शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०१०

सिक्कीम प्रवास वर्णन - पूर्वतयारी

बरेच दिवस मोठी सहल/ट्रीप झाली नव्हती. त्यामुळे सुमित, सचिन, प्रशांत, आणि इतरांनी भारताच्या ६४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये मोठ्या सहलीची योजना आखली. यांनी जे खात्रीशीरपणे येण्याची शक्यता आहे अशांशी फोनाफोनी करून योजनेबद्दल सांगितले आणि सहलीचे स्थान पक्के केले. वेळ ठरली ती दिवाळीच्या दरम्यानची आणि ठिकाण सिक्कीम.

जेंव्हा ऑगस्टाच्या एंडाला/शेवटाला सिक्कीमला जाण्यासाठीच्या आगगाड्यांच्या वेळापत्रकाचा अभ्यास केला गेला तेंव्हा असे जाणवून आले कि आगगाड्यांच्या वेळा या माहिती आणि तंत्रज्ञान संस्थांमध्ये काम करणाऱ्यांसाठी योग्य नव्हत्या. वेळा होत्या त्या प्रत्येकाच्या नोकरीच्या कामकाजांच्या दिवसांमधील होत्या. जर आगगाडीने जाण्याचे ठरवले असते तर विनाकारण २/३ दिवस वाया जाणार होते आणि सुट्ट्यांचा व्यवस्थित सुउपयोग ही होण्याची शक्यता कमी होती. मग प्रस्ताव ठरला तो विमानाने जाण्याचा. जेंव्हा प्रस्ताव ठरला तेंव्हा आम्ही ६ जण पक्के होतो. ऑगस्टाच्या शेवटाला तिकिटांचे आरक्षण करण्याच्या आदल्या दिवशी राजकारणावर आधारलेल्या चित्रपटांमध्ये बहुमतासाठी कशी सगळीकडे फोनाफोनी केली जाते अगदी तशाच पद्धतीने शेरदिलवासियांना भराभर फोनाफोनी करण्यात आली.

आमची अशी अशी योजना आहे. दिवाळीच्या वेळेस जायचे ठरले आहे. आम्ही एवढे जण आहोत. तू येणार आहेस का? आज संध्याकाळपर्यंत उत्तर कळले पाहिजे. उद्या तिकिटे आरक्षित करायची आहेत.

या फोनाफोनीतून एकच बहुमोल मत मिळाले आणि ते म्हणजे पवारांचे ... बाकीच्यांनी प्रत्येकाच्या अर्धांगिनींना नेता येणार नव्हते म्हणून, आगोदरच ठरलेल्या योजना, आणि काही जबाबदाऱ्या या कारणांमुळे नकार दिला. आणि मग विमानाची सात तिकिटे आरक्षित करण्यात आली.

३१ आक्टोबर २०१० : पुणे - दिल्ली - बागडोगरा (पश्चिम बंगाल)
०६ नोव्हेंबर २०१० : बागडोगरा - दिल्ली - पुणे

फोनाफोनीबद्दल प्रशांत आणि समीर यांचे आभार. तिकीट आरक्षणाबद्दल सुमितचे आभार.

मग पुढे प्रशांत आणि समीरने सहलीच्या नियोजनाची जबाबदारी स्वीकारून माहिती तंत्रज्ञानाच्या मायाजालामध्ये इकडे तिकडे टिचक्या मारत मारत सगळी माहिती गोळा केली, फोनाफोनी केली. आमच्या प्रशांत साहेबांचे सहलीच्या नियाजानामध्ये बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष्य असते. त्यांनी सिक्कीमचा नकाशा मिळवून सर्व चौकशी करून कमीत कमी खर्चामध्ये काय काय पाहता येईल याचा व्यवस्थित अभ्यास करून सहलीचे नियाजन केले आणि आम्हास वेळच्यावेळी त्याबद्दल कळविले. तसे पाहता माझ्यामते प्रशांत आणि समीर सोडून सहलीच्या नियाजनाच्या वेळेस बाकीचे आम्ही निष्क्रियच होतो.

आता या सगळ्यामध्ये कहर म्हणजे मला आणि पवारांना सिक्कीम हे शहर आहे कि राज्य आहे हेदेखील माहित नव्हते. आम्ही दोघे सिक्कीमला शहरच समजत होतो. (तसे पाहता मला भूगोल घंटा येत नाही. १० वी आणि १२ वी ला ३०% पेपर समोरच्याचा बघूनच लिहिला होता. पण त्याच्याबदल्यात त्यांना गणिताचा पेपर दाखवला होता बरं का? नाही तर उगाच मला आणखी एक लेबल लावलं - ठोंब्या आणि फुकट्या म्हणून)

तसेच मला हे हि माहित नव्हते कि विमान बागडोगरापर्यंत आहे म्हणून. मी सगळ्या ओळखीच्यांना आम्ही सिक्कीमला जाणार आहोत. सिक्कीमची राजधानी गंगटोकपर्यंत विमानाने जाणार आहोत आणि तिथून पुढे Travelling Package.
(निर्लज्जं सदा सुखी)

प्रशांत आणि समीर ने तयार केलेले सहलीचे वेळापत्रक आणि अंदाजपत्रक -
DatePlan
31-Oct-2010Travelling from Pune to Gangtok. Stay at Gangtok.
01-Nov-2010Travelling from Gangtok to Lachen. Stay at Lachen.
02-Nov-2010Gurudongmar Lake Point. Travelling from Lachen to Lachung.  
03-Nov-2010Zero Point. Travelling from Lachung to Gangtok.
04-Nov-2010Gangtok Site Seeing.
05-Nov-2010Nathula Point. Back to Gangtok.
06-Nov-2010Travelling from Gangtok to Bagadogara and back to Pune.


DescriptionAmount
Total package  22000 
Hotel Booking (31 and 3)
  3500 
Hotel Booking (4 and 5)
  7500 
To and from Airport Lohgaon Airport 
  2000 
To and from Bagdogra Airport
  3000 
Food
  15000 
Gangtok City Seeing
  1500 
Flight Fair
  57808 
  Total  
  112308  

आमच्या छोटे सरकारांना ऐनवेळी "येणार नाही" म्हणण्याची एक चांगली/घाण सवय आहे. त्यांनी प्रवासाच्या आदल्या दिवशी प्रेमाच्या आणाभाका घेण्यासाठी अहमदनगरला जाण्याचे ठरवले होते. त्यामुळे आम्हाला शंका वाटत होती कि साहेब यावेळीही त्यांच्या नेहमीच्या सवयीनुसार वागणार नाहीत ना? पण तसे काही झाले नाही. ते आमच्या आगोदर मित्राच्या घरी पोहचले होते.
छोटे सरकारांना स्वत:ला त्यांच्या "येणार नाही" या सवयीबद्दल  चांगलीच जाण आहे. म्हणून सिक्कीमला निघायच्या आधी स्वत:कडून  नकारघंटेचा कित्ता पुन्हा एकदा गिरवला जाऊ नये यासाठी त्यांनी रद्द होऊ न शकणारी तिकिटे आरक्षित करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या सल्ल्यानुसार तिकिटे आरक्षित केल्यामुळे आम्हा सर्वांचे प्रत्येकी रु. १००० वाचले.

सुमितला विमानप्रवासाचा भरपूर अनुभव असल्याने आदल्या दिवशी त्याला किती वजनापर्यंत सामान चालते हे विचारण्यासाठी फोन केला तर तो ऑफिसच्या कामासाठी चेन्नईमध्ये होता आणि संध्याकाळी निघणार होता. ढिशक्याव!
(शंका - हा उद्या वेळेवर पोहचेल ना विमानतळावर ... )

मग त्याच्याकडून कळले कि २० किलोपर्यंत सामान चालते आणि ८-१० जीन्स आणि टी-शर्टस घेतले तरी तेवढे वजन होत नाही. "काळजी करू नकोस" हे ऐकल्यावर जरा बरे वाटले कारण मी उगाच थंडीबरोबर वैर नको म्हणून भरपूर गरम कपडे घेणार होतो.

ठरल्याप्रमाणे सिक्कीमला निघण्याच्या आदल्या दिवशी आम्ही सगळेजण विमानतळापासून जवळ राहत असलेल्या मित्रांकडे मुक्कामाला गेलो. उद्याच्याला मध्यरात्री ०४:३० ला उठायचे आहे असे ठरवून आम्ही रात्री साधारण १२:३० - ०१:०० च्या दरम्यान निद्रिस्त झालो.

२/३ आठवड्यांपूर्वी माझ्या ऑफिसमधील एका सहकाऱ्याने मला सिक्कीम प्रवासाबद्दलची सर्व माहिती विचारून घेतली. मी त्याला सिक्कीम प्रवासाचा सर्व इतिवृतांत सांगून झाल्यावर विचारले कि "आप सिक्कीम जाने का सोच रहे हो क्या? कब जानेवाले हो और कौन कौन जानेवाले हो?" ... यावर त्याने उत्तर दिले कि "हनिमून के लिए जाने का सोच रहा हु ..." ... मग न राहवून मी साहेबांना सांगितलं कि "हनिमून के लिए मत जाओ, कुछ कर नहीं पाओगे ... क्योंकि वहा बहुत ठंड है ... अगर घुमने के लिए जाना चाहते हो तो ही जाओ ..."


हम सात साथ है!
सचिन, समीर (छोटे सरकार), संदीप, विवेक (पवार), प्रशांत, सुमित, अमर

गुरुडोंगमार  तलाव

कांचनगंगा शिखर




- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) ( + ९ १ ९ ९ ६ ० ७ ८ ८ २ ८ ० )
गुरुवार, ३०/१२/२०१०

४ टिप्पण्या: