गुरुवार, ४ मार्च, २०१०

गड्डा

तुला गड्डा उठला ...
(यक्ष प्रश्न ... शिवी कि अजून काही नवीन? ... आता ह्यो काय शहाणपण बरळणार? ... )

(खालील भाग जैत रे जैत या चित्रपटातील ना.धो.महानोर यांच्या हा ढोलिया कविता / गाण्याच्या ५४ व्या सेकंदापासूनच्या  चालीमध्ये वाचणे)

हा कसला गड्डा?
हा गड्डा म्हंजे शिवी नाय ... सिद्धेश्वराची यात्रा हाय ... सिद्धेश्वराची यात्रा ...
सिद्धेश्वराची यात्रा  ??? ...
अरं मी काय सांगतो ऐका ... अरं थांबा थांबा ...
ऐका ऐका ... आरडू नका ...
अरं मी काय सांगतो ऐकता का आता? ... आ ...
ऐका ऐका आरडू नका ... अरं गप्प बसा कि
आपल्या सोलापूरला सिद्धेश्वर होवा कि नही ...
अरं बोला कि आ$ ...
आपल्या सोलापूरला सिद्धेश्वर होवा कि नही ...
हा होवा$ होवा ...
आपल्या सोलापूरला सिद्धेश्वर होवा कि नही ...
हा होवा$ होवा ...

म्हसरासाठी$ बाजार ... माणसासाठी$ बाजार ...
म्हसरासाठी$ ... बाजार ... माणसासाठी$ ... बाजार ... 
जत्रंमागं$$ माणसं ...   जत्रंमागं$$ माणसं ... 

अन् अमरया मागं  ...? ... शेरदिल$ ... शेरदिल ...
अन् अमरया मागं  ...? ... शेरदिल$ ... शेरदिल ...
हा सर्व खरा पण, सोलापूरला नेणारा त्यो दुसरा काय कामाचं रं?
अरं म्हंजे व्हईल तर अमरया आणि भरया बघून घेतील कि ... आ ...
शेरदिल चा त्यात संबंध नई ...
अरं जत्रा हाय सिद्धेश्वराची ... अन् तुम्ही येणार का बसणार ... आ ...
येणार ... येणार ...
आम्ही येणार ... हो येणार ... येणार
आम्ही येणार हो येणार ... येणार
आम्ही येणार हो येणार ... येणार 


तर अशी होती ही गड्ड्याची पूर्वतयारी.महानोर साहेब, आज तुम्ही मला तुमच्या कवितेच्या रुपाने जसे उपयोगी पडलात त्याचप्रमाणे मीही एकेकाळी बराच काळ शेरदिल ला चेष्टेसाठी उपयोगी पडलो होतो. निमित्त काय तर - गड्डा ...
कसा? ऐका तर मग ...

मार्गशीष महिन्यातील पूजेच्या कथेतील आटपाट नगराप्रमाणे VPCOE नावाचे नगर/कॉलेज होते. तिथे भद्रशवा राजाप्रमाणे एक टकला डायरेक्टर/मास्तर होता. तो उठलं कि सुटलं "तुरंम् ... " आणि "जगताप, याचा TC दे रे ..." असे म्हणत हिंडायचा (नोटेवरील टकल्याने भारताला गंडवलं आणि या टाकल्याने आम्हाला). कथेतील राजाच्या ७ मुलांप्रमाणे VPCOE मध्ये शेरदिल नावाचा २५-३० जणांचा ग्रुप होता. पण कथेतील राजाच्या मुलीप्रमाणे या ग्रुपमध्ये मुलगी नव्हती. लगानच्या नाचापुरती एकीची तात्पुरती सोय केली होती. काही जणांनी स्वत:हून आणण्याचा प्रयत्नही केला होता पण त्यांच्या पदरी निराशाच पडली होती. ग्रुपमधील काही जण काही कारणास्तव स्वत:ला बौद्धिक विसावा आणि घरच्यांना आर्थिक विसावा देण्यासाठी आम्हाला सोडून वर्षभरासाठी घरी गेले होते. उरलेल्यांपैकी काहीजण गड्ड्याची योजना आखली जात होती त्यावेळी संपर्कात नव्हते.यातून उरले १५ सवंगडी.

बहुतेक करून दरवर्षी १४ जानेवारीला संक्रांत असते. शनिवार, १२ जानेवारी २००२ ला खानावळीमध्ये जेवत असताना भरत गिड्डेने सर्वांसमोर गड्ड्याला जाण्याचा प्रस्ताव मांडला आणि सर्वांनी तो लगेच मंजूरही केला. या प्रस्तावाच्यावेळी माझे रूम पार्टनर्स घरी गेलेले होते. त्यांच्याशी संपर्क साधून लगेच त्यांना प्रस्तावाबद्दल कळवण्यात आले. प्रस्ताव मंजूर होतेसमयी बारामती कार्यक्षेत्रातील कार्यकर्ते घरी गेलेले असल्याने त्यांना प्रस्तावाबद्दल काही कळू शकले नाही आणि आम्हीही त्यांच्याशी संपर्क साधू शकलो नाही. त्यामुळे ते गड्ड्याला येऊ शकले नाहीत. खानावळीमध्ये एवढेच ठरले होते कि १४ जानेवारीला सोलापूरला जायचे. कसे जायचे, काय करायचे, कोणत्या मार्गे जायचे हे काहीच ठरले नव्हते.

या प्रस्तावाच्या मंजुरीनंतर रुमवर गेल्यावर माझ्या मनात खालील प्रश्न घोळत होते.
- मोडक्या साहेबांच्या प्रात:विधीसमयी माझ्या घरातील उदबत्त्या पुरतील ना? (का ते विचारू नका ... )
- नेमके मोडके साहेब प्रात:विधीला गेलेले असतानाच माझ्या घरातील पाणी संपले तर ...? पुन्हा एकदा हॉस्टेलमधील किस्स्याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना?
- भुरे साहेब प्रात:विधीवरून लवकर येतील ना ... त्यावेळी इतरांची तारांबळ होणार नाही ना?
- एखादे साहेब शाही स्नानाचा हट्ट धरून इतरांची अडचण तर करणार नाहीत ना?
- दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जसे हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब फेकले तसे घरी गेल्यावर अथवा प्रवासामध्ये कुणी दुषित वायूंचे सूरसुरी बॉम्बस्फोट करणार नाही ना?
(मला माहित आहे त्याने ३ Idiot चित्रपटातील भाषणातील खालील वाक्यातील फक्त शेवटचाच भाग लक्षात ठेवला असणार आहे.
"उत्थमम दद्धदाद पादम, मध्यम पादम थुचूक थुचूक
घनिष्टम थुडथुडीय पादम, सूरसुरी$ प्राण घटकम ..."      जे आहे आणि झेपेल तेच लक्षात ठेवणार ना - :)

अहो तुम्हाला काय काय म्हणून सांगू ... अहो केवळ अशा कारणांसाठी आम्ही रूम टॉयलेट जवळ घेतली होती ... म्हणजे कसं सकाळी उठलं रे उठलं कि डायरेक्ट टॉयलेट आणि बाथरूम ... आणि समजा अधीमधी काही प्रोब्लेम झालाच तरी पण लगेच जाता यावे म्हणून सर्व व्यवस्था केली होती ...
)

- आंघोळीसाठी पाण्याची अडचण येणार नाही ना?
- रिक्षावाले घरी येताना माज तर करणार नाहीत ना?
- आमच्या घराजवळच्या भागातील परदेशी बाईला बघून कुणी पुणेरी ABCD  प्रकरण शोधण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना?
- घराजवळील रशियन कुत्र्याबरोबर खेळण्याचा कुणी प्रयत्न तर करणार नाही ना? हट्ट तर धरणार नाही ना?
- एका साहेबांना सर्वसामान्य स्त्रीलिंग व्यर्ज होते. त्यांच्यासाठीची तीन लिंग म्हणजे पुल्लिंग, डार्लिंग आणि नपूसक लिंग. मग परदेशी बाई आणि डार्लिंग असं काही होणार नाही ना?
- परदेशी बाईला बघून कुणी दिल तो पागल है स्टाइल शिट्टी तर वाजवणार नाही ना?

वरील प्रश्न माझा छळ मांडत असतानाच अचानक लहानपणीच्या गड्डयाच्या आठवणी मनामध्ये तरळून गेल्या. लहानपणी माझ्या आजोळाच्या गल्लीतले मित्र मिळून आम्ही गड्डयावर संध्याकाळच्या वेळेला चक्कर मारायला जायचो. गड्डयाच्या वाटेवर गर्दी असायची. प्रत्येक सामानाच्या गाडीभोवती गर्दी असायची. सर्व लोकांनी प्रत्येक गाडीला सामान खरेदी करण्यासाठी घेरलेले असायचे. तर मग आम्ही या गर्दीतून हळूच हात घालून दोन बोरं उचल, दोन रेवड्या उचल असे प्रकार करायचो. असे करण्यामागे तर्क/LOGIC काय तर - जरी कुणी पकडलं तरी आपण लहान आहोत म्हणून सोडून देतील. बोरं/रेवड्या घेतल्या रे घेतल्या कि मग आम्ही त्या वाटून खायचो. मग गड्ड्यातील पाळणे, गाड्या, मौत का कुवा जवळ जाऊन नुसतेच उभे रहायचो पैसे नसल्यामुळे.

तसे आमच्या गायकवाड कुटुंबाचे गड्ड्यावर एखादा दिवस सहकुटुंब सहपरिवार जाऊन येण्याचे ठरलेले असायचे. मग त्यामध्ये ठरलेले कि पाळण्यात बसायचे, मौत का कुवा बघायचा, वाकड्या तिकड्या आरशांमध्ये बघून यायचे, गाढवाचा खेळ बघून यायचे. महिला विभागाचे घरगुती खरेदी करण्याचे देखील ठरलेले असायचे. मग निघताना बटाटा वडे खायचे (त्यावेळी वडापाव असा काही प्रकार अस्तित्वात आहे हे आम्हाला माहित नव्हते. अभियांत्रिकी/इंजीनियरिंग ला आल्यावर मला वडापाव हा प्रकार कळाला.).

त्यादिवशी प्रश्नांनी मांडलेला छळ आणि लहानपणीच्या गड्ड्याच्या आठवणींमध्ये झोपेने मला आपल्या कुशीत कधी बोलावून घेतले ते कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी सोलापूरला कसे जायचे हे ठरवले. आमच्यापैकी एकाला एस्.टी. मध्ये बसल्यानंतर उलट्या होतात म्हणून आगगाडी/ट्रेन ने जाण्याचे ठरवले. घरी जेवणाच्या तयारीचे निरोप धाडले - मांसाहारामध्ये मटण आणि शाकाहारामध्ये श्रीखंड. मोडक्या साहेबांना आणि छोटे सरकारांना देखील निरोप धाडले. सोलापूरला आणखी एक निरोप धाडला कि छोटे सरकार आल्यावर त्यांची व्यवस्थित काळजी घ्या. जर त्यांना करमत नसेल तर त्यांना पार्क फिरवून आणा आणि ABCD दाखवा.

सोमवार, १४ जानेवारी २००२
मध्यरात्री ०५:०० - ०५:१५ ची वेळ. दौडा दौडा भागा भागासा ... दौडा दौडा भागा भागासा ...ये पशा, ये भरया, पद्या, सत्या, ये सच्या, अनप्या, अतल्या ... ऊठा बे$$$ ... ऊठला का बे$$$ ... अबे ऊठा बे$$$ ... ऊठला का बे$$$ ... निघताना परत टकलूने पकडले तर लोचे व्हायचे ... अबे ऊठा बे$$$ ... अशा पद्धतीने अमर गायकवाड सिंहगर्जना करीत होते. त्यावेळी आमचे निर्वांगीचे सर असते आणि सिंहगर्जनेची कामगिरी त्यांच्यावर सोपवली असती तर त्यांनी १३ जणांना उठवण्याऐवजी आख्या हॉस्टेललाच उठवले असते.

आमच्या पार्टनर साहेबांना वेगळ्या पद्धतीने उठवावे लागते हो. पार्टनर ... पार्टनर ... दिवान स्वप्नातून बाहेर येता का आता? ... सकाळ झालेली आहे आणि सगळ्यांचे आवरून होत आलेले आहे ... पार्टनर, आपण उठता का आता? आणि हो सकाळची कामं तेवढी लवकर उरका म्हणजे झालं ...

सगळ्यांचे आवरून झाल्यावर टकलूने पकडू नये म्हणून आम्ही चौघाचौघांचे ३ ग्रुप करून कॉलेजच्या परिसरातून बाहेर पडलो. रिक्षाने बारामती रेल्वे स्टेशन गाठले. तिथून दौंड. दौंडला साधारण ०८:१५ ला पोहचलो. दौंडला पोहचल्यावर पाहतो तर काय मोडके साहेब "Don't divert your mind" हे वाक्य स्वत:ला बजावत बारामतीच्या ट्रेनच्या वाटेकडे टक लावून बघत उभे होते. बारामतीची ट्रेन आणि आम्हाला पाहिल्यानंतरच साहेबांनी त्यांचं Mind Divert केलं दुसऱ्या ट्रेनकडे. माझा त्यांना पहिला प्रश्न - सकाळचं सगळं OK ना? मग स्टेशनवर सोलापूरच्या गाड्यांचे वेळापत्रक पाहीले. १०:०० - १०:१५ च्या सोलापूरच्या पॅसेंजर गाडीची तिकिटे काढली आणि नाश्ता करून घेतला.

दौंडला असताना नाश्ता करताना सगळ्यांचा उस्ताह दांडगा होता. नाश्ता झाल्यानंतर सगळेजण ट्रेनची वाट पाहत टाइमपास करीत बसलो. ट्रेन दौंडला यायला उशीर, परत निघायलापण उशीर. इथूनच प्रवासाला नाट लागला गेला. पुढे मग वाटेत प्रत्येक सिग्नलला गाडी थांबत होती. आम्ही भिगवणला १२:३० - ०१:०० च्या दरम्यान पोहचलो. जे भिगवण कॉलेजपासून २१ किलोमीटर आहे तिथे पोचायला आम्हाला साधारण ०१:०० वाजला होता. पुढे तर गाडी जवळजवळ प्रत्येक स्टेशनला थांबत होती. इतरांच्या भाषेत सांगायचेच झाले तर वाटेत म्हैस अथवा कुत्रा आला तरी गाडी थांबायची.

सर्वांना भुका लागल्या होत्या. जे जवळपास खाण्यासारखे होते तेदेखील संपले होते. मग स्टेशनवरून थोडेफार खायला घेणे वगैरे चालू होते. अशा या कंटाळवाण्या प्रवासात आम्ही कटूळ/कटाळ/कंटाळा येईपर्यंत पत्ते खेळत होतो. पत्ते खेळून पण कंटाळा येऊ लागला म्हणून काही जण प्रत्येक स्टेशनवर गाडीतून उतरून गाडी निघाल्यावर पळत पळत गाडीत चढत होते. मी नको नको म्हणत होतो पण हे काही ऐकत नव्हते. मी मनातल्या मनात म्हणत होतो - "अरे छाम्यांनो, मी याच्यापेक्षा भारी डोंबारीचे  खेळ आणि थ्रीलस्/Thrills करू शकतो. पण उगाच कशाला या कंटाळवाण्या प्रवासात नवीन काही तरी आफत आणताय, शांत बसा ना ...". मग जसजसे सोलापूर जवळ येईल तसतसे मी आमच्या देगावबद्दल थोडेफार पोरांना सांगत होतो. वाटेत देगाव कुठे आहे ते दाखवले. आमचे शेत, गावची पाण्याची टाकी, आम्ही क्रिकेट खेळायला कुठे जायचो वगैरे वगैरे.अशा पद्धतीने आम्ही वेळ घालवण्याचा प्रयत्न करीत होतो.

जसे जसे पोहचण्याचे ठिकाण जवळ जवळ येते
तसे आपण ते येण्याची जास्त वाट पाहु लागतो.
जसा काय अंतर कमी होते
पण वेळ वाढतो.
हुरहुर वाढते, प्रवास संपण्याची.
मला या असल्या प्रवासातून बाहेर पडायचे आहे ...

आणि एकदाचे आम्ही साधारण ०६:३० - ०६:४५ ला सोलापूरला पोहचलो. तिथून रिक्षाने घरी. घरी गेल्यावर सगळे जण आवरत असताना मी सर्व तयारी व्यवस्थित झाली आहे का पाहण्यासाठी म्हणून स्वयंपाक घरात जाऊन पाहतो तो तर काय - ढिगानं चपात्या, भगुन/घमेल भरून मटन, आणि श्रीखंड तयार होते. मग मी घरच्यांना सगळ्यांची ओळख करून दिली. हा शाहरुख खान, हा सलमान खान, हा सचिन तेंडूलकर, हा बम्मन वगैरे वगैरे. मराठी चित्रपटांमध्ये लक्ष्या आणि त्याची मित्रमंडळी जेवताना जेवण कसे लगेच संपते ना अगदी त्याच पद्धतीने आम्ही सर्वांनी मिळून जेवणाचा फडशा पाडला (मी सोडून बर का - :) ... कारण मी जेवायला वाडत होतो). त्यावेळी मी मटन खाण्याचा कंटाळा आला म्हणून मटन खाणे बंद केले होते पण एकाने मला जबरदस्तीने मटन खायला सांगितले. जर तू मटन खाल्ले नाहीस तर जेवणार नाही. आता उगाच इतरांना त्रास द्यायला नको म्हणून मी मटणाचा एक पीस खाल्ला (तसे पाहता बऱ्याचवेळा मी कुणाचेही ऐकत नाही काही झाले तरी). जेवतानाची आणखी एक गम्मत म्हणजे मी जेंव्हा जेंव्हा मटन घेऊन येई तेंव्हा तेंव्हा जे समोर बसले आहेत तेच मटन संपवून टाकत आणि पुढच्यांना फक्त रस्साच उरे.
 
मी जेंव्हा सगळ्यांची जेवणं झाल्यावर जेवायला बसलो त्यावेळी सोलापूरकरांनी  इतरांच्या मनात काय काय भरवले होते कोण जाणे? लई गर्दी असते, चपला काढून जावा, पाय ठेवायला जागा नसते, गाडी नेली कि लवकर निघत नाही वगैरे वगैरे ... प्रत्यक्षात तिथे गेलो तर या पोरांना तसे काही जाणवले नाही कारण या पोरांपैकी काहीजण पुणेकर होते आणि काही जणांना पुणेरी राहणीमानाची सवय होती. राहणीमान म्हणण्यापेक्षा  उगाच गर्दी करणे हा प्रकार माहित होता. आता ह्यांच्या पुण्यात दर चतुर्थीला आणि गणपतीला ढिगानं गर्दी असायची/असते त्यामुळे ह्यांना सोलापूरची गर्दी कमीच वाटणार. तसे पाहता ती गर्दी सोलापूरच्या मानाने जास्तीच होती. या सगळ्या प्रकारचा मला काहीच थांगपत्ता नव्हता. हा सर्व प्रकार मला दुसऱ्या दिवशी सोलापुरवरून निघताना कळाला.
माझे जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण गड्ड्यावर आलो. आम्ही गेलो त्यावेळी तिथे दारूकाम दाखवले जात होते. तसे पाहता या दारूकामाला खरी शोभा दिली ती तिथल्या निवेदकाने. ह्याची बोलण्याची/निवेदन करण्याची shtyle एकदमच झक्कास होती. तुम्ही काहीही म्हणा पण त्याच्यामुळे आम्हा प्रवासामुळे थकलेल्यांना थोडीफार मजा आली. पण बारामतीला परत आल्यावर मला हे इतरांचे उपद्व्याप मात्र भयंकर पद्धतीने भोगावे लागले.
निवेदकाचे बोल -
१. चकमक आहे , चमचम  आहे , हरकत नाही ...
२. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे  यल्लाकडे ...
(वात्रट अमर - आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे ... ये नागडे ... पण उगाच नवीन विषय नको म्हणून मी मुग गिळून गप्प बसलो.)
 दारूकाम पाहून झाल्यावर आमचे दोन ग्रुप तयार झाले. काही जण पाळण्यात बसले, काही जण फिरून आले. दुसऱ्या ग्रुपमध्ये टपलीमार वगैरे झाली. आमच्या ग्रुपमधील छोटे सरकारांना भूकंप कसा असतो हे अनुभवायचे होते. हे भूकंप प्रकरण फसवे आहे हे सांगेपर्यंत साहेबांनी तिकिटे पण काढली होती. आत जातो तर काय - एक audio - video presentation आणि एका फळीवर सगळ्यांना अंधारात उभे करून धडाडणारा आवाज करून फळी हलवली होती. आता असलं फिलिंग/feeling तर बैलगाडीत बसल्यावर पण येतं ना ... पण काय करणार छोटे सरकारांना कोण आवरणार ...
गड्डा फिरून झाल्यावर आम्ही घरी आलो. घरी आल्यावर देखील मला काय काय घडून गेले आहे हे ठाऊक नव्हते. मग थकलेल्या अवस्थेत निद्रासुख. दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या आंघोळी, नाश्ता आणि तेही वरती नमूद केलेल्या प्रोब्लेम्सशिवाय ... लढ बाप्पू ... आता सोलापूरची लढाई संपत आली होती पण मला त्यावेळी हे माहित नव्हते कि बारामतीला पोहचल्यावर मला बऱ्याच वेळा तोफेवर डागण्यात येणार आहे ते ...
मग तिथून भरयाच्या  घरी मोडनिंबला. तिथे कंटाळा/कटाळ/कटूळ येईपर्यंत जेवण. तिथून घनश्यामच्या घरी इंदापूरला थंडपेय प्राशन. इंदापूरला जाताना बहुतेक आम्ही अपघात होता होता वाचलो होतो. इंदापूर वरून back to pavillion - बारामती.
दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला जाताना वाटेत जगताप मास्तर भेटले. मी दिसल्या दिसल्या - मग गायकवाड, कशी झाली ट्रीप - गड्डा? सगळीकडं लक्ष असतं आमचं ...  हुश्शा !!!
 || इति गड्डा पुराण संपूर्णंम् ||

९ टिप्पण्या:

  1. Mast re Amar.... shevati jara urakale aahes pan baaki mast vatale vachatana. Suruwatila tar SIXER ne ch opening kelis. Keep it up.
    Pan tari tula gaddyavarun pidayach sodat nasato :-)

    उत्तर द्याहटवा
  2. Amarya pan mala bolawala navhata ja jatrela...gaddyala...lakshat thev....mast lihila ahes keep it up asech lihit raha ani mail ne update karat raha...:D

    उत्तर द्याहटवा
  3. च्यायला ! [ही शिवी नाही... अतिहर्षोधित शब्द?] लय भारी राव! एकंदरीत तुझा ब्लॉग म्हंजे चांगभलं आहे... भारी लिहतोयस.. लिहित रहा!

    उत्तर द्याहटवा
  4. च्यायला ! [ही शिवी नाही... अतिहर्षोधित शब्द?] लय भारी राव! एकंदरीत तुझा ब्लॉग म्हंजे चांगभलं आहे... भारी लिहतोयस.. लिहित रहा!

    उत्तर द्याहटवा
  5. Thanks for your comments.

    Mi itake divas blog access kela navhata tyamule mi reply karu shakalo nahi, so sorry for delayed response. Are mi 6 mahinyanni parat blog lihatoy tyamule aata reply karatoy.

    उत्तर द्याहटवा
  6. Tu bharatat ye mag tula gaddyavar ghevun jato - :)

    उत्तर द्याहटवा
  7. Thanks Pradeep!

    Aata gaddyavarun chidavalele kahi vatat nahi mala. Savay zaliy aata - :)

    उत्तर द्याहटवा