रविवार, १ जानेवारी, २०१२

वेडं वेड - संगीत, नाटक, चित्रपटांसाठी ...

आजपर्यंत संगीत, नाटकं, चित्रपटे, भजनं, चालू असलेले सामने (Live Games), सांघिक खेळ, गाण्यांचे कार्यक्रम, खेळणे, एखाद्या कार्यक्रमात सहभागी होणे किंवा आपल्याही समूहाचे / ग्रुपचे काही तरी असावं वगैरे वगैरे साठी खूप मरमर / धडपड केली. पण तरी हि काही गोष्टी राहूनच गेल्या - :( ... उदाहरणच द्यायचे झाले तर भीमसेन जोशी यांचे गाणे समोर बसून काही ऐकायला मिळाले नाही.

माझं बालपण सोलापूर बसस्थानकापासून ६ कि. मी. अंतरावर असणाऱ्या देगाव या गावी / खेडेगावी / ग्रामीण भागामध्ये जिथे शि** म्हंटलं कि झ** म्हंटलं जातं अशा ठिकाणी गेलं. इथे केवळ दूरदर्शनवरील शनिवारी - रविवारी होणारे चित्रपटच पाहणे व्हायचे. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे - ना मुन्ना ना ... जेंव्हा एखादा चित्रपट ५० आठवडे / २५ आठवडे पूर्ण करील तेंव्हाच सहकुटुंब सहपरिवार चित्रपट पाहणे व्हायचे. उदा: हम आप के है कौन, माहेरची साडी ... आता भावनिक स्वभाव असल्याने घरच्यांबरोबर असे चित्रपट बघताना रडून घ्यावे लागे.

मग पुढे एकदा खुष्कीच्या मार्गाने ४ ते ५ कि.मी. अंतर देगावजवळील ओढा, गवताचे वाफे पार करीत प्रेम हा संजय कपूर आणि अमरीश पुरी यांचा चित्रपट पाहिला. परत जाताना पुन्हा चालत. वरून माझ्याबरोबर असणाऱ्यांना त्यांच्या ओळखीचे कोणी पाहू नये म्हणून लपत छपत वेगवेगळ्या मार्गांनी घर गाठले होते. मला कुठून हि गेले तरी काही हरकत नव्हती. बारावीची परीक्षा संपल्यानंतर पैसे साठवून चित्रपट पाहण्यासाठी पुन्हा धडपड. एकदा तर चित्रपट गृहात आसनांचा घोळ झाल्याने मला उभे राहून चित्रपट पाहावा लागला. भांडत बसलो असतो तर चित्रपट पाहता आला नसता. पुढे एकदा रात्री ९ ते १२ वाजताचा चित्रपट पाहून झाल्यावर चित्रपट गृहातून घरी निघतोय तर माझ्या दुचाकीने हवेत पलायन केलेले होते (दुचाकी / सायकल पंक्चर झाली होती). रात्रीच्या वेळेला पंक्चर काढण्याचे किंवा हवा भरण्याचे दुकान काही सापडले नाही. मग काय एकच पर्याय - दांडी यात्रा ५ ते ५.५ कि.मी. ची ... पुढे बारामतीमध्ये शिकत असताना सोलापूर वरून बारामतीला निघालो असताना अचानक नुकताच प्रदर्शित झालेला अजय देवगणचा रामगोपाल वर्माने दिग्दर्शित केलेला कंपनी चित्रपट पाहण्याची हुक्की आली म्हणून बारामतीला जाण्याचे रद्द करून ६ ते ९ चा प्रयोग पाहून घेतला आणि आज्जीकडे देगावी मुक्काम. दुसऱ्या दिवशी बारामती.

बारामतीला असताना हि चित्रपट पाहण्याची लाख इच्छा होती पण यक्ष प्रश्न होता तो पैशांचा ... घरचे हिशोबांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, आणि भागाकार करीत तडजोड करीत पैसे पाठवत होते आणि त्यामध्ये हा असला छंद परवडणारा नाही म्हणून मुग गिळून गप्प बसणे आणि कधीतरी एखादा चित्रपट पाहणे यातच समाधान मानले.

बारावीपर्यंत व्यासपीठावर येणे कधी झालेच नाही. पण स्नेहसंमेलनाच्या वेळी मात्र गोंधळ घालण्यात पटाईत, वाटायचे साला आपण हि एखादा प्रयत्न करून पाहावा पण ते काही माझ्या हातून झाले नाही. जवळपास दरवर्षीच्या स्नेहसंमेलनांमध्ये  माझ्याबरोबर शिकत असलेल्या नीरज गोडबोले चा तबल्याचा कार्यक्रम आणि अपसिंगेकर आडनाव असलेल्या पोरीचे 'चाफा बोलेना, चाफा चालेना ...' हे गाणे ठरलेलं असायचं. यांचे खूप अप्रूप वाटायचे त्यावेळेला. पण त्यावेळेला हे साध्य कसे करायचे हे काही माहित नव्हते आणि जाऊ दे हे आपल्यासाठी नाहीच असे समजून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष्य करायचो मी.

बारामतीत शिकत असताना माझं बोलणं गावठी असल्याने काही पोरींनी मी नाटकामध्ये काम करावे म्हणून मला विनंती केली. पण माझा साफ नकार होता. आजपर्यंत कधी व्यासपीठावर आलो नाही आणि आता वगैरे वगैरे ... मग शेवटी म्हंटलं काय व्हायचं ते होऊ दे आणि त्या नाटकामध्ये काम केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते नाटक अगदी अफलातून झालं आणि त्या नाटकाला पहिलं बक्षिस मिळालं. मग तिथून नाटकांचं वेड लागलं. मग आपल्या समूहाचे / ग्रुपचे हि नाटक, नाच किंवा काही तरी असावं यासाठी धडपड, सगळ्यांना विनंत्या, आपण पण करूयात, आपण करू शकतो वगैरे वगैरे ... शेवटच्या वर्षी आपल्या समूहाचा / ग्रुपचा काहीतरी वेगळा कार्यक्रम असावा म्हणून माझ्या दहावीपर्यंतच्या हरीभाई देवकरण प्रशाला शाळेतील शिक्षकांना भेटणं झालं - पूर्वी शाळेमध्ये झालेल्या पहिला क्रमांक मिळालेल्या एका महाराष्ट्रीयन संस्कृतीवर आधारलेल्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी. हा कार्यक्रम इंग्लिश पुराण या टिपणामध्ये नमूद केलेल्या लिमये बाईंनी बसविला होता. पण त्या शिक्षिका तेव्हा पर्यवेक्षकगृहामध्ये नव्हत्या. मग हिरमुसल्या चेहऱ्याने परत बारामती.

बारामतीत असताना ठरलेले कार्यक्रम करण्यासाठी लागणारी गाणी ध्वनीमुद्रित करण्यासाठी बारामतीत बाजारपेठेत जावे लागे. मग संदीप माळवे बरोबर कधी त्याच्या गाडीवर, कधी रिक्षाने, कधी सायकलवर साधारण ४ ते ५ कि.मी. चा प्रवास. आपल्या पोरांचाही काही तरी कार्यक्रम असावा हा अट्टाहास पूर्ण करण्यासाठी हि धडपड आणि स्वखर्च. हा खर्च कॉलेजला मागायला गेलो तर दोन शिक्षकांच्या मतभेदाची शिक्षा मला - एक म्हणतोय त्या शिक्षकाला भेट आणि दुसरा म्हणतोय पहिल्याला भेट. काय हे? आणि दुसऱ्यांच्या  नाटकाचा रु. ७००० किंवा त्याहून अधिक झालेला खर्च मंजूर ... असे का? इथे झक मारायला मी न्याहारी / नाश्ता न करता चेंगटपणा करीत स्वखर्चाने धडपड करतोय तर मग माझ्याच बाबतीत असे का व्हावे?

लगान चित्रपटामधील चले चलो या गाण्यावर नाच बसवताना काही धोतरांची आवश्यकता होती. मग मी नेहमी जात असलेल्या गणपती मंदिरात ओळख झालेल्या सनातन प्रभात वाल्या काकूंकडे विचारपूस, कॉलेजपासून जवळ असलेल्या गावात ओळखीच्या सलूनवाल्याबरोबर जाऊन धोतरांची चौकशी. मग इकडून एक, तिकडून एक असे करीत करीत एक एक धोतराची जमवाजमव आणि शेवटी ऐनवेळेला दुसऱ्या एका कार्यक्रमातील मंडळींकडून धोतरांची झालेली सोय. बारामतीतील शिक्षण संपल्यानंतर असे कळाले कि मी जेव्हा वसतिगृहावर / हॉस्टेलवर पोरांना रात्रीच्या वेळेला नाटकासाठी वगैरे भेटायला जायचो तर बरेच जण अमरया आला रे म्हणून लपायचे वगैरे वगैरे ... (काय खरे काय खोटे कुणास ठाऊक ...)

बारामतीतील तिसऱ्या वर्षी फुकटची नाटकं / नृत्ये पाहण्यासाठी उपाशीपोटी ५ कि. मी. सायकल प्रवास, कधी जरा जास्तीची भूक लागली असेल किंवा सायकल चालवायचा कंटाळा आला असेल तर रिक्षाने प्रवास. एकदा असाच उपाशी पोटी एक कार्यक्रम पाहायला गेलो होतो बिना सायकलचा. कार्यक्रम पाहून झाल्यावर रात्री १२ वाजता परत राहत्या खोलीवर येणार कसा? ५ रु.त सोडेल अशी रिक्षा मिळतेय का म्हणून वाट पाहत होतो. पण तशी रिक्षा काही मिळत नव्हती. मग थोड्या वेळाने विद्या प्रतिष्ठान कनिष्ठ महाविद्यालयात काम करीत असलेल्या एका शिक्षिकेच्या पतीने कुठे जायचे आहे म्हणून विचारले आणि MIDC चौक म्हंटल्यावर ते मी सोडतो म्हणाले. मग त्यांच्या M 80 वर बसून घरी निघालो. गाडीवर जात असताना काय करतो, कुठे राहतो, मी इथे काम करतो, माझी बायको विद्या प्रतिष्ठान मध्ये इथे इथे आहे वगैरे वगैरे विचारपूस झाल्यानंतर साहेब मागे मागे सरकायला लागले आणि म्हणायला लागले कि त्या कार्यक्रमातील ती ती पोरगी मस्त होती ना वगैरे वगैरे आणि मला चिटकायला सुरुवात केली. मी तो जसजसा मागे सरकतोय तसतसा M 80 च्या कॅरेजकडे सरकत होतो आणि कधी एकदा City Inn हॉटेल येतेय याची वाट पाहत होतो. City Inn हॉटेल आल्यावर मला इथेच उतरायचे आहे म्हणून तिथेच उतरलो आणि पुढे MIDC चौकात जाणे टाळले. उतरल्यावर मनामध्ये संताप व्यक्त करीत मनामध्येच शिव्या देत त्याची आई बहिण काढत राहत्या खोलीवर गेलो. हा असा प्रकार घडल्याने यापुढची नाटके मग सायकल प्रवास करूनच पाहिली - कधी उपाशी पोटी तर कधी अर्धपोटी. आतापर्यंत ७० % नाटके हि अशीच उपाशी पोटी किंवा अर्धपोटी पाहिली.

अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षी जरनलचे सबमिशन सोडून लता मंगेशकर, सुरेश वाडकर, सोनू निगम, उषा मंगेशकर यांचा गाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी कशाची हि पर्वा न करता, चौकशी न करता पुणे दौरा. कार्यक्रम निगडीला होता. कार्यक्रम संपल्यावर जाणार कुठे? निगडी परिसरातील मला काहीच माहित नव्हते. किमानपक्षी स्वारगेट बसस्थानकापर्यंत कसे पोहचायचे, तिथे जाण्यासाठी या वेळेला बस आहे कि नाही, बस कुठून मिळते कशाचाही थांगपत्ता नाही. पोटात भुका तर लागलेल्या. मग सहाध्यायी सागर भोसले ला फोन करावा कि नको, करावा कि नको, होय नाही, होय नाही म्हणत शेवटी त्याला फोन केला. त्याच्या घरी गेल्यावर काकूंनी गरम गरम पूर्ण जेवण केलं माझ्यासाठी. याबद्दल त्यांचे आभार कसे मानावेत?

पुढे २००६ साली मला कळले कि पुण्यामध्ये दरवर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सवाई गंधर्व नावाचा शास्त्रीय संगीताचा महोस्तव होतो म्हणून ... आणि २००६ पासून मी न चुकता या महोस्तवातील श्रोतृवर्गामध्ये सामील होतोय. २००६ साली अगदी एखाद्या भुकेल्या माणसासारखा व्यासपीठापासून ६० - ७० फुटांवर बसून ऑफिसला दांडी मारून, खोटी कारणे सांगून शास्त्रीय संगीत ऐकून घेतलं. पण सवाई गंधर्व महोस्तवात भीमसेन जोशींची वयोमानामुळे तब्येत ठीक नसल्याने त्यांचे गाणे काही ऐकायला मिळाले नाही. ते अधून मधून महोस्तवाच्या ठिकाणी यायचे, ते आले कि सगळा श्रोतृवर्ग चिडीचूप, सगळ्यांचे लक्ष्य त्यांच्याकडेच, मग कला सदर करणारी व्यक्ती कलेचे सादरीकरण थांबवून भीमसेन जोशींचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे जायची वगैरे वगैरे ... आणि सगळं वातावरण काही वेळासाठी कसं भावनिक ...

पुढे पुढे सवाई गंधर्व महोस्तवासाठी पंच्याहत्तरी पार केलेल्या तरकटी माणसाबरोबर राहणं झालं. याच तरकटी माणसाला ऑफिस सोडून सवाई गंधर्व महोस्तवात सोडणं झालं. नंतर ऑफिसमध्ये काम करून मग स्वत: सवाई गंधर्वच्या श्रोतृवर्गात सामील होणे झालं. ऑफिस करीत करीत ऑफिसमध्ये व्यवस्थापक / मॅनेजर ला न सांगता ऑफिसमधून पळून जाऊन एका दिवशी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोस्तवातील  ३ - ३ चित्रपट पाहणे झालं. सलग ५ दिवस अर्धपोटी मराठी नाटकं / चित्रपट पाहणे झालं.

पुढे २४ जानेवारी २०११ ला माझ्या जुन्या संस्थेतील / कंपनीतील व्यवस्थापक / मॅनेजर यांचा फोन आला कि भीमसेन जोशी निवर्तले. खूप खूप खूप वाईट वाटलं. त्याच दिवशी मला एका लग्नाला जायचे होते आणि नंतर ऑफिसला. काय कुणास ठाऊक मी भीमसेन जोशी यांच्या अंत्यविधी वेळी गेलो असतो कि नाही. पण अगदी मनापासून सांगायचे झाले तर कदाचित गेलो हि असतो. पण का कुणास ठाऊक कि लोक काहीही माहित नसताना, समोरच्याचा स्वभाव व्यवस्थित माहित नसताना काहीही का बोलतात? त्यांच्या बोलण्याचा विषय होता - लग्न ... जे बोललं जात होतं ते अत्यंत चुकीच होतं, मला न पटण्यासारख होतं, आणि विरोधाभासी होतं म्हणून मी न जेवता लग्न आटोपत घेत ऑफिसला गेलो. ऑफिसला गेल्यावर माझी मॅनेजर म्हणाली कि, मला वाटले कि तू आज येणार नाही कारण ... (ते आम्हा दोघांना समजण्यासारखं एक मूक संभाषण होतं ... ) ... मग वाटलं कि चुकलच माझं ... मी भीमसेन जोशींच्या अंत्यविधीसाठी जायला हवं होतं ...


- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) (+ ४ १ ७ ६ ५ १ ० ६ ८ ३ ४)
शनिवार, ०१/०१/२०१२

३ टिप्पण्या:

  1. सतीश - धन्यवाद!

    विक्रम - धन्यवाद! अरे बरीच नाटके शनिवारी / रविवारी नसतात आणि शनिवार रविवार मी कुठे तरी उंडारायला गेलेलो असतो त्यामुळे ती नाटके सोमवार ते शुक्रवार दरम्यानच पहावी लागतात. ऑफिसचे काम उरकून जेवायला गेलो तर नाटक राहून जाते त्यामुळे आपलं २-३ वडापाव खायचे आणि नाटक पाहायचे. कधी नाटक पाहायला बहिण येणार असेल तर माझ्यासाठी डबा घेऊन येते. मग नाटक संपल्यावर घरी गेल्यावर जेवायचे - :) ...

    उत्तर द्याहटवा