पण हे झालं पोरींच्या बाबतीत आणि गाणं तयार केलेल्या वेळेपर्यंत. पण सद्य परिस्थितीनुसार मुलांच्या बाबतीत मला असे वाटते कि - २५ वं वरीस धोक्याच ...
काही दिवसांपूर्वी म्हणजे शिवाजी महाराजांच्या ज्या तीन जयंत्या साजऱ्या केल्या जातात ना त्यातील महाराष्ट्र शासनाने ज्या जयंतीला सुट्टी जाहीर केली आहे ना त्या दरम्यान मला हे प्रकर्षाने जाणवून आले. तर मागच्या फेब्रुवारीमध्ये मी आमच्या मामाच्या मुलाच्या साखरपुड्याच्या (Sugarbox) कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळी मी कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सामानाची ने-आण करण्याच्या कामात व्यस्त होतो आणि नवीन कपडे खराब होऊ नयेत म्हणून मी साधारण कपडे परिधान केलेले होते. कार्यक्रमाची वेळ जवळ आली होती म्हणून आमच्या मासाहेबांनी मंगल कार्यालयाकडे प्रस्थान केलेले होते. तिथे पोहोचताच इतर पन्नाशी गाठलेल्या बायामंडळींना पाहून आमच्या मासाहेबांनी एका नातेवाईकाकडून आम्हांस संदेश धाडला कि, अमरला व्यवस्थित कपडे घालून मंगल कार्यालयात पाठवून दे. ... च्या मारी माझ्या उभ्या आयुष्यात आमच्या मासाहेब कधी आमच्या पेहरावाबद्दल काही म्हणाल्या नाहीत आणि आज अचानक असे ... मी तर एकदम अचंबितच होऊन गेलो. आणि मला तेंव्हाच जाणवून आले कि मलाही आता लवकरात लवकर भोहल्यावर उभे करण्याची तयारी चालू झाली आहे (तेही गुपचूपपणे). मग काय मी हाती घेतलेले काम संपवून योग्य तो पेहराव करून मंगल कार्यालयाकडे प्रस्थान केले.
मी मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी पोहचतो न पोहचतो तोपर्यंत एक लांबचे नातेवाईक फुलटू सोलापूर इ-ष्टाईल (e -shtyle) मध्ये -
('ते' म्हणजे नपुसक धरू नका हो. हे इंग्लिश नाहीये. मराठीमध्ये आदरयुक्त बोलताना 'ते' वापरतात. नाही, तसे नाही, काही लोकांना सांगावे लागते )
ते - काय अमर$$? ओळखल्ल्लास कि नाही$$$?
मी - (मी हि सभ्यपणाचा आव आणून आणि त्यांची चाल ओळखून मला काही कळलेच नाही या आविर्भावात) नमस्कार! तुम्हाला विसरून कसे चालेल?
ते - मग कसं चालू आहे$? काय चालू आहे$?
मी - सगळ काही व्यवस्थित चालू आहे.
ते - आता त्यांनी मुळ मुद्द्याला अप्रत्यक्षपणे हात घातला . त्यांच्या ओळखीच्यांना म्हणाले, हे अमर गायकवाड. पुण्याला असतात आय.टी. कंपनीत वगैरे वगैरे.
मी - नमस्कार!
(काही सेकंद शांतता ...)
मी - काका, येऊ का मी? थोडी कामे बाकी आहेत ...
ते - चालेल ...
च्या मारी, ह्यो साला पूर्वी मला "अरे जा रे अमर, मावशीला बोलवून आण, ह्याला बोलवून आण, त्याला बोलवून आण, तंबाखू आण, ह्याला सोड, त्याला सोडून ये" असली कामे सांगायचा आणि आज अचानक इतक्या आदबीने ... ह्योच नातेवाईक माझ्या बहिणीसाठी स्थळ शोधण्याच्या वेळेला कधी अधेमध्ये नव्हता आणि आज अचानक इतक्या आदबीने ... कारण काय तर आम्ही आमची पंचविशी गाठली होती ...
मंगल कार्यालयात प्रवेश केला आणि मावशीच्या मुलींकडे गप्पा मारण्यासाठी गेलो. मग तिथे गेल्यावर मावशीच्या मोठ्या मुलीला पूर्वी आलेल्या एका स्थळाबद्दल आम्ही बोलत होतो. आणि स्थळ म्हणून आलेला तो मुलगा साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आला होता. मावशीच्या मुलीने त्याला समोरासमोर पहिले नव्हते. त्यामुळे आम्ही तिला चिडवत होतो. आणि तिला त्या मुलाला पहायचे देखील होते. आमची अशी कुजबुज चालू असतानाच एका नातेवाईकाने (क्षमा करा ... माझं जरा चुकलंच ... तऱ्हेवाईक म्हणायला हवे होते) आम्हाला पहिले आणि आमची काय कुजबुज चालू आहे ते ओळखले. मग त्यांनी मला बोलवून घेतले. तिथे गेल्यावर मला तो त्यांचा तसला ठरलेला हास्यफवारा पाहावा लागला. काही सेकंदांनी ते मला म्हणाले, आता तिकडे (स्थळ म्हणून येऊन गेलेल्या मुलाकडे) बघून काही उपयोग नाही. ते साहेब आता Engaged आहेत. जेंव्हा बघायचे होते तेंव्हा पाहिले नाही, आता काय उपयोग? मग नंतर याच पासष्टी गाठलेल्या आणि आणखी एका पंच्याहत्तरी गाठलेल्या तऱ्हेवाईकची "शास्त्रीय संगीत" विषयावरून जुगलबंदी सुरु झाली आणि मी तिथून काढता पाय घेतला.
... मग हे असलं सगळं पचवून मी व्यासपीठावर गेलो तर काय पन्नाशी/साठी गाठलेल्या सगळ्या नात्यातल्या बायका माझ्याकडे आणि माझ्या मावस भावाकडे बघत होत्या. या सर्व बायकांमध्ये आमच्या मासाहेब पण होत्या. मग आमच्या मासाहेबांनी आम्हा दोघांना खाली बोलवून घेतले आणि ओळखी करून देण्यास सुरुवात केली. ही मावशी/काकी/काकू/मामी ... मग प्रत्येकजण म्हणत होते कि, ओळखलंस का रे अमर?
मी - होय.
त्या - ओळखलंस कि रे मावशी/काकी/काकू/मामी ला ... लहान होतास तेंव्हा आला होतास आमच्या घरी ... लई भांडायचास वगैरे वगैरे ... त्यांच्यापैकी एकजण म्हणून पण गेली कि - जावईबापू (मी) मनावर घेतले तर सगळ आहे ...
हे असे आहे बघा. पोरानं पंचविशी गाठली कि या पन्नाशी गाठलेल्यांना जोड्या लावण्याशिवाय काही कामे उरत नाहीत. त्यात त्यांचीही काही चूक नाही म्हणा ... चलता है ... ह्या सगळ्यात मजा आहे.
पण राहून राहून इतकच वाटतं कि, ह्या पन्नाशीच्या ऐवजी विशी-पंचविशीच्या पोरींनी एकाचवेळी असे पाहिले असते तर - अहो आई शपथ सांगतो तेवढ्या सगळ्या पोरींना सांभाळायची हिम्मत दाखवली असती ... पण उभी २५/२७ वर्षे पोरींना चिडवण्यात/चेष्टा करण्यात घालवली आहेत त्यामुळे हे काही शक्य झाले नाही ... आणि आता याची अपेक्षा न करता नुकतीच लग्नासाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
... देखते है मंजिल कहा ले जाती है ... आणि जेंव्हा माझे लग्न ठरेल तेंव्हाची परिस्थिती कदाचित अशी असेल - I will be another victim of the fatal-attraction towards marriage .
- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m ) ( + ९ १ ९ ९ ६ ० ७ ८ ८ २ ८ ० )
शुक्रवार, १९/११/२०१०
लय भारी
उत्तर द्याहटवा:)
उत्तर द्याहटवाधन्यवाद!