रविवार, २५ सप्टेंबर, २०११

सिक्कीम प्रवास वर्णन – दिवस पाचवा


गुरुवार, ०४/११/२०१०.

सकाळी उठल्या उठल्या प्रशांत ने काढलेले कांचनगंगा शिखराचे फोटो
आज गंगटोकमध्येच फिरायचे असल्याने काल रात्री सर्वांनी थोडेसे उशिरा बाहेर पडण्याचे ठरवले होते. नेहमीप्रमाणे मी सर्वात सर्वप्रथम लवकर उठून शाही स्नान करून माझे आवरून घेतले. मग त्यानंतर एकेकाला उठवायला सुरुवात केली. सगळ्यांचे आवरून झाल्यावर गंगटोकमध्ये पहिल्या दिवशी जिथे सकाळची न्याहरी केली होती तिथेच पुन्हा आम्ही मागच्या वेळच्या टोळक्याने पोट भरून न्याहरी करून घेतली. सिक्किममध्ये मोमो नावाचा खाद्यपदार्थ खूप प्रसिद्ध असल्याने तो खाण्यासाठी मागवला तर तो संपलेला होता. आम्ही फक्त उद्याचाच दिवस इथे असल्याने मोमो खायला मिळेल की नाही अशी माझ्या मनात पाल चुकचुकू लागली होती. न्याहरी करता करता हिरवळ पाहण्यासाठी/शोधण्यासाठी आमच्यातील काही जणांच्या नजरा घारीप्रमाणे इकडेतिकडे भिरभिरत होत्या.
न्याहरी करून झाल्यावर हॉटेलवर परत जाताना गंगटोक फिरण्यासाठी २ टॅक्सी ठरवल्या. टॅक्सीच करण्याचे कारण म्हणजे गंगटोकमध्ये भाडे तत्वावर चालणाऱ्या गाड्यांना फिरण्यासाठी परवानगी नाहीये. गंगटोकमध्ये बहुतेक ११ ते १३ ठिकाणे आहेत पाहण्यासारखी. आता ही ठिकाणे म्हणजे महाराष्ट्रातील महाबळेश्वरची १३ / १४ ठिकाणे जशी आहेत त्याप्रमाणे. गंगटोकमधील एक पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे येथील प्राणी संग्रहालय (झु). पण नेमके आज त्याला साप्ताहिक सुट्टी होती त्यामुळे आम्हाला ते काही पाहता येणार नव्हते. यावरून ध्यानात घ्या कि एखाद्या मोठ्या सहलीला जाताना किती बारीकसारीक गोष्टींची चौकशी करणे आवश्यक असते/आहे. नाहीतर मग एखादे ठिकाण बघणे राहून जाऊ शकते. आम्ही सिक्किममध्ये येताना या प्राणी संग्रहालायाच्या साप्ताहिक सुट्टीचा विचार केलेला नव्हता. असोत ...
मग २ टॅक्सी ठरवल्या गंगटोक फिरण्यासाठी. वाटेत काहीतरी खरेदी होऊ शकते म्हणून एखादं-दुसऱ्याने बरोबर एखादी बॅग घेतली आणि आम्ही गंगटोक दर्शनासाठी निघालो.

पहिले ठिकाण - सिक्किममधील हस्तकलेचं प्रदर्शन आणि विक्री

हे हस्तकलेचे प्रदर्शन आणि विक्री कदाचित सिक्किम सरकार किंवा सिक्किम पर्यटन विभागाच्या अखत्यारीत येत असावे. या ठिकाणी आमच्यातील बऱ्याच जणांनी छोट्या छोट्या वस्तू खरेदी करून घेतल्या. मी ही घरच्यांसाठी आणि ओळखीच्यांना भेटवस्तू देण्यासाठी काही वस्तू खरेदी करून घेतल्या. पण पुण्यातील घरी नवीन नवरी मुलगी पहिल्यांदा आल्यानंतर तिला देण्यासाठी साडी किंवा ब्लाऊजपीस नसल्यामुळे यातील एक भेटवस्तू तिला दिल्यामुळे घेतलेल्या वस्तूंचे वाटप ठरल्याप्रमाणे नाही झाले तो भाग निराळा. या ठिकाणी साधारण तासभर खरेदी करून आम्ही पुढील ठिकाणी निघालो.




दुसरे ठिकाण - एक छोटासा धबधबा

या ठिकाणी पर्यटक थांबावेत म्हणून आजूबाजूचा परिसर आखीवरेखीव पद्धतीने सजवलेला होता. समोरच काही छोटे हॉटेल्स होती. धबधब्याजवळ सिक्किमचे पारंपारिक पोशाख फोटो काढण्यासाठी भाड्याने मिळत होते. आता इथपर्यंत आलोच आहोत तर सिक्किमच्या पारंपारिक पोशाखात फोटो काढण्यासाठी सर्वांनी वेगवेगळे पोशाख भाड्याने घेतले आणि आम्ही सर्वांनी वेगवेगळया छटांमध्ये स्वतःचे फोटो काढून घेतले. मी आणि प्रशांतने शलाम शाहीब च्या छटेमध्ये आमचे काही फोटो काढून घेतले. या ठिकाणी देखील साधारण ४५ मिनिटे ते १ तास थांबून आम्ही पुढील ठिकाणास भेट देण्यासाठी निघालो.






तिसरे ठिकाण - रूमटेक मोनेस्ट्री

हे ठिकाण म्हणजे बौद्ध धर्मियांची गुरुकुल पद्धतीची शिक्षण संस्था भासत होती. याच ठिकाणी बौद्ध धर्मियांचे एक मोठे मंदिर होते. (बौद्धधर्मीय कदाचित अशा ठिकाणांना मंदिर म्हणत नाहीत.) मंदिरामध्ये प्रकाशासाठी विजेवर चालणारे एकही उपकरण नसून मेणबत्त्या होत्या. मंदिराच्या बाजूलाच शालेय वस्तीगृहाप्रमाणे इमारत/इमारती होत्या आणि येथील प्रत्येक मुलाचा पोशाख दलाई लामांसारखा चॉकलेटी रंगाचे धोतर आणि उपर्ण अशा पद्धतीचा होता. आम्ही जेंव्हा तिथे फिरत होतो त्यावेळेला कदाचित त्या मुलांची शाळेची मधली सुट्टी झाली आहे किंवा शाळा भरायची वेळ झाली आहे असे वाटत होते आणि त्या मुलांची खुपच धावपळ, खोड्या करणे चालू होते. या ठिकाणी काही नवीन प्रकारची फुले दिसत होती. प्रशांत आणि समीरने त्यांचे फोटो काढून घेतले. 




चौथे ठिकाण - ताशी व्हू पॉइंट

या ठिकाणाहून तुम्ही कांचनगंगा शिखर लांबून पाहू शकता. कांचनगंगा शिखर पाहण्यासाठी तुम्हाला काही पायऱ्या चढून वरती जावे लागते. येथून कांचनगंगा शिखराबरोबरच गंगटोक शहराचा बराचसा परिसर एका नजरेत दिसतो. या व्हू पॉइंटच्या पायथ्याला खरेदी करण्यासाठी २/३ दुकाने होती. पुन्हा या ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी खरेदी केली. याच ठिकाणी मी काऊ-बॉय सारखी टोपी खरेदी केली आणि फोटो पण काढून घेतला. खरेदी करून झाल्यावर खरेदीच्या सामानाची पिशवी घेऊन गाडीकडे परतत असताना प्रशांतने माझे लक्ष्य नसताना काऊ-बॉय स्टाईलमध्ये २ अप्रतिम फोटो काढले.




पाचवे ठिकाण - गणेशटोक

हे ठिकाण म्हणजे थोड्याशा उंचावर असलेले एक गणेश मंदिर. या मंदिरामध्ये महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे फोटो होते. बोलता बोलता प्रशांतने त्या पुजाऱ्याला आम्ही हे अष्टविनायक ज्या ठिकाणाचे आहेत त्या ठिकाणाहून आलो आहोत हे सांगितले. मंदिरातील अष्टविनायकाचे फोटो पाहून छान वाटले. याही ठिकाणावरून गंगटोक शहराचा बराचसा परिसर एका नजरेमध्ये दिसतो.




सहावे ठिकाण - फुलांचे प्रदर्शन / फुलांची नर्सरी

या ठिकाणी नर्सरीकडे जाण्याच्या पादचारी मार्गाच्या बाजूला सुंदर बाग होती आणि पुढे कारंजे वगैरे होते. नर्सरीत आतमध्ये प्रवेश केल्यावर आम्हाला विविध प्रकारची असंख्य फुले एकाच ठिकाणी पहायला मिळाली. मार्च-एप्रिल मध्ये हीच फुले जर रस्त्याच्या दुतर्फा दिसत असतील तर कसे दिसत असेल, ते पाहताना आपल्याला काय वाटेल असा विचार माझ्या मनात तरळून गेला. प्रशांत साहेबांनी या नर्सरीतील सगळ्या फुलांचे फोटो काढण्यासाठी कॅमेराचा ताबा घेतला होता. 

आम्ही सगळे ही फुले पहात पहात नर्सरीत फिरत होतो तर प्रशांत फुलांचे फोटो काढत काढत आमच्या मागून येत होता. त्या फुलांमध्ये आम्हाला आमचे काही फोटो काढून घ्यायचे होते म्हणून आमचे प्रशांतला विनवणी करणे चालू होते. मग बऱ्यापैकी विव्हळून झाल्यावर प्रशांतला पाझर फुटत होता आणि आमचा एखादं-दुसरा फोटो काढला जात होता. या सगळ्यामध्ये एखादे अप्रतिम फुल दिसल्यावर माझा एकट्याचा त्या फुलाबरोबर फोटो काढण्यासाठी माझी खूप हावहाव चालू होती. अधूनमधून प्रशांत माझ्या या हावरटपणाला कंटाळून माझा एखादं-दुसरा फोटो काढीत होता. नर्सरीमध्ये तासभर वेळ घालवून आम्ही पुढे निघालो. जाता जाता आमच्यातील काही जणांनी फुलांच्या बिया विकत घेतल्या. जाताजाता आम्हाला पुण्यातील एक पंजाबी झोडपे भेटले होते.





सातवे ठिकाण - सिक्किम व्ह्यू पॉइंट

हे ठिकाण पाहण्यासाठी मुख्य रस्त्यावरून थोडेसे अंतर चालून जावे लागते. या ठिकाणाकडे जाताना बरीच माकडे दिसत होती आणि त्यांचे खोड्या करणे चालू होते. माकड/माकडे दिसणे म्हणजे आमच्यासाठी चेष्टा-मस्करी सुरु करण्याचे एक निमित्त असतं. माकडे दिसली रे दिसली कि मग अखंड प्राणीमात्राचे संदर्भ जोडून चेष्टेला सुरुवात. मग चेष्टा करीत करीत आम्ही या ठिकाणापाशी पोहचलो. याच वाटेवर दोन्ही बाजूला मोठमोठी हिरवीगार झाडे होती त्यामुळे चालताना उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. या ठिकाणावरून गंगटोक आणि सिक्किमचा बराचसा परिसर दिसून येतो. याच वाटेवरून जाताना आम्हाला मध्ये एक भरपूर बडबड करणारी पोरगी दिसली. बहुतेक छोटू नानांनी तिच्याबरोबर जुजबी बोलून तिच्याबरोबर फोटो काढून घेतला.




आठवे ठिकाण - असेम्ब्ली पॉइंट आणि रोपवे पॉइंट

वर नमूद केलेल्या ठिकाणाजवळच हे ठिकाण होते. याच ठिकाणी सिक्किम राज्याची / गंगटोक शहराची असेम्ब्ली / assembly होती. दुरूनच तिचे दर्शन घेऊन आम्ही रोपवेकडे प्रस्थान केले. रोपवेमधून पुन्हा  एकदा गंगटोक दर्शन करून घेतले.




नववे ठिकाण - गंगटोक ऐतिहासिक संग्रहालय

येथे गंगटोक मधील जुन्या वस्तू, बौद्ध धर्मियांच्या काही पुरातन वस्तू, हत्यारे संग्रहित करून ठेवण्यात आली आहेत.  येथील वस्तूंमध्ये / बाबींमध्ये मला मानवी हाडांचा बराच वापर केलेला आहे असे जाणवून आले. मानवी हाडांचा वापर करण्याचे कारण काय असावे हे काही कळले नाही आणि नंतर मी शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. बौद्ध धर्माच्या इतिहासात आणि सिक्किमच्या इतिहासात घडून गेलेल्या काही गोष्टी इथे चित्रबद्ध करून संग्रहित करण्यात आल्या होत्या. वरच्या मजल्यावर कदाचित ग्रंथालय असावे. तिथे गेल्यावर सगळीकडे बौद्ध धर्मीय पुस्तकेच पुस्तके दिसत होती. या ठिकाणी आता बोर व्हायला लागले होते आणि कंटाळा यायला लागला होता.




दहावे ठिकाण - बौद्ध मंदिर

हे ठिकाण बौद्ध मंदिरासारखे भासत होते. (बहुतेक बौद्ध लोक आपल्याला मंदिरासारख्या भासणाऱ्या अशा वास्तूंना / ठिकाणांना मंदिर म्हणत नाहीत.) हे मंदिर बंद होते कि बंदच असते हे काही कळले नाही. या मंदिराभोवती भाविकांना प्रदक्षिणा घालण्यासाठी सोय करण्यात आली होती. प्रदक्षिणा मारताना बाजूला पितळेचे / तांब्याचे गोल लोखंडी गोलाकार खांबांवर लावण्यात आले होते. असे बरेच गोल मंदिराभोवती होते. भाविक प्रदक्षिणा घालताना ते गोल फिरवत होते. मला ते गोल फिरवताना मजा येत होती. मग मी ही हे गोल फिरवत फिरवत ११ प्रदक्षिणा मारून घेतल्या. मंदिराजवळच तेलाच्या दिव्यात वाती लावण्याचे आणि दिवे लावण्याचे काम चालू होते. इथेही काही फोटो काढून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. 



आता सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या म्हणून तिथेच जवळ असलेल्या टपरीवर चहा, बिस्कीट, मॅगी, आणि मोमो खाऊन घेतले. शेवटी या ठिकाणी आम्हाला सिक्किमचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ मोमो खायला मिळाला. आम्हाला मोमो काय इतका आवडला नाही तो भाग निराळा. मोमो म्हणजे आपल्याकडील उकडलेले मोदक आहेत असे वाटत होते. आपण मोदकांमध्ये जसे गुळ खोबरे घालतो तसे मोमोमध्ये कोबी आणि काही भाज्या/पदार्थ घातलेले असतात. या ठिकाणी टॅक्सी चालक लवकर चला, मी तुम्हाला आणखी २ भारी पॉइंट दाखवतो असे म्हणत होता पण तो त्यासाठी वेगळे पैसे घेणार होता त्यामुळे तो प्रस्ताव नाकारून आम्ही हॉटेलवर परत जाणे पसंद केले.
हॉटेलवर पोहचल्यावर ताजेतवाने / फ्रेश / fresh होऊन थोडावेळ विश्रांती घेतली. नंतर चहा घेऊन सगळे जण मिळून बाजारपेठ फिरण्यासाठी बाहेर पडलो. छोटू नानांना काही कपडे खरेदी करायचे होते म्हणून आम्ही फिरत होतो आणि कपड्यांच्या दुकानात स्वतःसाठीदेखील कपडे पाहत होतो. समीरने त्याच्यासाठी एक टी-शर्ट निवडला होता पण तो त्याच्या मापाचा नव्हता आणि नेमका तोच टी-शर्ट मलादेखील आवडला. तो टी-शर्ट माझ्याच आकाराचा असल्याने मी लगेच घेऊन टाकला. त्यानंतर शहीद कामठे यांच्यासारखे एक जर्किन आणि आणखी एक टी-शर्ट घेतला. कपडे खरेदी करण्याच्या वेळी भूक लागल्या कारणाने थोडेसे गोड खाऊन घेतले. कपड्यांच्या दुकानांमध्ये बराच वेळ घालवून थोडीफार खरेदी करून आम्ही जेवणासाठी पुन्हा गांधी रस्त्यावरील बाजारपेठेत गेलो. मस्तपैकी जेवण करून पुन्हा हॉटेलवर जाऊन नेहमीप्रमाणे पत्ते, गप्पा, मस्ती, आणि सरते शेवटी झोप ... उद्या ७ वाजता नथूला (भारत - चीन सीमा) ला निघायचे होते. 
संध्याकाळी दीपकबरोबर झालेल्या बोलण्यानुसार उद्या अनुपच आमच्याबरोबर येणार होता. 

पाचव्या दिवसाचा एकूण खर्च: रु. ४८७१ /- फक्त.


- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) (+ ९ १ ९ ९ ६ ० ७ ८ ८ २ ८ ०)


रविवार, २५/०९/२०११

1 टिप्पणी: