रविवार, ८ मे, २०११

सिक्कीम प्रवास वर्णन - दिवस दुसरा


प्रथम सिक्कीम प्रवास वर्णन - दिवस पहिला वाचा.

दिनांक: ०१/११/२०१० - सोमवार

दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता सहलीचे नियोजन केलेल्या दिपकचा माणूस आम्हाला हॉटेलवर घ्यायला येणार होता आणि मग आम्ही तिथून दुसऱ्या गावाला/शहराला म्हणजे लाचेन  जाणार होतो. आदल्या रात्री असे ठरले होते कि एकेकाने सकाळी वाजता उठायला सुरुवात करून आवरायला सुरुवात करायची. आमचे पेशुभाई म्हणजे एक प्रकारचे निशाचरच. सहलीच्या ठिकाणांवर रात्री सगळ्यात उशिरा झोपणार आणि सकाळच्याला सगळ्यात लवकर उठणार. आता त्यांच्या सहलीच्या ठिकाणच्या स्वभावगुणानुसार झालेही तसेच. पेशुभाई तिथल्या वेळेनुसार संपूर्ण उजाडून गेल्यावर म्हणजे साधारण सकाळी वाजता उठले. उठले की कॅमेरा घेऊन डायरेक्ट खोलीच्या बाहेर जाऊन कचाकचा कॅमेराचे बटन दाबून निसर्गाचे फोटो - काढले. त्यानंतर काही वेळाने मलाही जाग आली. मग कवडासिंग आणि आव्हाड उठले.

प्रशांतने सकाळी काढलेले फोटो

मग आम्ही तोंड धुऊन, चहा घेऊन हॉटेलपासून जवळच असणाऱ्या फुटबॉल मैदानावर गेलो आणि चेष्टा-मस्करी करत फुटबॉलचे मैदान पाहून घेतले.  आव्हाडांनी लगेच  ग्राउंडाला - राउंडा मारल्या - अहो - म्हणजे एका बाजूने पळत जाऊन परत आला हो ... त्याच्या राउंडा मारून झाल्यावर आम्ही तेथील फुटबॉल क्लबच्या खेळाडूंचा सराव पाहत थांबलो. ते खेळाडू ज्या जागेत खेळत होते ती जागा म्हणजे फुटबॉलच्या पूर्ण मैदानाच्या आकाराच्या साधारण  एक चतुर्थांश असावी आणि त्या तेवढ्याश्या जागेत ते खेळाडू एकदम अफलातून खेळत होते. तो खेळ पाहून आव्हाडांनी माझ्या फुटबॉल खेळण्यावर/खेळण्याच्या पद्धतीवर तोफा डागून घेतल्या. त्याच दिवशी तिथे भरविलेल्या फुटबॉल स्पर्धेतील एक उपांत्य सामना होता आणि दुसऱ्या दिवशी अंतिम सामना होता. त्यांचा खेळ बघून झाल्यावर त्यांच्या कोचबरोबर  थोडावेळ गप्पा मारल्या. मग त्यांनी आम्हाला फुटबॉलचा कोच कसा बनतो, त्याची प्रक्रिया/शिक्षण याबद्दल माहिती दिली. पण आजकालचे खेळाडू कोच कसे बनतात (जास्ती काही माहित नसून , येत नसून), भारतातील फुटबॉलमधील गुणवत्ता, गुणवत्ता असलेल्यांना  पुढे घेऊन जाण्यासाठी काही प्रक्रिया/पद्धती अस्तित्वात नाहीत, अफरातफरी/भ्रष्टाचार, इत्यादी विषयांवर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून आणखी एक गोष्ट कळाली आणि ती म्हणजे - बायचिंग भुतिया इथे १९९१-९२ साली अंतिम सामना खेळायला आला होता. तो माझ्याकडून - वर्षे शिकला वगैरे वगैरे ...

फुटबॉलचे मैदान आणि खेळाडूंचा सराव

फुटबॉलच्या प्रशिक्षकाशी चर्चा करताना आम्ही

फुटबॉल मैदानावरील शांततेसाठीचा संदेश आणि आम्ही

आम्ही फुटबॉल मैदानावर जाताना इतरांना सांगून गेलो होतो की तुमचे आवरून झाल्यावर आम्हाला फोन करा म्हणजे आम्ही हॉटेलवर परत येऊन आमची आवराआवरी करतो. (कारण हॉटेलच्या खोलीला एकच चावी होती.) पण इतर मंडळींनी आम्हाला काही फोन केला नाही किंवा ते विसरून गेले आणि ते तसेच फिरायला आणि सकाळच्या न्याहरीसाठी बाहेर पडले. आम्ही ते गेल्यानंतर परत हॉटेलवर गेलो तर तेथे कोणीच नव्हते. दोन्ही खोल्यांच्या चाव्यादेखील त्यांच्याकडेच होत्या. मग त्यांना फोनाफोनी केली तर आलोच /१० मिनिटात, आम्ही इथे आहोत, तिथे आहोत वगैरे वगैरे अशी उत्तरे मिळाली. बराच वेळ झाला तरी ते आले नाहीत आणि दिपकचा माणूस म्हणजे विकास १०:३० - १०:४५ च्या दरम्यान आम्हाला घेण्यासाठी येणार होता म्हणून कंटाळून मीच चावी आणण्यासाठी गांधी रस्त्याकडे गेलो (हा रस्ता म्हणजे एखाद्या घाटातील तीव्र चढण होते). अर्धा किलोमीटर चालून त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी गेलो तर ते तेथून निघाले होते आणि मला बिनचावीचे परत यावे लागले. मी परत येईपर्यंत ते हॉटेलवर पोहचले होते. मग आम्ही उरलेल्यांनी आवरून घेतले आणि सकाळच्या न्याहरीसाठी बाहेर पडलो. योगायोगे आम्हाला न्याहरीसाठी छान हॉटेल सापडले आणि आम्ही गार भरेपर्यंत खाऊन घेतले. परत हॉटेलवर आलो तरी दिपकच्या माणसाचा पत्ता नव्हता. उगाच वेळ वाया जाऊ नये म्हणून आम्ही चेक-आउट करून सगळे सामान हॉटेल स्टार्लिट / Starlit च्या बाहेर आणून ठेवले आणि गाडीची वाट पाहत बसलो.

गंगटोक शहर (सिक्कीमची राजधानी)

सिक्कीमच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारे घटक

गंगटोक शहराचा परिसर

सिक्कीममधील गुरुडोंगमार  तलाव, झिरो पॉइंट, नथुला ही स्थळे फक्त भारतीयांनाच पाहता येतात आणि त्यासाठी रीतसर परवानगी घेऊन सहलीतील प्रत्येकासाठी परवाना/अनुज्ञप्ती पत्रक घ्यावे लागते. काल रात्री विकास या कामासाठी लागणारे प्रत्येकाचे फोटो आणि ओळखपत्राच्या छायांकित प्रती घेऊन गेला होता आणि आज सकाळी तो रीतसर परवानगी घेऊन प्रत्येकासाठीचे परवाना/अनुज्ञप्ती पत्रक आणण्यासाठी सिक्कीम शासनाच्या एका कार्यालयात गेला होता. हे सरकारी कार्यालय सकाळी १०:०० वाजता उघडते आणि तिथून पुढे कामे सुरु होतात. या कारणामुळे विकासला आमच्या हॉटेलजवळ यायला उशीर झाला. सरकारी कार्यालयीन काम संपवून तो कसाबसा साधारण ११:०० वाजता आमच्या हॉटेलजवळ पोहचला.

शहराच्या आतील रस्त्यांवर प्रवाशी वाहनांना परवानगी नसल्याने आम्हाला टँक्सी करून आमच्या प्रवाशी गाडीजवळ जावे लागलेतिथे आमच्या गाडीची चुकामुक झाली आणि आम्ही एका कोपचांडीत गेलो होतो. तिथे काय आमची प्रवाशी गाडी दिसत नव्हती म्हणून फोन करून आम्ही परत मागे येऊन कसेबसे प्रवासी गाडीजवळ पोहचलो. आमच्या टँक्सीचे भाडे जास्त वाटल्याने ड्रायव्हरला आम्ही बोललो तर तो बंगाली/सिक्कीमी आवाजात/तोऱ्यात म्हणत होता कि, "तुम्हारा बाड लक और मेरा गॉड लक."

आमची प्रवाशी गाडी पाहून आमच्या सगळ्यांचा प्रथमत: हिरमूडच झाला होता. गाडी होती महिंद्रा मँक्स आणि ती ही बरेच दिवस एका जागेवरच धूळ खात पडली होती असे भासत होते. दिपकची माणसे ती गाडी साफ करीत होते. गाडीतील सीट पण व्यवस्थित वाटत नव्हते. आणि दिपकचा ड्रायव्हर गाडी दुरुस्त करीत होता. आम्हा सगळ्यांना गाडी बघून पुढील प्रवासाची काळजी वाटत होती. प्रवास कसा होणार? गाडी व्यवस्थित असेल ना? संपूर्ण प्रवासात गाडी त्रास तर देणार नाही ना? वगैरे वगैरे ...  त्यात कहर म्हणजे गाडी व्यवस्थित दुरुस्त होत नव्हती आणि गाडीचा कोणता तरी वॉल्व/volve सापडत नव्हता. तसेच गाडीचा ड्रायव्हर अगदीच कोवळ्या वयाचा (१६ चा) वाटत होता. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहून आमच्यातील बऱ्याच जणांची चिडचिड होत होती. त्यात दिपकचा माणूस प्रवासासाठी ठरलेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम मागत होता. मग होय-नाही होय-नाही म्हणत म्हणत दिपकला फोन करून निम्म्यापेक्षा थोडे कमी पैसे त्याला दिले कारण सध्याच्या परिस्थितीनुसार प्रवासाची जरा धास्तीच वाटत होती. मग सामान गाडीवर बांधून आम्ही कसेबसे अर्ध्या तासाने तेथून लाचेन ला निघालो.

पुढे ड्रायव्हरने पुढील प्रवासामध्ये खाण्यासाठी लागणारे सामान घेतले कारण संपूर्ण सिक्कीममध्ये गंगटोकशिवाय कुठेच पाहिजे ते खायला मिळण्यासारखी हॉटेल नाहीयेत. तुम्ही जिथे ज्या हॉटेलमध्ये राहणार आहात तिथेच तुमच्या खाण्याची सोय होऊ शकते. आणि सहलीचे नियोजन करणाऱ्यांनी त्या हॉटेलवाल्यांना सामान पुरवावे लागते. पुढे आम्ही ही खाण्यासाठी म्हणून सटरफटर बिस्किटे वगैरे घेतली, वाटेत पैसे वगैरे काढून पुढील प्रवासास सुरुवात केली आणि कसाबसा आमचा प्रवास व्यवस्थित सुरु झाला. पण घडलेल्या एकूण प्रकारांमुळे आणि आमच्या प्रतिसादामुळे आमच्या गाडीचा ड्रायव्हर थोडासा नाराजच होता, कदाचित आमच्यावर चिडलेलाही. वाटेत निसर्गाची काही विहंगम दृश्ये पहिली. पुढे एका ठिकाणी सुमितची बँग गाडीवरून खाली पडली. मग सामान पुन्हा एकदा व्यवस्थित बांधून धारा मारून आम्ही पुढे निघालो.

प्रवासाच्या सुरुवातीस कांचनगंगा शिखराचे लांबून काढलेले फोटो

सिक्कीमचे राहणीमान आणि व्यवसाय

मग पुढे आम्ही सेवन सिस्टर्स धबधब्याजवळ थांबलो. या ठिकाणी नैसर्गिक धबधबे तयार झालेले आहेत आणि तेही एकावर एक अशा पद्धतीने. येथे आम्ही काही फोटो काढून घेतले. आम्ही धबधब्यांजवळ पोहचतो पोहचतो तोवर आमच्या छोट्या सरकारांनी धबधब्याजवळील एका ओल्या दगडावरून चांगलीच रपटी मारली होती - कपडे ओले आणि बाहेर थंडी ... वा वा वा ... याच जागी इतरांपैकी कोणी पडले असते तर साहेबांनी हसून हसून/ चिडवून चिडवून पडणाऱ्याचा पिट्टा पडला असता. या ठिकाणी आम्हाला थोडीफार हिरवळ पहावयास मिळाली. मग इथे थोडी पोटपूजा करून (कॉफी आणि भजी खाऊन) आम्ही पुढे निघालो.

सेवन सिस्टर्स धबधब्यांपैकी एक धबधबा आणि धबधब्याजवळ पाय घसरून पडलेला समीर

वाटेत काढलेले आणखी काही फोटो -
आम्ही

लिखाणाचा मालक - :)

पुढे एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो. इथे आम्ही काही जणांनी चिकन खाल्ले. चिकन खरंच खूप छान होते आणि महाराष्ट्रीयन चवीला लाजवेल अशा पद्धतीचे होते. जेवणाच्या शेवटी मी चिकन रस्स्याचा वरपा मारला आणि वरून कॉफी (वा, काय एकीकरण/संयोग/कॉबिंऩेशऩ/Combination आहे?). या हॉटेलमधील जेवण वाढणारी पोरगी म्हणजे मला एक बोलकी बाहुली वाटत होती आणि तिची बोलण्याची  श्टाईल/shtyale पण लईच भारी होती. आणि त्यात ती आमच्या ड्रायव्हरच्या चांगलीच ओळखीची वाटत होती. या ठिकाणी बऱ्याच प्रकारच्या फुलांची झाडे होती मग काय प्रशांतने कचाकचा त्यांचे फोटो काढून घेतले.

प्रशांतने काढलेले फुलांचे फोटो

येथे नमूद करण्यासारखी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे येथे धुम्रपानास बंदी होती तसेच येथील प्रत्येक नागरिक निसर्गाची आणि परिसराची काळजी घेत होता - हे लोक इतरांना आवर्जून सांगत होते की कचरा कोठेही टाकू नका. इथे कचरा पेटी आहे किंवा गाडीमध्ये कचऱ्यासाठी पिशवी आहे त्यामध्ये टाका. हे लोक जेमतेम शिकलेले पण ते त्यांच्या परिसराची काळजी घेत होते. मला इथे याची खंत वाटते की आमच्याकडील शिकलेले येडझवे कचरा कोठेही टाकतात. मी अशीही उदाहरणे पहिली आहेत की संपूर्ण परिसर स्वच्छ असताना काही येड्झव्यांनी त्या ठिकाणी कचरा टाकलेला आहे.


जेवण करून झाल्यावर आम्ही गप्पा मारत, झोप काढत पुढील प्रवासास सुरुवात केली. सलग प्रवास करून खूप कंटाळा आला म्हणून आम्ही पुढे एका ठिकाणी पाय मोकळे करण्यासाठी थांबलो. तिथे आम्ही सिक्कीमची ठेंगणी केळी आणि संत्री खाल्ली. ०४:३०-०५:०० वाजायला लागल्यावर अंधार पडायला सुरुवात झाली आणि सिक्कीमची सहलीपूर्वी ऐकल्याप्रमाणे थंडीलादेखील सुरुवात झाली. जसजशी अंधाराची वेळ जवळ येत होती आणि आमचे मुक्कामाचे ठिकाण जवळ येत होते तसतसे आम्हाला बर्फाने आच्छादलेले डोंगर दिसू लागले. आमच्यातील बहुतेक जणांनी असली दृश्ये केवळ चित्रपटांमध्येच पाहिली होती आणि आज प्रत्यक्ष काही किलोमीटरच्या अंतरावरील ही निसर्गाची विहंगम दृश्ये आम्ही पाहत होतो, डोळ्यात साठवून घेत होतो.



गेंड्याच्या कातड्याचे पेशुभाई खिडकी उघडून बसले होते त्यामुळे थंड वारा आम्हाला त्रास देत होता. आत येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे आमच्यातील काहींना त्रास होत होता आणि पेशुभाईची खिडकी बंद करण्याची काही इच्छा नव्हती. होय-नाही होय-नाही म्हणत म्हणत प्रशांतला माघार घेऊन शेवटी खिडकी बंद करावी लागली. मी मात्र फुलटू पँक होतो - बनियन, त्यावर टी-शर्ट, त्याच्यावर दोन स्वेटर्स, नाकाला आणि कानाला रुमाल, वरून कानटोपी, जीन्स, आणि बूट यामुळे मला जास्ती त्रास होत नव्हता. मग बराच वेळ प्रवास झाला तरी आम्ही वाटेत कुठे थांबलो नव्हतो म्हणून एका ठिकाणी थांबून चहा गुलाबजामून खाऊन घेतले (वापरत एकीकरण/संयोग/कॉबिंऩेशऩ/Combination बघा, आहे की नाही मजा?), पाय मोकळे करून घेतले, आणि पुढे निघालो. यावेळी मात्र थंडी खूपच वाढली होती आणि थंडीचा मला खूपच त्रास व्हायला लागला होताजरी मी पूर्णपणे पँक असलो तरी आणि गाडी पूर्णपणे बंद असली तरी. आमच्यातील काही जणांना झोपसुद्धा बोलावून घेत होती. मलाही प्रचंड झोप आली होती. प्रवासाला सुरुवात करून बराच वेळ झाला होता तरी मुक्कामाचे ठिकाण काही येत नव्हते.

पुढे वाटेत एका प्रवासी गाडीचे चाक पंक्चर झाल्याने आमच्या गाडीच्या ड्रायव्हरने त्याला मदत करण्यासाठी गाडी थांबवली. आमच्या गाडीप्रमाणेच बाकीच्या बऱ्याच प्रवासी गाड्या त्या थांबलेल्या गाडीला मदत करण्यासाठी थांबले होते. जोपर्यंत पंक्चर झालेली गाडी तिथून निघाली नाही तोपर्यंत कोणतीच गाडी तिथून हलली नाही. सिक्कीम मधील पर्यटन क्षेत्रातील ही मदतीची देवाण-घेवाण मनाला खूप भाऊन गेली. थांबलेली गाडी दुरुस्त होईपर्यंत आम्ही एकमेकांच्या अंगावर थंड पाणी उडवत थोडीफार मजा करून घेतली.

शेवटी साधारण रात्री ०७:३० - ०८:०० वाजता आम्ही एकदाचे मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे हॉटेल ब्लू पाईन / Blue Pine मध्ये पोहचलो. गंगटोक ते लाचेन हे अंतर जेमतेम १२२ किलोमीटरचे पण आम्हाला हे अंतर पार करण्यासाठी येथील घाटाघाटातील खराब रस्त्यांमुळे ७ ते ८ तास लागले. हॉटेलमध्ये आमच्यासाठी खोल्या राखून ठेवल्या होत्या. सगळे सामान उतरवून गरम पाण्याने हातपाय धुवावे म्हणून गिजर लावून आम्ही गप्पा मारत फोटो बघत बसलोबराच वेळ झाला तरी थंडीमुळे पाणी काही व्यवस्थित गरम झाले नाहीकदाचित थंडीमुळे गच्चीवरील पाण्याचा बर्फ झाला होता. प्रत्येकाला फक्त एखाद-दुसरा गरम पाण्याचा तांब्या मिळाला. या वेळेत मी मात्र पार गारठून गेलो होतो. मला थंडी अजिबात सहन होत नव्हती. मी थंडीचा त्रास कमी व्हावा म्हणून अक्षरश: जीन्सच्या आतून ट्रॅक पँट घातली होती, मी आणलेल्या शाली, आणि तिथे असलेले भले मोठे जड गाडीसारखे असणारे ब्लँकेंट/blanket अंगावर घेतले होते. पण तरीदेखील मला काही थंडी सहन होत नव्हती, झेपत नव्हती. मी अक्षरश: थरथर कापत होतो आणि तसाच कुडकुडत झोपून होतो. मला मधूनच आता माझे काही खरे नाही असे वाटत होते. बाकीच्यांपैकी काही जण विश्रांती घेत होते, काही जण फोटो पाहत वेळ घालवत होते आणि जेवणाची वाट पाहत होते.

सिक्कीममध्ये गंगटोक सोडून दुसरीकडे सहसा चपाती वगैरे मिळत नाही. पण सहलीच्या शेवटी शेवटी जेंव्हा दिपकची भेट झाली तेंव्हा असे कळले की सहलीच्या नियोजकास जर आगोदर तसे सांगून ठेवले तर चपात्यांची सोय होऊ शकते. तुम्ही मला आगोदर सांगितले असते तर आपण तशी सोय केली असती. पण दुसऱ्या दिवशी आम्हाला याची माहिती नव्हती - :( ... साधारण तासाभराने जेवणासाठीचा निरोप आला आणि मग आम्ही जेवायला गेलो. मी जेवायला पण बळेच गेलो. थंडीमुळे मला काही सुचत नव्हते आणि जेवायला गेल्यावर तिथे चपात्या नव्हत्या. जेवणामध्ये भात, बटाटा भाजी, सुक्की गवारीसारखी एक भाजी, वरण, पापड इत्यादी होते. एकुणात या हॉटेलमधील जेवणासाठीची सोय खूप छान होती. जेवण छान झाले होते पण मला ते इतके आवडले नाही कारण मला थंडीमुळे काही सुचत नव्हते. उपाशी पोटी झोपायला नको म्हणून थोडे खाऊन घेतले आणि जेवण संपवून मी झोपायला गेलो. थंडी काही माझा पिच्छा सोडत नव्हती. सकाळी ०४:०० वाजता गुरुडोंगमार  तलाव बघायला जायचे होते म्हणून गजर लावून मी झोपलो. बाकीचे पण लवकरच जेवण उरकून आचाऱ्यांना टीप देऊन आले. उद्या लवकर जायचे असल्याने पत्ते वगैरे खेळता सर्वजण मिळालेल्या खोल्यात निद्रिस्त झाले.


दुसऱ्या दिवसाचा एकूण खर्च = रु. १०४० + रु. १०००० सहलीच्या नियोजासाठीचे = रु. ११०४०.


टीप: 'येडझवे'/'येडझवा' ही शिवी/शब्द जाणूनबुजून वापरलेली(ला) आहे. कारण माझी प्रत्येकाकडून एवढीच अपेक्षा आहे की जर तुम्ही परिसर साफ करू शकत नसाल तर किमानपक्षी तो घाण तरी करू नकात. जे लोक स्वच्छ परिसर विनाकारण घाण करतात अशा लोकांबद्दल मला भयंकर चीड आहे. चूकभूल देणे घेणे. धन्यवाद!


- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) ( + ९ १ ९ ९ ६ ० ७ ८ ८ २ ८ ० )
रविवार, ०८/०५/२०११

1 टिप्पणी: