्वत:ला गरम कपड्यांमध्ये गुंडाळून घेतले होते.



झिरो पॉइंटच्या प्रवासामध्ये एकदा निघाल्यानंतर झिरो पॉइंटवरच थांबायचे होते. आणि आमचा हा प्रवास कालच्याप्रमाणेच अंधेरी दुनियेतील डोंगरांवरील बर्फाच्या साम्राज्याचे दर्शन घेत, डोंगरांवरील छोट्या/मोठ्या झाडांचं आणि पडणाऱ्या बर्फाचं नातं/करारनामा पाहत, गप्पा मारत, एकमेकांची चेष्टा-मस्करी करीत चालला होता.

झिरो पॉइंटचा रस्ताही बऱ्यापैकी घाटातून होता आणि पुढे पुढे तर कधी उजव्या बाजूला, कधी डाव्या बाजूला, तर कधी दोन्ही बाजूला पूर्णपणे मोकळा परिसर होता आणि या मोकळ्या परिसराच्या पलीकडे एखादा उंचच उंच डोंगर, कधी अर्धवट बर्फाने माखला गेलेला डोंगर तर कधी पूर्णपणे बर्फाने कवटाळलेला डोंगर, नदी किंवा वाहत्या पाण्याचा प्रवाह असे दृश्य होते.


रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे हे नैसर्गिक सौंदर्य आम्ही डोळ्यांमध्ये साठवून पुढे पुढे जात होतो. साधारण तासाभराने उजाडायला सुरुवात झाली होती. ज्याप्रमाणे इथे अंधार खूप लवकर पडतो त्याप्रमाणे इथे उन्हही खूप लवकर पडते. साधारण सकाळच्या ०५:३० - ०५:४५ पासूनच उन्ह पडायला सुरुवात होते. सकाळच्या उन्हामुळे पर्वतशिखरे पिवळसर दिसत होती आणि निसर्ग अजूनच नयनरम्य दिसू लागला होता. जसजसे पुढे जात होतो तसतसे आम्हाला दुरवर असलेल्या डोंगरांवर पडलेले उन्ह दिसत होते आणि त्यावेळेला आम्ही मात्र सावलीतुन जात आहोत असे वाटत होते. पुढे एका ठिकाणी दुरवर असलेल्या एका डोंगरावर आम्हाला ३ मोठेच्या मोठे सुळके दिसत होते. पुढे एका ठिकाणी अनुपला बर्फामध्ये खेळण्यासाठी गाडी थांबवायला सांगितले तर त्याने सांगितले कि झिरो पॉइंटला याच्यापेक्षा जास्ती बर्फ आहे तिथेच मस्ती करून घ्या.


साधारण ०७:१५ - ०७:३० च्या दरम्यान आम्ही झिरो पॉइंट या ठिकाणी पोहचलो. झिरो पॉइंट म्हणजे एक मोठाच्या मोठा खुला परिसर होता. त्याच्यामधून पर्यटकांसाठी एक रस्ता होता. हा रस्ता इथेच संपतो आणि यापुढे गाडी घेऊन जाता येत नाही. एका बाजूला साधारण खुल्या परीसरापलीकडे बर्फांच्छादीत डोंगर होते. दुसऱ्या बाजूला थोड्याश्या अंतरावरून वाहणारी अतिशय स्वच्छ पाणी असलेली नदी (किंवा पाण्याचा प्रवाह) आणि त्याच्या पलीकडे पुन्हा मोकळा परिसर व साधारण जंगल. रस्त्याच्या उजव्या बाजूला खाद्यपदार्थ विक्री करणारे लोक बसले होते.



है साला, झिरो पॉइंटवर गाडी थांबली रे थांबली कि आम्ही हावऱ्यासारखे गाडीतून बाहेर आलो आणि हुल्लडबाजी करायला सुरुवात केली. बाहेर आलो तर थंड बोचरा वारा जोराने वाहत होता आणि झिरो पॉइंट खुपच उंचावर असल्याने श्वासोच्छवासास त्रास होत होता. मग सगळेजण पळत पळत बर्फात खेळण्यासाठी म्हणून एका ठिकाणी गेलो आणि एकमेकांस बर्फाने मारण्यास सुरुवात केली. एकेकट्याला एकेकट्याने व्यवस्थितपणे बर्फ मारता येईना आणि जास्ती मजा पण येईना म्हणून टोळ्या तयार करून एखाद्याला बर्फ मारायचा प्रयत्न सुरु झाला आणि पळापळी सुरु झाली. पळापळी सुरु झाली रे झाली कि जास्तीत जास्त ४५ - ५० सेकंदात आम्ही सगळे गारद - कारण होते श्वासोच्छावासासाठी होणारा त्रास आणि बोचणारे थंड वारे. मग धावपळ थांबवून आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि काही एकत्रित फोटो काढून घेतले.




धावपळीत सगळ्यांचे चेहरे लालभडक झाले होते आणि छोटे सरकार पुरते गारद झाले होते. त्यांना थंडी अजिबात सहन होत नव्हती त्यामुळे त्यांनी माघार घेऊन गाडीत जाऊन बसणे पसंद केले होते. पळापळी केल्यामुळे प्रशांतलाही चक्कर आल्यासारखे वाटत होते त्यामुळे तो ही समीरबरोबर थोड्या वेळासाठी गाडीत जाऊन बसला होता.  ते दोघे गेल्यानंतर आम्ही आणखी काही स्वतःचे फोटो काढून घेतले - काही नदीजवळ, काही बर्फावर लोळताना वगैरे वगैरे. इथे इतकी थंडी होती कि जर तुम्ही थुंकलात तर तुमची थुंकी बर्फ होऊन जमिनीवर पडत होती. कदाचित तुम्हाला हे अतिशयोक्ती वाटेल पण तिथे खरचं इतकी थंडी होती.

या ठिकाणी फिरून झाल्यावर आम्ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला देखील फिरायला गेलो आणि एखादं-दुसरा फोटो काढून घेतला. तसे पाहता बहुतेक आम्हीच सर्वात आगोदर किंवा दुसरे / तिसरे झिरो पॉइंटवर पोहचलो होतो आणि आता हळूहळू गर्दीही वाढू लागली होती. मला या ठिकाणी एखादा स्टायलिश/हटके फोटो काढून घ्यायचा होता. मग प्रशांतला विनंती करून मी तसा फोटो काढून घेतला. झिरो पॉइंटवर मी इतका उस्ताही होतो कि काही मिनिटांसाठी मी उघडादेखील फिरू शकलो असतो.


हे नैसर्गिक सौंदर्य पाहून डोळ्यांचे समाधान झाले असले तरी पोटाचे समाधान करणे अजून बाकी होते. मग काय तेथेच उभे असलेल्या लोकांकडून उकडलेले हरभरे, अंडा-ऑम्लेट, जाम-ब्रेड, चहा या पदार्थांवर आम्ही ताव मारला. छोटे सरकार पार गारठून गेले होते आणि जर कुणाकडून गाडीचा दरवाजा चुकून उघडा जरी राहिला तर साहेब चीडचीड करीत होते. गारठलेल्या अवस्थेमुळे साहेबांना प्रत्येक गोष्ट हातात द्यावी लागत होती. गारठलेल्या अवस्थेतून बाहेर यावे म्हणून तेथेच असलेल्या रम विक्रेत्याकडून त्याने एक ग्लासभर रम घेतली आणि पिली. रम पिल्यानंतर त्याला थोडे बरे वाटू लागले. त्यानंतर त्याने फक्त टी-शर्ट वर आणि अनवाणी पायांनी त्या ठिकाणी फेरफटका मारला.

बोचरा वारा अजूनच जोरात वाहत होता. मी खाताना देखील हातात हातमोजे घालून खात होतो. सकाळची न्याहरी व्यवस्थितपणे उरकून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. आमच्या परतीच्या मार्गावर वाटेत एक झिरो पॉइंटकडे जाणारी गाडी बंद पडली होती. मग त्या गाडीला मदत करण्यासाठी अनुपने आमची गाडी तिथे थांबवली. आमच्या गाडीप्रमाणेच आगोदरच काही गाड्या तिथे मदतीसाठी थांबल्या होत्या आणि त्या मार्गावरून जाणाऱ्या सगळ्या गाड्या थांबत होत्या. बराच वेळ झाला तरी ही गाडी चालू होत नव्हती म्हणून अनुपला आम्ही आपण निघुयात म्हणून विनंती केली पण तो काही निघाला नाही. बंद पडलेली गाडी सुरु होईपर्यंत एकही गाडी तिथून हलली नाही. ती गाडी सुरु झाल्यावरच बाकीच्या गाड्यांनी पुढील प्रवासास सुरुवात केली. सिक्किममधील एकमेकांना मदत करण्याची ही वृत्ती खरचं खूप नावाजण्यासारखी आहे. अहो इथे महाराष्ट्रात मी लोकांना मदत करणाऱ्यांचा उद्धार करणारे आणि त्यांची कळा खाणारे लोक पाहिले आहेत आणि त्याचा स्वतःही अनुभव घेतला आहे. असोत ... गाडी चालू व्हायला बराच वेळ लागत होता म्हणून आम्ही पुन्हा एकदा फोटो सेशन करून घेतले आणि परतीच्या मार्गावरून पदयात्रा करून घेतली.


मग पुढे युंगथान व्हॅली या ठिकाणी थांबलो. या ठिकाणी उजव्या बाजूला बर्फाच्छादित डोंगर आणि डाव्या बाजूला मोकळा परिसर, नंतर स्वच्छ पाण्याची नदी, आणि त्यापलीकडे जंगल होते. मग गाडीतून उतरून थोडेसे अंतर चालून आम्ही नदीकडे निघालो. जाताजाता वाटेमध्ये सर्वांनी वेगवेगळया पद्धतीने स्वतःचे फोटो काढून घेतले. पुढे वाटेत एक भला मोठा दगड होता त्यावर उभे राहून, नंतर सर्वजण एकदम त्या दगडावरून उडी मारतानाचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण तो काय एवढा यशस्वी झाला नाही. मग पुढे पुन्हा नदीकाठी आणि नदीमध्ये असलेल्या एका दगडावर बसून सर्वांनी छोटू नानाचा गॉगल घालून वेगवेगळया छटांमध्ये स्वतःचे फोटो काढून घेतले. नदीकाठीसुद्धा गर्दी वाढायला लागली होती आणि हिरवळही वाढायला लागली होती. मग इथली हिरवळ वगैरे पाहून इकडे तिकडे थोडावेळ उंडारून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. परत जाण्याच्या वेळेला नदीकाठी कदाचित आम्हाला एक महाराष्ट्रीयन समूह भेटला होता.



युंगथान व्हॅलीच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही / बहुतांशी वेळा साधारण मार्च-एप्रिल मध्ये इथे रस्त्याच्या दुतर्फा फुले उगवलेली असतात आणि हे नैसर्गिक दृश्य खूप नयनरम्य असतं. मार्च आणि एप्रिल मध्ये सिक्किम मध्ये फुलांचा आंतरराष्ट्रीय महोस्तव होतो आणि तो पाहण्यासाठी परदेशातून पर्यटक येत असतात म्हणे. सध्या सिक्किममध्ये एकही विमानतळ नाहीये पण आम्हाला तेथील लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१२ पर्यंत इथे एक विमानतळ तयार होणार आहे. जेंव्हा हे विमानतळ तयार होईल तेंव्हा त्याचा पर्यटनासाठी खूप खूप खूप फायदा होईल.

युंगथान व्हॅलीनंतर आम्ही गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणी गेलो. झऱ्यापाशी जाण्यासाठी रस्त्यापासून थोडेसे अंतर चालावे लागते. चालत असताना वाटेत नदीवर बांधलेला लाकडी पूल लागतो. या ठिकाणी काही फोटो काढून पुढे जाऊन आम्ही गरम पाण्याचे झरे पाहून घेतले. या ठिकाणी फोटो काढताना आमच्यातील   कोणीतरी पाण्यात पडले होते. तेथे काही महाराष्ट्रीयन मंडळी भेटल्यानंतर त्यांच्याबरोबर गरम पाण्याच्या झऱ्यांचे महत्व, फायदे, असे झरे कुठे कुठे आहेत, सिक्किममध्ये काय काय पाहिले आणि आणखी पाहण्यासारखे काय आहे या विषयांवर चर्चा करून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.

परतीच्या मार्गावर वाटेत एका ठिकाणी पिण्यासाठी बिअर/दारू मिळत होती. त्या ठिकाणी छोटू नाना आणि समीर आमच्या आगोदर हजर. हे बिअरचे दुकान २ सुंदर मुली सांभाळत होत्या. मग काय छोटू नानांनी त्या मुलींकडून बिअर मागून घेतली आणि बिअर पीत पीत तो आणि समीर या दोघींशी बोलत बसले.छोटू नानांना बिअर आवडली नाही म्हणून त्याने समीरला दिली. आम्ही तिथे पोहचल्यानंतर आम्हाला हे दृश्य पहायला मिळाले. असे म्हणतात ना कि "रम रमा रमी" च्या पाठीमागे लागू नये. पण आमच्या समूहामध्ये "रमी" (बिन पैशाची) रोजच होतेय, "रम" सकाळीच झाली, आता काय जणू "रमा" चीच बाकी होती म्हणून कि काय छोटू नानांचा असा कारभार चालू होता. छोटू नाना कौशल्यपूर्ण पद्धतीने त्या दोघींशी बोलत होते आणि छोटू नानाचे हे कौशल्य आम्ही न्याहाळत तिथे बसलो होतो. बिअर पिऊन झाल्यावर छोटू नानाने त्या २ पोरींबरोबर त्यांच्या गळ्यात हात घालून फोटो काढून घेतले. फोटो काढून तेथून निघताना त्या २ पोरींमधील एक पोरगी छोटू नानाला "मुझसे शादी करो और मुझे तुम्हारे साथ ले चलो" म्हणाली. मग काय छोटू नानाने "ठीक है| चलो हमारे साथ|" म्हटलं. पण ती पोरगी नंतर नको म्हणाली आणि आम्ही तिथून परत निघालो.

तिथून मग आम्ही हॉटेलवर परत आलो. जेवणाची तयारी होईपर्यंत बॅगा आवरून घेतल्या, झिरो पॉइंटचे फोटो वगैरे पाहून घेतले. थोड्याच वेळात जेवणासाठीचा निरोप आल्यानंतर जेवण करून घेतले. आजचे ही जेवण छान झाले होते. जेवण झाल्या झाल्या सगळे सामान गाडीवर बांधून निघायची तयारी करून घेतली. या हॉटेलमधील जेवण आवडल्याने इथल्या पोरांना खुशी देऊन आम्ही निघण्याच्या तयारीत होतो पण हॉटेलमधील दोघांना दिवाळीसाठी म्हणून त्यांच्या घरी जायचे होते त्यामुळे त्यांनी आम्हाला आमच्याबरोबर गाडीत येण्यासाठी विनंती केली होती. पण आम्ही ७ जण असल्याने एक जण येऊ शकतो असे सांगितले. त्या दोघांना मिळूनच यायचे होते आणि आम्ही दोघांना गाडीत घेऊ शकत नव्हतो. त्यामुळे ते दोघे नाराज झाल्याचे जाणवून येत होते पण त्याला काही पर्याय नव्हता. अशा प्रकारे इथला मुक्काम हलवून आम्ही गंगटोकच्या दिशेने आगेकूच केली.

पुढील प्रवासात आमचीदेखील गाडी एका ठिकाणी बंद पडली होती. गाडीचा गाडी वळवण्यासाठी वापर केला जाणारा कोणता तरी दांडा खराब झाला होता आणि त्यामुळे अनुपला गाडी वळवताना वगैरे थोडासा त्रास होत होता. कदाचित अनुपला तो खराब होत आलेला आहे याची पूर्वकल्पना असावी कारण त्याने नवीन दांडा गाडीमध्ये ठेवला होता. खराब झालेला दांडा काढून नवीन बसवण्यासाठी गाडीचे चाक हाताने वळवावे लागत होते आणि ते आम्हाला लवकर जमत नव्हते. थोडेसे प्रयत्न केल्यानंतर आम्हाला ते शक्य झाले आणि तो दांडा बदलला गेला. जिथे गाडी बंद पडली होती त्याच्याजवळच डोंगराच्या पायथ्याला हायड्रो प्लांटसाठी बोगद्याचे काम चालू होते. हे काम चालू असताना प्रशांत आणि समीरने येथे असलेल्या काही नवीन फुलांचे फोटो काढून घेतले. अनुपनेही काल घडलेल्या एका अपघाताची बातमी आम्हाला सांगितली.

झिरो पॉइंट, युंगथान व्हॅलीच्या प्रवासामुळे आम्ही थोडेसे/बरेच आळसावलो/थकलो होतो. मग आमच्यातील काही जणांनी गंगटोकच्या प्रवासाच्यावेळी गाडीमध्ये डुलक्या मारून घेतल्या. अंधार पडण्याच्या वेळेला आम्ही सिक्किम प्रवास वर्णन - दिवस दुसरा मध्ये नमूद केलेल्या हॉटेलमध्ये चहापाण्यासाठी थांबलो. तिथे पोहचल्यावर पुन्हा त्या हॉटेलमधील बोलक्या बाहुलीचे संभाषण ऐकून/पाहून तिथे थोडा वेळ घालवून आम्ही पुढे निघालो. पुढे एका ठिकाणी वाटेत एक मोठा दगड होता आणि तो अंधार पडल्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हता. त्या दगडाच्या अगदी जवळ पोहचल्यावर अनुपला तो दगड दिसला आणि त्याने समयसूचकतेने गाडी वळवल्याने आमचा अपघात टळला. जर अनुपने समयसूचकता दाखवली नसती तर आमचा भयानक अपघात होण्याची शक्यता होती. अपघात प्रसंगातून वाचल्यानंतर साधारण तासाभराने आम्ही गंगटोक मधील आमच्या हॉटेलजवळ पोहचलो. ३ दिवसापासून अनुप आमच्याबरोबर होता आणि आमची छान मैत्री ही झाली होती. ३ दिवसाच्या अनुपच्या कामगिरीवर खुश होऊन आम्ही त्याला खुशीदेखील दिली.

उद्याचा दिवस सोडून परवा दिवशी आम्हाला नथूला (भारत - चीन सीमा) ला जायचे होते. सिक्किममध्ये भाडे तत्वावर चालणाऱ्या गाड्या सिक्किममधील दोन भागांमध्ये विभागल्या आहेत. एक म्हणजे लाचेन-लुचांग वगैरे वगैरे आणि दुसरे म्हणजे नथूला. या विभागामुळे अनुप आणि अनुपची गाडी आमच्याबरोबर नथूलाला येऊ शकणार नव्हती. पण आता अनुपबरोबर चांगली ओळख झाली होती आणि तो ही आमच्यामध्ये मिळून मिसळून वागत होता त्यामुळे त्यानेच आमच्याबरोबर नथूलाला यावे असे आम्हा सर्वांना वाटत होते. आणि त्याप्रमाणे आम्ही तशी विनंतीही त्याला केली पण तो सिक्किमच्या भाडे तत्वावर चालणाऱ्या गाड्यांचे नियम सांगत होता. शेवटी त्याने "दीपक$ से$ बात$$ कौर$ के$ देखोता$ हू$$ |" असे उत्तर दिले आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.


आम्ही थोडा वेळ विश्रांती घेऊन सगळं आवरून घेतलं, चहा घेतला, आणि सगळे मिळून गंगटोकमधील गांधी रस्त्यावरील बाजारपेठेत फिरण्यासाठी गेलो. आता दिवाळी सुरु झालेली असल्याने बाजारपेठेत फटाकेबाजी वगैरे चालू होती. हे सर्व पाहत बाजारपेठेत आम्ही उंडराउंडरी करून घेतली. फिरून झाल्यावर शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन समूह करून आम्ही दोन वेगवेगळया हॉटेलमध्ये जेवायला गेलो. जेवण झाल्यावर मी आणि प्रशांतने उद्या गंगटोक फिरण्यासाठी टॅक्सीची चौकशी करून घेतली आणि किती पैसे लागतील याचा अंदाज बांधून घेतला. हॉटेलवर गेल्यावर पुन्हा नेहमीप्रमाणे पत्ते, मस्ती, गप्पा, आणि फोटो पाहणे वगैरे वगैरे चालू झाले. मागील ३ दिवसात रोज लवकर उठावे लागत असल्याने उद्या ८ वाजता बाहेर पडायचे ठरवून सगळ्यांनी अंथरुणात प्रवेश केला.

चौथ्या दिवसाचा एकूण खर्च: रु. १५६७/- फक्त.

टीप: हे टिपण लिहिताना मी बऱ्याच गोष्टी विसरलो होतो. हे टिपण लिहिण्यासाठी प्रशांत घोळवे ची खूप मदत झाली. त्याबद्दल त्याचे आभार.



- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) (+ ९ १ ९ ९ ६ ० ७ ८ ८ २ ८ ०)
सोमवार, १९/०९/२०११

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११

सिक्कीम प्रवास वर्णन – दिवस तिसरा



मंगळवार, ०२/११/२०१०.


कालच्याला आमच्या ड्रायव्हर साहेबांनी अनुपने मध्यरात्री ०४:०० वाजता निघायचे आहे म्हणून सांगितले होते. कारण गुरुडोंगमार परिसरातील वातावरण कधीही खराब होऊ शकते, तिथे या काळात कधीही पाऊस पडू शकतो. कालच या परिसरातील हवामान खराब होऊन इथे बर्फ पडून गेला होता. त्यामुळे आमच्या ड्रायव्हर साहेबांच्या मनातच सिक्कीमी पाल चुकचुकत होती की, आज गुरुडोंगमार तलावापर्यंत आपण जाऊ शकू की नाही म्हणून. तसेच वाटेत सैनिकांचा तळ असल्याने हवामान थोडेही खराब झाले किंवा खराब होण्याची चिन्हे दिसू लागली की हे सैनिक कोणत्याच गाडीला पुढे जाऊ देत नाहीत. तर असा हा परिस्थिती प्रपंच ध्यानात घेऊन आम्ही काल झोपेला आमच्या कुशीत घेतले होते. ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या वेळेनुसार भ्रमणध्वनीवर गजर लावले होते. कालच्याला थंडीने माझ्यावर वर्मी घाव घालून मला भयानक घायाळ केलेले असल्याने माझ्याकडून चुकून मध्यरात्रीच्या ०२:४५ ऐवजी ०३:४५ चा गजर लागला गेला होता.



योगायोगाने छोटूनानांनी ०३:१५ चा गजर लावलेला होता त्यामुळे छोटूनाना ०३:१५ ला उठले आणि त्यांनी सगळ्यांना उठवायला सुरुवात केली. मी छोटू नानाच्या शेजारी झोपलो होतो त्यामुळे त्याने मला पहिला उठवले. उठल्या उठल्या मी किती वाजले पाहिले आणि तेंव्हा मला कालच्या थंडीचा वर्मी घाव गजराच्या चुकीच्या वेळेला जबाबदार आहे हे समजले. उठल्यावर मला कालच्या इतका त्रास होत नव्हता आणि बराच उस्ताह ही जाणवत होता. मग छोटू नानाने आळीपाळीने सगळ्यांना उठवायला सुरुवात केली. चुकून त्याने एका खोलीमध्ये आपली पोरे आहेत असे समजून खोलीचा दरवाजा जोरात वाजवला. दरवाजा उघडून दुसरीच व्यक्ती बाहेर - J. त्या खोलीतील पोरांनाही लवकर उठायचेच होते वाटते बहुतेक. छोटू नानांच्या चुकीचा त्यांना फायदाच झाला कदाचित. मग छोटू नाना ड्रायव्हर साहेबांना उठवायला गेले तर साहेब एकदम सॉल्लिड्ड साखरझोपेत.  कदाचित १-२ हाकेत काही उठले नाहीत. मग अनुपने स्वत:चं सगळं आवरून गाडी तपासून इंजिन गरम होण्यासाठी चालू करून ठेवली. काल रात्री गरम पाण्याचा लोचा झालेला होता म्हणून गिजर रात्रीपासून चालू ठेवला होता. पण थंडीमुळे हॉटेलवरील टाक्यांमधील पाण्याचा बर्फ झालेला असल्याने आम्हाला काय गरम पाणी व्यवस्थित मिळालं नाही. गरम सोडा हो पण थंड पाणीदेखील पुरेसे मिळालं नाही. मग काय जेमतेम पाण्यात सकाळचे विधी उरकून आंघोळ न करता साधारण ०४:१५ वाजता आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो आणि गाडीजवळ आलो.



  
मी आपला मात्र कालच्यासारखा एकदम फुलटू पॅक – अंगामध्ये बनियन, त्यावर टी-शर्ट, त्यावर स्वीट- शर्ट, त्यावर स्वेटर, त्यावर जर्किन, कानाला कानटोपी आणि वरून स्वीट- शर्टची पण कानटोपी, तोंडाला रुमाल, हातात हातमोजे, ट्रॅक पॅंट, जीन्स, पायामध्ये २ मोज्यांचे जोड आणि बुट, आणि टॉवेल. बाद मे कल जैसा थंडी का टेन्शन नाही मांगता भाई - J.




लाचेनच्या हॉटेलमधील नमूद करण्यासारखी एक बाब म्हणजे आम्ही हॉटेलमधून बाहेर पडताना खोल्यांना कुलुपे लावली नव्हती. इतके लाचेनचे लोक विश्वासू जाणवून आले आणि आहेत. गंगटोकमध्ये थोडासा वेगळा अनुभव आला तो भाग निराळा.



हॉटेलच्या बाहेर आल्या आल्या आम्हाला आभाळामध्ये एक अतिशय सुंदर असे दृश्य दिसले आणि त्यामुळे सगळ्यांचा हुरूप आणखीनच वाढला. ‘हा तो तारा’, ‘हा तर तो तारा’ असे म्हणत म्हणत १-२ फोटो काढून घेतले. पहिले काढलेले ३ फोटो काळेकुट्ट निघाले बरं का! आमच्या बरोबर आमचे शि. का. कार्यकर्ते असते तर ते एकटेच त्या ३ फोटोंमध्ये दिसले असते बर का - J. फोटो काढून झाल्यावर आम्ही गुरुडोंगमार तलावाकडील प्रस्थानास सुरुवात केली. काल संध्याकाळी/रात्री बर्फाने आच्छादलेले डोंगर पाहिल्याने आम्हा सगळ्यांना उस्तुकता लागून राहिली होती.




उजाडेपर्यंत पांढऱ्या बर्फाशिवाय जास्ती काही दिसत नव्हते त्यामुळे आम्ही गप्पाटप्पा/चेष्टा-मस्करी करीत होतो. प्रवास सुरु झाल्यावर थोड्या वेळाने कमी कापडं (गरम कपडे) घातलेल्यांना थंडीचा त्रास जाणवू लागला म्हणून मी माझ्याकडील २ शाली त्यांच्याकडे सुपूर्त केल्या. शाली देऊनही आव्हाडांना थंडी त्रास देतच होती म्हणून माझ्या गरम कपड्यांच्या संपतीतील एक जर्किन आव्हाडांना दिले. उजाडल्यावर आम्ही एका ठिकाणी पाय मोकळे करण्यासाठी थांबलो आणि काही फोटो काढून घेतले.





मग परत गप्पा मारत मारत सिक्कीमचा निसर्ग पहात पहात आम्ही पुढे निघालो. काल रातच्याला/रात्रीला/रात्री माझे जेवण व्यवस्थित झाले नव्हते त्यामुळे माझ्या पोटात कावळे कावकाव करीत होते. कडाडून भूक लागली होती. बाकीच्यांनाही भूक विनवण्या करीत होती की न्याहरीसाठी कधी थांबता म्हणून? सर्वजण सकाळच्या न्याहरीचा विचार करताहेत न करताहेत तोपर्यंत आम्ही न्याहरीच्या ठिकाणापाशी पोहचलोही. हे ठिकाण म्हणजे सिक्कीममधील सैनिकी परिसरातील एक छोटसं गावठाणच भासत होतं. कदाचित हा सैनिकांचा तळ ही असावा. या भागातून सैनिकांची परेडदेखील चालू होती. न्याहरीची तयारी पूर्ण होईपर्यंत आम्ही त्या छोट्याश्या भागात उंडराउंडरी करीत तेथील निसर्ग आमच्या डोळ्यांमध्ये जतन करून ठेवित होतो तसेच आठवणींसाठी म्हणून कॅमेरामध्ये सुद्धा आणि तेही आमच्या सर्वांच्या विविध, विचित्र, आणि गमतीदार छटांसहित. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १४००० फुट उंचीवर आहे.








या ठिकाणी आम्ही पोट भरून गरमागरम मॅगी, चहा, आणि बिस्कीट खाऊन घेतले. मॅगी छान झाली होती. मॅगी खाऊन झाल्यावर वरून मॅगीचा रस्सा पण पिला. थंडीच्या कारणाने काहींनी बासरीवादन करून घेतले (कदाचित कधी नव्हे ते). इतरांनी कानटोप्या आणि मफलर विकत घेतल्या. इथे साधारण ४५ मिनिटे ते तासभर मस्त वेळ घालवून आम्ही गुरुडोंगमार तलावाकडे प्रस्थान केले.


म्हणता म्हणता आम्ही गुरुडोंगमार तलावापाशी पोहचलोही. पोहचलो तर है साला, वाहनतळासाठी हे भली मोठी मोकळी जागा, समोर तलाव, आणि त्याच्यासमोर बर्फाने पूर्णपणे आच्छादलेले डोंगर. आता ह्या भल्या मोठ्या मोकळ्या जागेमुळे धारा मारायचे वांदे झाले ना राव. मग काय, कशीबशी आडोशाची जागा शोधून (अहो आडोसा काय म्हणता – १-२ जीपड्यांच्या मागे जाऊन म्हणा) धारा मारून घेतल्या आणि हे सन्नाट तलावाजवळ.



जेंव्हा आम्ही पळत पळत तलावाकडे निघालो तेंव्हा समोरील डोंगर उन्हामुळे चमकत असल्यामुळे सोनेरी दिसत होते आणि अशा सोनेरी डोंगरांसमोर हे तलाव खूपच अप्रतिम दिसत होते. हे तलाव वाहनतळापासून थोड्याशा खालच्या उंचीवर होते आणि तलावाकडे जाण्यासाठी पायऱ्या होत्या. जवळच एक मंदिर होते. मग काय आम्ही सनासना पायऱ्या उतरून तलावाजवळ गेलो. गुरुडोंगमार तलाव समुद्रसपाटीपासून १७१०० फुट उंचीवर असल्यामुळे पळताना आणि पायऱ्या उतरताना श्वास घेताना त्रास होत होता, लगेच थापा लागत होत्या. तलावाजवळ गेल्यावर जो तो आपआपल्या परीने तेथील निसर्ग डोळ्यात साठवून घेत होता. त्यामानाने या ठिकाणी मंदिरामध्ये आणि मंदिराजवळ बरीच गर्दी होती. तिथे आलेल्या भाविकांची अशी श्रद्धा होती की, त्या तलावाच्या पाण्यामध्ये किंवा पाण्याजवळ जर एकावर एक असे काही दगड ठेवले आणि मनात एखादी इच्छा धरली तर ती पूर्ण होते. मग आमच्यातील काही भावुक मंडळी इच्छापूर्तीच्या निमित्ताने तिकडे गेले तर काहीजण निसर्ग पहात फोटो काढून घेण्यासाठी आपला क्रमांक/नंबर कधी येईल याचा अंदाज घेत निसर्ग न्याहाळत होते. आणि यात आणखी एक भर म्हणजे आमच्याकडे छोटू नानाचा एकच भारीचा गॉगल होता. थोडक्यात लोचा असा होता की – कॅमेरा एक, गॉगल एक, आणि फोटोसाठी हपापलेले जीव अनेक. त्यात दुष्काळग्रस्ती माझा फोटोसाठी हावरेपणाचा कळस. वा वा वा!

फोटो



मी म्हणजे गायकवाडांचं आवलीपीर कारटं. पाणी दिसणे आणि पाण्यामध्ये उतरणे नाही? नामंजूर नामंजूर नामंजूर! मग पाण्यात उतरून फोटोग्राफरला विनंती करून १-२ फोटो काढून घेतले आणि स्वत:चं समाधान करून घेतलं.


मग गुरुडोंगमार तलावाजवळील निसर्गाचा परिसर डोळ्यांमध्ये साठवून आम्ही परतीच्या प्रवासास सुरुवात केली. गाडीत बसल्यावर माझ्या पाण्यात उतरण्याबद्दल ड्रायव्हर साहेब अनुपबरोबर बोलणं झालं तर तो म्हणाला की, पोनी थांडा होता है$$, उतरना$ नही$ चॉहिये$$|. आता अनुपचा आमच्यावरील राग उतरला होता आणि तो आमच्यामध्ये थोडाफार मिसळायलाही लागला होता पण पूर्णपणे नव्हे.

परतीच्या मार्गावर आम्हाला कुठे याक प्राण्यांचा मोठा कळप दिसला तर कुठे मध्येच एखादं-दुसरा एकटा याक दिसला. एकट्या याकचा अगदी जवळून फोटो काढण्याचा विचार चालू होता पण अनुपने सांगितले की, हे रानटी/जंगली याक आहेत, सरळ हल्ला करतात. त्यामुळे लांबूनच फोटोगिरीचे उद्योग करा..

याक प्राण्यांचा कळप मागे गेल्यावर आम्हाला पुढील परतीच्या वाटेवर काही ठिकाणी बर्फाने आच्छादलेले डोंगर, बिनाबर्फाचे दगड-मातीचे डोंगर, बर्फाने काही ठिकाणी आच्छादन निर्माण केलेलं छोटसं तलाव (थोडसं मोठं डबकं), पूर्ण जमीन बर्फाने आच्छादलेली पण गाड्यांच्या येण्याजाण्याने तयार झालेला तेवढासाच मातीचा रस्ता, सैनिकदलाने पाण्याचा प्रवाह ओलांडण्यासाठी तयार केलेले साधे लाकडी/लोखंडी पूल, दरड कोसळलेली ठिकाणे, अत्यंत वळणावळणाचे डोंगराच्या कडेने जाणारे मातीचे किचकट अरुंद एकपदरी रस्ते, डोंगरांमध्ये ढगांनी लावलेली हजेरी, अतिशय स्वच्छ आणि उथळ पाण्याचे प्रवाह, डोंगरातून सूर्यप्रकाशामुळे सोनेरी धूर बाहेर पडतोय असे भासवणारी काही दृश्ये पहावयास मिळाली.

वरील वर्णनाचे फोटो



वाटेत काढलेले काही इ-श्टाईल फोटो –

इ-श्टाईल फोटो

वर वर्णन केलेले हे सिक्कीमचे निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून आम्ही दुपारच्याला हॉटेलवर पोहचलो. आमच्या खोल्यांमधील सामान जसेच्या तसे होते. मग जेवणाची तयारी होईपर्यंत आम्ही काही जण रोज ठरल्याप्रमाणे फोटो पहात होतो. फोटो पाहून झाल्यावर ते संदीपच्या लॅपटॉपवर जतन करून ठेवले आणि कॅमेरा पुढील नैसर्गिक आठवणी जतन करण्यासाठी मोकळा करून घेतला. अति थकलेली मंडळी आपआपल्या खोल्यात विश्रांती घेत होती. थोड्याच वेळात जेवणाचा निरोप आला. सगळ्यांना भुका लागलेल्या असल्याने जेवणं पटापटा उरकून घेतली. आजचंही जेवण मला इतकं छान वाटल नाही. मग आमच्यातील काही जणांनी अंडा-ऑम्लेट करण्यासाठी अंडी कुठे मिळतात का हे शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यात काही यश आले नाही. काही जण विश्रांती घेत होते तर काही जण सिक्कीमच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारे आणखी काही घटक दिसतात का म्हणून उंडराउंडरी करण्यासाठी बाहेर पडले. येथे बऱ्याच जणांचा विश्रांतीचा विचार होता. पण ड्रायव्हर साहेब अनुप म्हणाले की, विश्रांती घेतली की पुढे खूप उशीर होईल. त्यामुळे विश्रांती घेऊ नका, गाडीतच विश्रांती घ्या वगैरे वगैरे .... मग अनुप साहेबांचा अध्यादेश मानून थकलेले आम्ही गाडीवर सामान बांधून पुढील प्रवासास निघालो. पुढील मुक्काम होता लाचुंग या गावी आणि या ठिकाणावरून उद्या आम्ही झिरो पॉईंट व युंगथान व्हॅली पहायला जाणार होतो. आमच्या या प्रवासामध्ये बहुतेक हॉटेलमधील एक जण सामील झाला होता थोड्याशा अंतरापर्यंत.

हॉटेलजवळील फोटो

हॉटेलमधून निघाल्या निघाल्या एका धबधब्याजवळील एका विचित्र आणि भयानक वळणाच्या पुलाजवळ आम्ही एक घडून गेलेला अपघात पाहिला. एक महिंद्रा मॅक्स गाडी डायरेक्ट धबधब्याच्या प्रवाहात पडली होती. गाडीचे जास्ती काही नुकसान झाले आहे असे जाणवत नव्हते पण गाडीतील माणसे वाचली असतील की नाही याबद्दल शंका वाटत होती. पुलावरील या वळणावर काम चालू होते आणि गाडी चालवताना या वळणाचा व्यवस्थित अंदाज येत नाही. कदाचित या कारणामुळेच अपघात झाला असावा. इथे आमची अपघात कसा घडला असेल, नक्की काय झाले असेल वगैरे वगैरे वर चर्चा चालू असतानाच अनुप पुलावरून गाडीचा व्यवस्थित अंदाज घेऊन गाडी कुणाची असेल वगैरे वर अंदाज बांधत होता. मग हा अपघात प्रपंच पाहून आम्ही पुढील प्रवासास सुरुवात केली.

प्रवासातील काही निसर्गाची विहंगम दृश्ये –
वाटेत काढलेले काही फोटो

पुढे वाटेत पाय मोकळे करण्यासाठी तसेच काही तरी खाऊन घ्यावे म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो. अनुपला ही आमच्या जेवणाच्या सोयीसाठी सामान खरेदी करायचे होते. मग आम्ही एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेलो आणि अनुप सामान खरेदीसाठी. आम्ही अंडा-ऑम्लेट खाल्ले आणि वरून कॉफीचा वरपा - J. पहिल्यांदा घेतलेली कॉफी लईचं फक्कड होती म्हणून पुन्हा सांगितली तर पहिलीच्या मानाने दुसऱ्यांदा आलेली कॉफी एकदम पुंगास होती आणि आमचा पचका झाला. 

पुढे हॉटेलवर पोहोचायच्या थोडेसे आधी एक मोठा धबधबा दिसला म्हणून तिथे थांबलो आणि एखादं-दुसरा फोटो काढून पुन्हा पुढे निघालो. साधारण ०५:०० वाजता आम्ही आमच्या मुक्कामाच्या हॉटेलमध्ये पोहचलो. पोहचल्या पोहचल्या आम्हा सर्वांना हॉटेलची ठेवण आवडल्याने आमच्यातील बऱ्याच जणांनी चांगली हवी तशी खोली मिळावी म्हणून धावपळ केली. पण मिळालेल्या सगळ्याच खोल्या छान होत्या. मग हातपाय धुऊन चहा वगैरे घेतला आणि बाहेर फिरायला गेलो. बऱ्याच जणांना घरी फोन करायचा होता म्हणून तेथील हॉटेलवाल्याचा फोन घेऊन त्याचे कार्ड टॉपअप करून घेतले आणि मग घरी फोनाफोनी करून घेतली. परत हॉटेलवर आल्यावर आमच्यापैकी जवळपास सगळ्यांनीच आंघोळी करून घेतल्या. त्याचवेळी बाजूला पत्त्याचे डाव चालूच होते. जेवणाचा निरोप येईपर्यंत पत्त्यांचे डाव चालूच होते. जेवणाचा निरोप आल्यावर एकदम मस्त जेवण करून घेतले. जेवणामध्ये फक्त भात आणि भाजी होती पण जेवण चांगले होते आणि टापटीप पण चांगली होती. मला इथले जेवण आवडले. पण या हॉटेलमधली पोरं जरा जास्तीच आगाव आणि टुकार वाटत होती. बहुतेक जेवताना थोडाफार खटका उडालाच.

जेवण झाल्यावर पुन्हा पत्त्यांचे डाव. मला तर या पत्त्यांच्या डावामध्ये खेळण्यापेक्षा नियमच जास्त जाणवून आले. हे असे पत्ते आले की परत पिसायचे वगैरे वगैरे. रम्मी खेळून कंटाळा आला म्हणून अठ्ठी-आठ खेळण्याचे ठरले तर तिथेही प्रत्येकाची वेगळी नियमावली. मग काय तो ही खेळ बारगळला. सगळ्यांना खेळता यावा म्हणून बदामसात खेळायला सुरुवात केले तर पुन्हा वेगवेगळे नियम, असे नाही तसे, तसे नाही असे वगैरे वगैरे प्रकर घडायला लागले. मग मी कंटाळून मला नाही खेळायचे नाही म्हणून बाहेर पडलो आणि सहलीचे आजचे फोटो बघत बसलो. बराच वेळ पत्ते खेळून झाल्यावर झोपायची तयारी चालू असताना हॉटेलच्या पोरांचा दारू पिऊन दंगामस्ती आणि जोरात आवाजात दबंग चित्रपटातील गाणी लावून नाच चालू होता. मग काय चालू आहे म्हणून बाहेर जाऊन पाहिले तर त्यांच्यातील एक पोरग एकदम अफलातून नाचत होतं. १० मिनिटे त्यांचा नाच पाहून त्यांना विनंती केली की बुवा आवाज हळू करून नाचा. थोड्या वेळाने ते त्यांचा गोंधळ संपवून त्यांच्या खोलीमध्ये झोपायला गेले आणि खोलीमध्ये गोंधळ सुरु केला. त्यांच्या शेजारच्या खोलीतल्यांना गोंधळाचा थोडा त्रास झाला पण काही वेळाने तेही झोपी गेले. आणि आम्ही ही उद्याची स्वप्ने पहात झोपी गेलो.

तिसऱ्या दिवसाचा एकून खर्च: रु. ६४०/- फक्त

टीप: वेळेअभावी आणि सहलीची टिपणं खूप मोठी होऊ नयेत म्हणून बरेचसे फोटो एकत्र करून एकच फोटो तयार करण्यासाठी खूप वेळ लागत असल्याने वरील वरील टिपणामध्ये काही फोटो सामील न करता टिपण मायाजालावर टाकले आहे. मी काही दिवसानंतर या टिपणामध्ये राहिलेले फोटो टाकणार आहे. चूकभूल देणे घेणे. तुम्ही या सहलीचे काही फोटो मायाजालावरील खालील दुव्यांवर पाहू शकता -



- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) (+ ९ १ ९ ९ ६ ० ७ ८ ८ २ ८ ०)
शुक्रवार, ०९/०९/२०११