मंगळवार, ०२/११/२०१०.
कालच्याला आमच्या
ड्रायव्हर साहेबांनी अनुपने मध्यरात्री ०४:०० वाजता निघायचे आहे म्हणून सांगितले
होते. कारण गुरुडोंगमार परिसरातील वातावरण कधीही खराब होऊ शकते, तिथे या काळात
कधीही पाऊस पडू शकतो. कालच या परिसरातील हवामान खराब होऊन इथे बर्फ पडून गेला
होता. त्यामुळे आमच्या ड्रायव्हर साहेबांच्या मनातच सिक्कीमी पाल चुकचुकत होती की,
आज गुरुडोंगमार तलावापर्यंत आपण जाऊ शकू की नाही म्हणून. तसेच वाटेत सैनिकांचा तळ असल्याने हवामान थोडेही खराब झाले किंवा खराब होण्याची चिन्हे दिसू लागली की हे
सैनिक कोणत्याच गाडीला पुढे जाऊ देत नाहीत. तर असा हा परिस्थिती प्रपंच ध्यानात
घेऊन आम्ही काल झोपेला आमच्या कुशीत घेतले होते. ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या
वेळेनुसार भ्रमणध्वनीवर गजर लावले होते. कालच्याला थंडीने माझ्यावर वर्मी घाव
घालून मला भयानक घायाळ केलेले असल्याने माझ्याकडून चुकून मध्यरात्रीच्या ०२:४५
ऐवजी ०३:४५ चा गजर लागला गेला होता.
योगायोगाने
छोटूनानांनी ०३:१५ चा गजर लावलेला होता त्यामुळे छोटूनाना ०३:१५ ला उठले आणि
त्यांनी सगळ्यांना उठवायला सुरुवात केली. मी छोटू नानाच्या शेजारी झोपलो होतो
त्यामुळे त्याने मला पहिला उठवले. उठल्या उठल्या मी किती वाजले पाहिले आणि तेंव्हा
मला कालच्या थंडीचा वर्मी घाव गजराच्या चुकीच्या वेळेला जबाबदार आहे हे समजले.
उठल्यावर मला कालच्या इतका त्रास होत नव्हता आणि बराच उस्ताह ही जाणवत होता. मग
छोटू नानाने आळीपाळीने सगळ्यांना उठवायला सुरुवात केली. चुकून त्याने एका
खोलीमध्ये आपली पोरे आहेत असे समजून खोलीचा दरवाजा जोरात वाजवला. दरवाजा उघडून
दुसरीच व्यक्ती बाहेर - J. त्या खोलीतील पोरांनाही लवकर उठायचेच होते वाटते बहुतेक. छोटू नानांच्या
चुकीचा त्यांना फायदाच झाला कदाचित. मग छोटू नाना ड्रायव्हर साहेबांना उठवायला गेले
तर साहेब एकदम सॉल्लिड्ड साखरझोपेत.
कदाचित १-२ हाकेत काही उठले नाहीत. मग अनुपने स्वत:चं सगळं आवरून गाडी
तपासून इंजिन गरम होण्यासाठी चालू करून ठेवली. काल रात्री गरम पाण्याचा लोचा
झालेला होता म्हणून गिजर रात्रीपासून चालू ठेवला होता. पण थंडीमुळे हॉटेलवरील
टाक्यांमधील पाण्याचा बर्फ झालेला असल्याने आम्हाला काय गरम पाणी व्यवस्थित मिळालं
नाही. गरम सोडा हो पण थंड पाणीदेखील पुरेसे मिळालं नाही. मग काय जेमतेम पाण्यात
सकाळचे विधी उरकून आंघोळ न करता साधारण ०४:१५ वाजता आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो आणि
गाडीजवळ आलो.
मी आपला मात्र
कालच्यासारखा एकदम फुलटू पॅक – अंगामध्ये बनियन, त्यावर टी-शर्ट, त्यावर स्वीट- शर्ट,
त्यावर स्वेटर, त्यावर जर्किन, कानाला कानटोपी आणि वरून स्वीट- शर्टची पण
कानटोपी, तोंडाला रुमाल, हातात हातमोजे, ट्रॅक पॅंट, जीन्स, पायामध्ये २ मोज्यांचे जोड
आणि बुट, आणि टॉवेल. बाद मे कल जैसा थंडी का टेन्शन नाही मांगता भाई - J.
|
लाचेनच्या हॉटेलमधील
नमूद करण्यासारखी एक बाब म्हणजे आम्ही हॉटेलमधून बाहेर पडताना खोल्यांना कुलुपे
लावली नव्हती. इतके लाचेनचे लोक विश्वासू जाणवून आले आणि आहेत. गंगटोकमध्ये थोडासा
वेगळा अनुभव आला तो भाग निराळा.
हॉटेलच्या बाहेर
आल्या आल्या आम्हाला आभाळामध्ये एक अतिशय सुंदर असे दृश्य दिसले आणि त्यामुळे
सगळ्यांचा हुरूप आणखीनच वाढला. ‘हा तो तारा’, ‘हा तर तो तारा’ असे म्हणत म्हणत १-२
फोटो काढून घेतले. पहिले काढलेले ३ फोटो काळेकुट्ट निघाले बरं का! आमच्या बरोबर
आमचे शि. का. कार्यकर्ते असते तर ते एकटेच त्या ३ फोटोंमध्ये दिसले असते बर का - J. फोटो काढून झाल्यावर आम्ही गुरुडोंगमार तलावाकडील
प्रस्थानास सुरुवात केली. काल संध्याकाळी/रात्री बर्फाने आच्छादलेले डोंगर
पाहिल्याने आम्हा सगळ्यांना उस्तुकता लागून राहिली होती.
उजाडेपर्यंत
पांढऱ्या बर्फाशिवाय जास्ती काही दिसत नव्हते त्यामुळे आम्ही
गप्पाटप्पा/चेष्टा-मस्करी करीत होतो. प्रवास सुरु झाल्यावर थोड्या वेळाने कमी
कापडं (गरम कपडे) घातलेल्यांना थंडीचा त्रास जाणवू लागला म्हणून मी माझ्याकडील २
शाली त्यांच्याकडे सुपूर्त केल्या. शाली देऊनही आव्हाडांना थंडी त्रास देतच होती
म्हणून माझ्या गरम कपड्यांच्या संपतीतील एक जर्किन आव्हाडांना दिले. उजाडल्यावर
आम्ही एका ठिकाणी पाय मोकळे करण्यासाठी थांबलो आणि काही फोटो काढून घेतले.
मग परत गप्पा मारत
मारत सिक्कीमचा निसर्ग पहात पहात आम्ही पुढे निघालो. काल
रातच्याला/रात्रीला/रात्री माझे जेवण व्यवस्थित झाले नव्हते त्यामुळे माझ्या पोटात
कावळे कावकाव करीत होते. कडाडून भूक लागली होती. बाकीच्यांनाही भूक विनवण्या करीत
होती की न्याहरीसाठी कधी थांबता म्हणून? सर्वजण सकाळच्या न्याहरीचा विचार करताहेत
न करताहेत तोपर्यंत आम्ही न्याहरीच्या ठिकाणापाशी पोहचलोही. हे ठिकाण म्हणजे
सिक्कीममधील सैनिकी परिसरातील एक छोटसं गावठाणच भासत होतं. कदाचित हा सैनिकांचा तळ
ही असावा. या भागातून सैनिकांची परेडदेखील चालू होती. न्याहरीची तयारी पूर्ण
होईपर्यंत आम्ही त्या छोट्याश्या भागात उंडराउंडरी करीत तेथील निसर्ग आमच्या
डोळ्यांमध्ये जतन करून ठेवित होतो तसेच आठवणींसाठी म्हणून कॅमेरामध्ये सुद्धा आणि
तेही आमच्या सर्वांच्या विविध, विचित्र, आणि गमतीदार छटांसहित. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून
१४००० फुट उंचीवर आहे.
|
|
|
या ठिकाणी आम्ही पोट
भरून गरमागरम मॅगी, चहा, आणि बिस्कीट खाऊन घेतले. मॅगी छान झाली होती. मॅगी खाऊन
झाल्यावर वरून मॅगीचा रस्सा पण पिला. थंडीच्या कारणाने काहींनी बासरीवादन करून
घेतले (कदाचित कधी नव्हे ते). इतरांनी कानटोप्या आणि मफलर विकत घेतल्या. इथे
साधारण ४५ मिनिटे ते तासभर मस्त वेळ घालवून आम्ही गुरुडोंगमार तलावाकडे प्रस्थान
केले.
म्हणता म्हणता आम्ही
गुरुडोंगमार तलावापाशी पोहचलोही. पोहचलो तर है साला, वाहनतळासाठी हे भली मोठी
मोकळी जागा, समोर तलाव, आणि त्याच्यासमोर बर्फाने पूर्णपणे आच्छादलेले डोंगर. आता
ह्या भल्या मोठ्या मोकळ्या जागेमुळे धारा मारायचे वांदे झाले ना राव. मग काय,
कशीबशी आडोशाची जागा शोधून (अहो आडोसा काय म्हणता – १-२ जीपड्यांच्या मागे जाऊन
म्हणा) धारा मारून घेतल्या आणि हे सन्नाट तलावाजवळ.
जेंव्हा आम्ही पळत पळत तलावाकडे निघालो तेंव्हा समोरील डोंगर उन्हामुळे चमकत असल्यामुळे सोनेरी दिसत होते आणि अशा सोनेरी डोंगरांसमोर हे तलाव खूपच अप्रतिम दिसत होते. हे तलाव
वाहनतळापासून थोड्याशा खालच्या उंचीवर होते आणि तलावाकडे जाण्यासाठी पायऱ्या
होत्या. जवळच एक मंदिर होते. मग काय
आम्ही सनासना पायऱ्या उतरून तलावाजवळ गेलो. गुरुडोंगमार तलाव समुद्रसपाटीपासून १७१०० फुट उंचीवर असल्यामुळे पळताना आणि पायऱ्या उतरताना श्वास घेताना त्रास होत होता, लगेच थापा लागत होत्या. तलावाजवळ गेल्यावर जो तो आपआपल्या परीने तेथील निसर्ग
डोळ्यात साठवून घेत होता. त्यामानाने या ठिकाणी मंदिरामध्ये आणि मंदिराजवळ बरीच
गर्दी होती. तिथे आलेल्या भाविकांची अशी श्रद्धा होती की, त्या तलावाच्या
पाण्यामध्ये किंवा पाण्याजवळ जर एकावर एक असे काही दगड ठेवले आणि मनात एखादी इच्छा
धरली तर ती पूर्ण होते. मग आमच्यातील काही भावुक मंडळी इच्छापूर्तीच्या निमित्ताने
तिकडे गेले तर काहीजण निसर्ग पहात फोटो काढून घेण्यासाठी आपला क्रमांक/नंबर कधी
येईल याचा अंदाज घेत निसर्ग न्याहाळत होते. आणि यात आणखी एक भर म्हणजे आमच्याकडे छोटू नानाचा एकच भारीचा गॉगल होता. थोडक्यात लोचा असा होता की – कॅमेरा एक, गॉगल एक, आणि
फोटोसाठी हपापलेले जीव अनेक. त्यात दुष्काळग्रस्ती माझा फोटोसाठी हावरेपणाचा कळस.
वा वा वा!
फोटो
मी म्हणजे
गायकवाडांचं आवलीपीर कारटं. पाणी दिसणे आणि पाण्यामध्ये उतरणे नाही? नामंजूर
नामंजूर नामंजूर! मग पाण्यात उतरून फोटोग्राफरला विनंती करून १-२ फोटो काढून
घेतले आणि स्वत:चं समाधान करून घेतलं.
मग गुरुडोंगमार
तलावाजवळील निसर्गाचा परिसर डोळ्यांमध्ये साठवून आम्ही परतीच्या प्रवासास सुरुवात
केली. गाडीत बसल्यावर माझ्या पाण्यात उतरण्याबद्दल ड्रायव्हर साहेब अनुपबरोबर
बोलणं झालं तर तो म्हणाला की, “पोनी थांडा होता है$$, उतरना$ नही$ चॉहिये$$|”. आता अनुपचा आमच्यावरील
राग उतरला होता आणि तो आमच्यामध्ये थोडाफार मिसळायलाही लागला होता पण पूर्णपणे
नव्हे.
परतीच्या मार्गावर
आम्हाला कुठे याक प्राण्यांचा मोठा कळप दिसला तर कुठे मध्येच एखादं-दुसरा एकटा याक
दिसला. एकट्या याकचा अगदी जवळून फोटो काढण्याचा विचार चालू होता पण अनुपने
सांगितले की, “हे रानटी/जंगली याक आहेत,
सरळ हल्ला करतात. त्यामुळे लांबूनच फोटोगिरीचे उद्योग करा.”.
याक प्राण्यांचा कळप
मागे गेल्यावर आम्हाला पुढील परतीच्या वाटेवर काही ठिकाणी बर्फाने आच्छादलेले
डोंगर, बिनाबर्फाचे दगड-मातीचे डोंगर, बर्फाने काही ठिकाणी आच्छादन निर्माण केलेलं
छोटसं तलाव (थोडसं मोठं डबकं), पूर्ण जमीन बर्फाने आच्छादलेली पण गाड्यांच्या
येण्याजाण्याने तयार झालेला तेवढासाच मातीचा रस्ता, सैनिकदलाने पाण्याचा प्रवाह
ओलांडण्यासाठी तयार केलेले साधे लाकडी/लोखंडी पूल, दरड कोसळलेली ठिकाणे, अत्यंत
वळणावळणाचे डोंगराच्या कडेने जाणारे मातीचे किचकट अरुंद एकपदरी रस्ते,
डोंगरांमध्ये ढगांनी लावलेली हजेरी, अतिशय स्वच्छ आणि उथळ पाण्याचे प्रवाह,
डोंगरातून सूर्यप्रकाशामुळे सोनेरी धूर बाहेर पडतोय असे भासवणारी काही दृश्ये
पहावयास मिळाली.
वरील वर्णनाचे फोटो
वाटेत काढलेले काही इ-श्टाईल
फोटो –
इ-श्टाईल फोटो
वर वर्णन केलेले हे
सिक्कीमचे निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून आम्ही दुपारच्याला हॉटेलवर पोहचलो.
आमच्या खोल्यांमधील सामान जसेच्या तसे होते. मग जेवणाची तयारी होईपर्यंत आम्ही
काही जण रोज ठरल्याप्रमाणे फोटो पहात होतो. फोटो पाहून झाल्यावर ते संदीपच्या
लॅपटॉपवर जतन करून ठेवले आणि कॅमेरा पुढील नैसर्गिक आठवणी जतन करण्यासाठी मोकळा
करून घेतला. अति थकलेली मंडळी आपआपल्या खोल्यात विश्रांती घेत होती. थोड्याच वेळात
जेवणाचा निरोप आला. सगळ्यांना भुका लागलेल्या असल्याने जेवणं पटापटा उरकून घेतली.
आजचंही जेवण मला इतकं छान वाटल नाही. मग आमच्यातील काही जणांनी अंडा-ऑम्लेट
करण्यासाठी अंडी कुठे मिळतात का हे शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यात काही यश आले
नाही. काही जण विश्रांती घेत होते तर काही जण सिक्कीमच्या नैसर्गिक सौंदर्यात भर
घालणारे आणखी काही घटक दिसतात का म्हणून उंडराउंडरी करण्यासाठी बाहेर पडले. येथे
बऱ्याच जणांचा विश्रांतीचा विचार होता. पण ड्रायव्हर साहेब अनुप म्हणाले की, “विश्रांती घेतली की पुढे खूप उशीर होईल.
त्यामुळे विश्रांती घेऊ नका, गाडीतच विश्रांती घ्या वगैरे वगैरे ...”. मग अनुप साहेबांचा अध्यादेश मानून थकलेले आम्ही गाडीवर सामान
बांधून पुढील प्रवासास निघालो. पुढील मुक्काम होता लाचुंग या गावी आणि या ठिकाणावरून उद्या आम्ही झिरो पॉईंट व युंगथान
व्हॅली पहायला जाणार होतो. आमच्या या प्रवासामध्ये बहुतेक हॉटेलमधील एक जण सामील
झाला होता थोड्याशा अंतरापर्यंत.
हॉटेलजवळील फोटो
हॉटेलमधून निघाल्या
निघाल्या एका धबधब्याजवळील एका विचित्र आणि भयानक वळणाच्या पुलाजवळ आम्ही एक घडून
गेलेला अपघात पाहिला. एक महिंद्रा मॅक्स गाडी डायरेक्ट धबधब्याच्या प्रवाहात पडली
होती. गाडीचे जास्ती काही नुकसान झाले आहे असे जाणवत नव्हते पण गाडीतील माणसे वाचली असतील की नाही याबद्दल शंका वाटत होती. पुलावरील या वळणावर काम चालू होते आणि गाडी
चालवताना या वळणाचा व्यवस्थित अंदाज येत नाही. कदाचित या कारणामुळेच अपघात झाला
असावा. इथे आमची अपघात कसा घडला असेल,
नक्की काय झाले असेल वगैरे वगैरे वर चर्चा चालू असतानाच अनुप पुलावरून गाडीचा
व्यवस्थित अंदाज घेऊन गाडी कुणाची असेल वगैरे वर अंदाज बांधत होता. मग हा अपघात
प्रपंच पाहून आम्ही पुढील प्रवासास सुरुवात केली.
प्रवासातील काही
निसर्गाची विहंगम दृश्ये –
वाटेत काढलेले काही फोटो
पुढे वाटेत पाय
मोकळे करण्यासाठी तसेच काही तरी खाऊन घ्यावे म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो.
अनुपला ही आमच्या जेवणाच्या सोयीसाठी सामान खरेदी करायचे होते. मग आम्ही एका
हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेलो आणि अनुप सामान खरेदीसाठी. आम्ही अंडा-ऑम्लेट
खाल्ले आणि वरून कॉफीचा वरपा - J. पहिल्यांदा घेतलेली कॉफी लईचं फक्कड होती म्हणून पुन्हा सांगितली तर
पहिलीच्या मानाने दुसऱ्यांदा आलेली कॉफी एकदम पुंगास होती आणि आमचा पचका
झाला.
पुढे हॉटेलवर
पोहोचायच्या थोडेसे आधी एक मोठा धबधबा दिसला म्हणून तिथे थांबलो आणि एखादं-दुसरा
फोटो काढून पुन्हा पुढे निघालो. साधारण ०५:०० वाजता आम्ही आमच्या मुक्कामाच्या
हॉटेलमध्ये पोहचलो. पोहचल्या पोहचल्या आम्हा सर्वांना हॉटेलची ठेवण आवडल्याने
आमच्यातील बऱ्याच जणांनी चांगली हवी तशी खोली मिळावी म्हणून धावपळ केली. पण
मिळालेल्या सगळ्याच खोल्या छान होत्या. मग हातपाय धुऊन चहा वगैरे घेतला आणि बाहेर
फिरायला गेलो. बऱ्याच जणांना घरी फोन करायचा होता म्हणून तेथील हॉटेलवाल्याचा फोन
घेऊन त्याचे कार्ड टॉपअप करून घेतले आणि मग घरी फोनाफोनी करून घेतली. परत हॉटेलवर
आल्यावर आमच्यापैकी जवळपास सगळ्यांनीच आंघोळी करून घेतल्या. त्याचवेळी बाजूला
पत्त्याचे डाव चालूच होते. जेवणाचा निरोप येईपर्यंत पत्त्यांचे डाव चालूच होते.
जेवणाचा निरोप आल्यावर एकदम मस्त जेवण करून घेतले. जेवणामध्ये फक्त भात आणि भाजी होती पण जेवण चांगले होते आणि टापटीप पण चांगली होती. मला इथले जेवण आवडले. पण या
हॉटेलमधली पोरं जरा जास्तीच आगाव आणि टुकार वाटत होती. बहुतेक जेवताना थोडाफार
खटका उडालाच.
जेवण झाल्यावर
पुन्हा पत्त्यांचे डाव. मला तर या पत्त्यांच्या डावामध्ये खेळण्यापेक्षा नियमच
जास्त जाणवून आले. हे असे पत्ते आले की परत पिसायचे वगैरे वगैरे. रम्मी खेळून
कंटाळा आला म्हणून अठ्ठी-आठ खेळण्याचे ठरले तर तिथेही प्रत्येकाची वेगळी नियमावली.
मग काय तो ही खेळ बारगळला. सगळ्यांना खेळता यावा म्हणून बदामसात खेळायला सुरुवात
केले तर पुन्हा वेगवेगळे नियम, असे नाही तसे, तसे नाही असे वगैरे वगैरे प्रकर
घडायला लागले. मग मी कंटाळून मला नाही खेळायचे नाही म्हणून बाहेर पडलो आणि सहलीचे
आजचे फोटो बघत बसलो. बराच वेळ पत्ते खेळून झाल्यावर झोपायची तयारी चालू असताना
हॉटेलच्या पोरांचा दारू पिऊन दंगामस्ती आणि जोरात आवाजात दबंग चित्रपटातील गाणी लावून नाच चालू
होता. मग काय चालू आहे म्हणून बाहेर जाऊन पाहिले तर त्यांच्यातील एक पोरग एकदम
अफलातून नाचत होतं. १० मिनिटे त्यांचा नाच पाहून त्यांना विनंती केली की बुवा आवाज
हळू करून नाचा. थोड्या वेळाने ते त्यांचा गोंधळ संपवून त्यांच्या खोलीमध्ये
झोपायला गेले आणि खोलीमध्ये गोंधळ सुरु केला. त्यांच्या शेजारच्या खोलीतल्यांना गोंधळाचा
थोडा त्रास झाला पण काही वेळाने तेही झोपी गेले. आणि आम्ही ही उद्याची स्वप्ने
पहात झोपी गेलो.
तिसऱ्या दिवसाचा एकून खर्च: रु. ६४०/- फक्त
टीप: वेळेअभावी आणि सहलीची टिपणं खूप मोठी होऊ नयेत म्हणून बरेचसे फोटो एकत्र करून एकच फोटो तयार करण्यासाठी खूप वेळ लागत असल्याने वरील वरील टिपणामध्ये काही फोटो सामील न करता टिपण मायाजालावर टाकले आहे. मी काही दिवसानंतर या टिपणामध्ये राहिलेले फोटो टाकणार आहे. चूकभूल देणे घेणे. तुम्ही या सहलीचे काही फोटो मायाजालावरील खालील दुव्यांवर पाहू शकता -
- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) (+ ९ १ ९ ९ ६ ० ७ ८ ८ २ ८ ०)
शुक्रवार, ०९/०९/२०११
Mast re Amar ... avadala mala .. rahilele photo kadhi taknar ahes ?
उत्तर द्याहटवाAre Blogpost khup mothi hovu naye mhanun barechase photos ekatra karun edit karun ekach photo tayar karayala barach vel lagato tyamule thoda vel lagel.
उत्तर द्याहटवाJar tula Trip che sagale photo have asatil tar Sameer Kawade te picasa war upload kele aahet.