सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

सिक्कीम प्रवास वर्णन – दिवस चौथा



बुधवार, ०३/११/२०१०.

कालच्याला आमच्या ड्रायव्हर साहेबांनी अनुपने भल्या पहाटे ०५:०० वाजता निघुयात म्हणून सांगितले होते. त्याने हे सांगितले होते खरे पण साहेब काल रात्री बिअर/दारू पिऊन तुंग होते त्यामुळे साहेब ०५:०० वाजता उठू शकतील कि नाही याबद्दल आम्हाला शंका वाटत होती.

ठरल्याप्रमाणे पहाटे ०३:३० वाजता उठून मी शाही स्नान करून घेतले आणि माझे आवरून घेतले. माझे आवरून झाल्यावर बाकीच्यांना एक एक करून उठवायला सुरुवात केली. अनुप साहेब ०५:०० वाजता उठले होते. सर्वांचे आवरून झाल्यावर निघताना चहा घेतला तर तो कालचा रात्रीचाच असल्याचे जाणवून आल्याने आम्ही अर्धवट चहा किंवा चहा न घेताच साधारण ०५:१५ वाजता झिरो पॉइंट या स्थळाला भेटण्यासाठी निघालो. निघताना इथे लाचेनपेक्षा कमी थंडी जाणवत होती. पण झिरो पॉइंटला आणखी जास्त थंडी/गारठा आणि थंड वारे वाहते याबद्दल प्रशांत/अनुप ने आगोदरच सांगितले होते त्यामुळे मी कालच्याप्रमाणेच माझी गरम कपड्यांची संपत्ती बरोबर घेतली होती आणि झिरो पॉइंटवर उस्ताहपूर्वक गोंधळ घालण्यासाठी कालच्याप्रमाणेच स्वत:ला गरम कपड्यांमध्ये गुंडाळून घेतले होते.



झिरो पॉइंटच्या प्रवासामध्ये एकदा निघाल्यानंतर झिरो पॉइंटवरच थांबायचे होते. आणि आमचा हा प्रवास कालच्याप्रमाणेच अंधेरी दुनियेतील डोंगरांवरील बर्फाच्या साम्राज्याचे दर्शन घेत, डोंगरांवरील छोट्या/मोठ्या झाडांचं आणि पडणाऱ्या बर्फाचं नातं/करारनामा पाहत, गप्पा मारत, एकमेकांची चेष्टा-मस्करी करीत चालला होता.

झिरो पॉइंटचा रस्ताही बऱ्यापैकी घाटातून होता आणि पुढे पुढे तर कधी उजव्या बाजूला, कधी डाव्या बाजूला, तर कधी दोन्ही बाजूला पूर्णपणे मोकळा परिसर होता आणि या मोकळ्या परिसराच्या पलीकडे एखादा उंचच उंच डोंगर, कधी अर्धवट बर्फाने माखला गेलेला डोंगर तर कधी पूर्णपणे बर्फाने कवटाळलेला डोंगर, नदी किंवा वाहत्या पाण्याचा प्रवाह असे दृश्य होते.


रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे हे नैसर्गिक सौंदर्य आम्ही डोळ्यांमध्ये साठवून पुढे पुढे जात होतो. साधारण तासाभराने उजाडायला सुरुवात झाली होती. ज्याप्रमाणे इथे अंधार खूप लवकर पडतो त्याप्रमाणे इथे उन्हही खूप लवकर पडते. साधारण सकाळच्या ०५:३० - ०५:४५ पासूनच उन्ह पडायला सुरुवात होते. सकाळच्या उन्हामुळे पर्वतशिखरे पिवळसर दिसत होती आणि निसर्ग अजूनच नयनरम्य दिसू लागला होता. जसजसे पुढे जात होतो तसतसे आम्हाला दुरवर असलेल्या डोंगरांवर पडलेले उन्ह दिसत होते आणि त्यावेळेला आम्ही मात्र सावलीतुन जात आहोत असे वाटत होते. पुढे एका ठिकाणी दुरवर असलेल्या एका डोंगरावर आम्हाला ३ मोठेच्या मोठे सुळके दिसत होते. पुढे एका ठिकाणी अनुपला बर्फामध्ये खेळण्यासाठी गाडी थांबवायला सांगितले तर त्याने सांगितले कि झिरो पॉइंटला याच्यापेक्षा जास्ती बर्फ आहे तिथेच मस्ती करून घ्या.


साधारण ०७:१५ - ०७:३० च्या दरम्यान आम्ही झिरो पॉइंट या ठिकाणी पोहचलो. झिरो पॉइंट म्हणजे एक मोठाच्या मोठा खुला परिसर होता. त्याच्यामधून पर्यटकांसाठी एक रस्ता होता. हा रस्ता इथेच संपतो आणि यापुढे गाडी घेऊन जाता येत नाही. एका बाजूला साधारण खुल्या परीसरापलीकडे बर्फांच्छादीत डोंगर होते. दुसऱ्या बाजूला थोड्याश्या अंतरावरून वाहणारी अतिशय स्वच्छ पाणी असलेली नदी (किंवा पाण्याचा प्रवाह) आणि त्याच्या पलीकडे पुन्हा मोकळा परिसर व साधारण जंगल. रस्त्याच्या उजव्या बाजूला खाद्यपदार्थ विक्री करणारे लोक बसले होते.



है साला, झिरो पॉइंटवर गाडी थांबली रे थांबली कि आम्ही हावऱ्यासारखे गाडीतून बाहेर आलो आणि हुल्लडबाजी करायला सुरुवात केली. बाहेर आलो तर थंड बोचरा वारा जोराने वाहत होता आणि झिरो पॉइंट खुपच उंचावर असल्याने श्वासोच्छवासास त्रास होत होता. मग सगळेजण पळत पळत बर्फात खेळण्यासाठी म्हणून एका ठिकाणी गेलो आणि एकमेकांस बर्फाने मारण्यास सुरुवात केली. एकेकट्याला एकेकट्याने व्यवस्थितपणे बर्फ मारता येईना आणि जास्ती मजा पण येईना म्हणून टोळ्या तयार करून एखाद्याला बर्फ मारायचा प्रयत्न सुरु झाला आणि पळापळी सुरु झाली. पळापळी सुरु झाली रे झाली कि जास्तीत जास्त ४५ - ५० सेकंदात आम्ही सगळे गारद - कारण होते श्वासोच्छावासासाठी होणारा त्रास आणि बोचणारे थंड वारे. मग धावपळ थांबवून आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि काही एकत्रित फोटो काढून घेतले.




धावपळीत सगळ्यांचे चेहरे लालभडक झाले होते आणि छोटे सरकार पुरते गारद झाले होते. त्यांना थंडी अजिबात सहन होत नव्हती त्यामुळे त्यांनी माघार घेऊन गाडीत जाऊन बसणे पसंद केले होते. पळापळी केल्यामुळे प्रशांतलाही चक्कर आल्यासारखे वाटत होते त्यामुळे तो ही समीरबरोबर थोड्या वेळासाठी गाडीत जाऊन बसला होता.  ते दोघे गेल्यानंतर आम्ही आणखी काही स्वतःचे फोटो काढून घेतले - काही नदीजवळ, काही बर्फावर लोळताना वगैरे वगैरे. इथे इतकी थंडी होती कि जर तुम्ही थुंकलात तर तुमची थुंकी बर्फ होऊन जमिनीवर पडत होती. कदाचित तुम्हाला हे अतिशयोक्ती वाटेल पण तिथे खरचं इतकी थंडी होती.

या ठिकाणी फिरून झाल्यावर आम्ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला देखील फिरायला गेलो आणि एखादं-दुसरा फोटो काढून घेतला. तसे पाहता बहुतेक आम्हीच सर्वात आगोदर किंवा दुसरे / तिसरे झिरो पॉइंटवर पोहचलो होतो आणि आता हळूहळू गर्दीही वाढू लागली होती. मला या ठिकाणी एखादा स्टायलिश/हटके फोटो काढून घ्यायचा होता. मग प्रशांतला विनंती करून मी तसा फोटो काढून घेतला. झिरो पॉइंटवर मी इतका उस्ताही होतो कि काही मिनिटांसाठी मी उघडादेखील फिरू शकलो असतो.


हे नैसर्गिक सौंदर्य पाहून डोळ्यांचे समाधान झाले असले तरी पोटाचे समाधान करणे अजून बाकी होते. मग काय तेथेच उभे असलेल्या लोकांकडून उकडलेले हरभरे, अंडा-ऑम्लेट, जाम-ब्रेड, चहा या पदार्थांवर आम्ही ताव मारला. छोटे सरकार पार गारठून गेले होते आणि जर कुणाकडून गाडीचा दरवाजा चुकून उघडा जरी राहिला तर साहेब चीडचीड करीत होते. गारठलेल्या अवस्थेमुळे साहेबांना प्रत्येक गोष्ट हातात द्यावी लागत होती. गारठलेल्या अवस्थेतून बाहेर यावे म्हणून तेथेच असलेल्या रम विक्रेत्याकडून त्याने एक ग्लासभर रम घेतली आणि पिली. रम पिल्यानंतर त्याला थोडे बरे वाटू लागले. त्यानंतर त्याने फक्त टी-शर्ट वर आणि अनवाणी पायांनी त्या ठिकाणी फेरफटका मारला.

बोचरा वारा अजूनच जोरात वाहत होता. मी खाताना देखील हातात हातमोजे घालून खात होतो. सकाळची न्याहरी व्यवस्थितपणे उरकून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. आमच्या परतीच्या मार्गावर वाटेत एक झिरो पॉइंटकडे जाणारी गाडी बंद पडली होती. मग त्या गाडीला मदत करण्यासाठी अनुपने आमची गाडी तिथे थांबवली. आमच्या गाडीप्रमाणेच आगोदरच काही गाड्या तिथे मदतीसाठी थांबल्या होत्या आणि त्या मार्गावरून जाणाऱ्या सगळ्या गाड्या थांबत होत्या. बराच वेळ झाला तरी ही गाडी चालू होत नव्हती म्हणून अनुपला आम्ही आपण निघुयात म्हणून विनंती केली पण तो काही निघाला नाही. बंद पडलेली गाडी सुरु होईपर्यंत एकही गाडी तिथून हलली नाही. ती गाडी सुरु झाल्यावरच बाकीच्या गाड्यांनी पुढील प्रवासास सुरुवात केली. सिक्किममधील एकमेकांना मदत करण्याची ही वृत्ती खरचं खूप नावाजण्यासारखी आहे. अहो इथे महाराष्ट्रात मी लोकांना मदत करणाऱ्यांचा उद्धार करणारे आणि त्यांची कळा खाणारे लोक पाहिले आहेत आणि त्याचा स्वतःही अनुभव घेतला आहे. असोत ... गाडी चालू व्हायला बराच वेळ लागत होता म्हणून आम्ही पुन्हा एकदा फोटो सेशन करून घेतले आणि परतीच्या मार्गावरून पदयात्रा करून घेतली.


मग पुढे युंगथान व्हॅली या ठिकाणी थांबलो. या ठिकाणी उजव्या बाजूला बर्फाच्छादित डोंगर आणि डाव्या बाजूला मोकळा परिसर, नंतर स्वच्छ पाण्याची नदी, आणि त्यापलीकडे जंगल होते. मग गाडीतून उतरून थोडेसे अंतर चालून आम्ही नदीकडे निघालो. जाताजाता वाटेमध्ये सर्वांनी वेगवेगळया पद्धतीने स्वतःचे फोटो काढून घेतले. पुढे वाटेत एक भला मोठा दगड होता त्यावर उभे राहून, नंतर सर्वजण एकदम त्या दगडावरून उडी मारतानाचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण तो काय एवढा यशस्वी झाला नाही. मग पुढे पुन्हा नदीकाठी आणि नदीमध्ये असलेल्या एका दगडावर बसून सर्वांनी छोटू नानाचा गॉगल घालून वेगवेगळया छटांमध्ये स्वतःचे फोटो काढून घेतले. नदीकाठीसुद्धा गर्दी वाढायला लागली होती आणि हिरवळही वाढायला लागली होती. मग इथली हिरवळ वगैरे पाहून इकडे तिकडे थोडावेळ उंडारून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. परत जाण्याच्या वेळेला नदीकाठी कदाचित आम्हाला एक महाराष्ट्रीयन समूह भेटला होता.



युंगथान व्हॅलीच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही / बहुतांशी वेळा साधारण मार्च-एप्रिल मध्ये इथे रस्त्याच्या दुतर्फा फुले उगवलेली असतात आणि हे नैसर्गिक दृश्य खूप नयनरम्य असतं. मार्च आणि एप्रिल मध्ये सिक्किम मध्ये फुलांचा आंतरराष्ट्रीय महोस्तव होतो आणि तो पाहण्यासाठी परदेशातून पर्यटक येत असतात म्हणे. सध्या सिक्किममध्ये एकही विमानतळ नाहीये पण आम्हाला तेथील लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१२ पर्यंत इथे एक विमानतळ तयार होणार आहे. जेंव्हा हे विमानतळ तयार होईल तेंव्हा त्याचा पर्यटनासाठी खूप खूप खूप फायदा होईल.

युंगथान व्हॅलीनंतर आम्ही गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणी गेलो. झऱ्यापाशी जाण्यासाठी रस्त्यापासून थोडेसे अंतर चालावे लागते. चालत असताना वाटेत नदीवर बांधलेला लाकडी पूल लागतो. या ठिकाणी काही फोटो काढून पुढे जाऊन आम्ही गरम पाण्याचे झरे पाहून घेतले. या ठिकाणी फोटो काढताना आमच्यातील   कोणीतरी पाण्यात पडले होते. तेथे काही महाराष्ट्रीयन मंडळी भेटल्यानंतर त्यांच्याबरोबर गरम पाण्याच्या झऱ्यांचे महत्व, फायदे, असे झरे कुठे कुठे आहेत, सिक्किममध्ये काय काय पाहिले आणि आणखी पाहण्यासारखे काय आहे या विषयांवर चर्चा करून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.

परतीच्या मार्गावर वाटेत एका ठिकाणी पिण्यासाठी बिअर/दारू मिळत होती. त्या ठिकाणी छोटू नाना आणि समीर आमच्या आगोदर हजर. हे बिअरचे दुकान २ सुंदर मुली सांभाळत होत्या. मग काय छोटू नानांनी त्या मुलींकडून बिअर मागून घेतली आणि बिअर पीत पीत तो आणि समीर या दोघींशी बोलत बसले.छोटू नानांना बिअर आवडली नाही म्हणून त्याने समीरला दिली. आम्ही तिथे पोहचल्यानंतर आम्हाला हे दृश्य पहायला मिळाले. असे म्हणतात ना कि "रम रमा रमी" च्या पाठीमागे लागू नये. पण आमच्या समूहामध्ये "रमी" (बिन पैशाची) रोजच होतेय, "रम" सकाळीच झाली, आता काय जणू "रमा" चीच बाकी होती म्हणून कि काय छोटू नानांचा असा कारभार चालू होता. छोटू नाना कौशल्यपूर्ण पद्धतीने त्या दोघींशी बोलत होते आणि छोटू नानाचे हे कौशल्य आम्ही न्याहाळत तिथे बसलो होतो. बिअर पिऊन झाल्यावर छोटू नानाने त्या २ पोरींबरोबर त्यांच्या गळ्यात हात घालून फोटो काढून घेतले. फोटो काढून तेथून निघताना त्या २ पोरींमधील एक पोरगी छोटू नानाला "मुझसे शादी करो और मुझे तुम्हारे साथ ले चलो" म्हणाली. मग काय छोटू नानाने "ठीक है| चलो हमारे साथ|" म्हटलं. पण ती पोरगी नंतर नको म्हणाली आणि आम्ही तिथून परत निघालो.

तिथून मग आम्ही हॉटेलवर परत आलो. जेवणाची तयारी होईपर्यंत बॅगा आवरून घेतल्या, झिरो पॉइंटचे फोटो वगैरे पाहून घेतले. थोड्याच वेळात जेवणासाठीचा निरोप आल्यानंतर जेवण करून घेतले. आजचे ही जेवण छान झाले होते. जेवण झाल्या झाल्या सगळे सामान गाडीवर बांधून निघायची तयारी करून घेतली. या हॉटेलमधील जेवण आवडल्याने इथल्या पोरांना खुशी देऊन आम्ही निघण्याच्या तयारीत होतो पण हॉटेलमधील दोघांना दिवाळीसाठी म्हणून त्यांच्या घरी जायचे होते त्यामुळे त्यांनी आम्हाला आमच्याबरोबर गाडीत येण्यासाठी विनंती केली होती. पण आम्ही ७ जण असल्याने एक जण येऊ शकतो असे सांगितले. त्या दोघांना मिळूनच यायचे होते आणि आम्ही दोघांना गाडीत घेऊ शकत नव्हतो. त्यामुळे ते दोघे नाराज झाल्याचे जाणवून येत होते पण त्याला काही पर्याय नव्हता. अशा प्रकारे इथला मुक्काम हलवून आम्ही गंगटोकच्या दिशेने आगेकूच केली.

पुढील प्रवासात आमचीदेखील गाडी एका ठिकाणी बंद पडली होती. गाडीचा गाडी वळवण्यासाठी वापर केला जाणारा कोणता तरी दांडा खराब झाला होता आणि त्यामुळे अनुपला गाडी वळवताना वगैरे थोडासा त्रास होत होता. कदाचित अनुपला तो खराब होत आलेला आहे याची पूर्वकल्पना असावी कारण त्याने नवीन दांडा गाडीमध्ये ठेवला होता. खराब झालेला दांडा काढून नवीन बसवण्यासाठी गाडीचे चाक हाताने वळवावे लागत होते आणि ते आम्हाला लवकर जमत नव्हते. थोडेसे प्रयत्न केल्यानंतर आम्हाला ते शक्य झाले आणि तो दांडा बदलला गेला. जिथे गाडी बंद पडली होती त्याच्याजवळच डोंगराच्या पायथ्याला हायड्रो प्लांटसाठी बोगद्याचे काम चालू होते. हे काम चालू असताना प्रशांत आणि समीरने येथे असलेल्या काही नवीन फुलांचे फोटो काढून घेतले. अनुपनेही काल घडलेल्या एका अपघाताची बातमी आम्हाला सांगितली.

झिरो पॉइंट, युंगथान व्हॅलीच्या प्रवासामुळे आम्ही थोडेसे/बरेच आळसावलो/थकलो होतो. मग आमच्यातील काही जणांनी गंगटोकच्या प्रवासाच्यावेळी गाडीमध्ये डुलक्या मारून घेतल्या. अंधार पडण्याच्या वेळेला आम्ही सिक्किम प्रवास वर्णन - दिवस दुसरा मध्ये नमूद केलेल्या हॉटेलमध्ये चहापाण्यासाठी थांबलो. तिथे पोहचल्यावर पुन्हा त्या हॉटेलमधील बोलक्या बाहुलीचे संभाषण ऐकून/पाहून तिथे थोडा वेळ घालवून आम्ही पुढे निघालो. पुढे एका ठिकाणी वाटेत एक मोठा दगड होता आणि तो अंधार पडल्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हता. त्या दगडाच्या अगदी जवळ पोहचल्यावर अनुपला तो दगड दिसला आणि त्याने समयसूचकतेने गाडी वळवल्याने आमचा अपघात टळला. जर अनुपने समयसूचकता दाखवली नसती तर आमचा भयानक अपघात होण्याची शक्यता होती. अपघात प्रसंगातून वाचल्यानंतर साधारण तासाभराने आम्ही गंगटोक मधील आमच्या हॉटेलजवळ पोहचलो. ३ दिवसापासून अनुप आमच्याबरोबर होता आणि आमची छान मैत्री ही झाली होती. ३ दिवसाच्या अनुपच्या कामगिरीवर खुश होऊन आम्ही त्याला खुशीदेखील दिली.

उद्याचा दिवस सोडून परवा दिवशी आम्हाला नथूला (भारत - चीन सीमा) ला जायचे होते. सिक्किममध्ये भाडे तत्वावर चालणाऱ्या गाड्या सिक्किममधील दोन भागांमध्ये विभागल्या आहेत. एक म्हणजे लाचेन-लुचांग वगैरे वगैरे आणि दुसरे म्हणजे नथूला. या विभागामुळे अनुप आणि अनुपची गाडी आमच्याबरोबर नथूलाला येऊ शकणार नव्हती. पण आता अनुपबरोबर चांगली ओळख झाली होती आणि तो ही आमच्यामध्ये मिळून मिसळून वागत होता त्यामुळे त्यानेच आमच्याबरोबर नथूलाला यावे असे आम्हा सर्वांना वाटत होते. आणि त्याप्रमाणे आम्ही तशी विनंतीही त्याला केली पण तो सिक्किमच्या भाडे तत्वावर चालणाऱ्या गाड्यांचे नियम सांगत होता. शेवटी त्याने "दीपक$ से$ बात$$ कौर$ के$ देखोता$ हू$$ |" असे उत्तर दिले आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.


आम्ही थोडा वेळ विश्रांती घेऊन सगळं आवरून घेतलं, चहा घेतला, आणि सगळे मिळून गंगटोकमधील गांधी रस्त्यावरील बाजारपेठेत फिरण्यासाठी गेलो. आता दिवाळी सुरु झालेली असल्याने बाजारपेठेत फटाकेबाजी वगैरे चालू होती. हे सर्व पाहत बाजारपेठेत आम्ही उंडराउंडरी करून घेतली. फिरून झाल्यावर शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन समूह करून आम्ही दोन वेगवेगळया हॉटेलमध्ये जेवायला गेलो. जेवण झाल्यावर मी आणि प्रशांतने उद्या गंगटोक फिरण्यासाठी टॅक्सीची चौकशी करून घेतली आणि किती पैसे लागतील याचा अंदाज बांधून घेतला. हॉटेलवर गेल्यावर पुन्हा नेहमीप्रमाणे पत्ते, मस्ती, गप्पा, आणि फोटो पाहणे वगैरे वगैरे चालू झाले. मागील ३ दिवसात रोज लवकर उठावे लागत असल्याने उद्या ८ वाजता बाहेर पडायचे ठरवून सगळ्यांनी अंथरुणात प्रवेश केला.

चौथ्या दिवसाचा एकूण खर्च: रु. १५६७/- फक्त.

टीप: हे टिपण लिहिताना मी बऱ्याच गोष्टी विसरलो होतो. हे टिपण लिहिण्यासाठी प्रशांत घोळवे ची खूप मदत झाली. त्याबद्दल त्याचे आभार.



- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) (+ ९ १ ९ ९ ६ ० ७ ८ ८ २ ८ ०)
सोमवार, १९/०९/२०११

२ टिप्पण्या: