शुक्रवार, २२ जानेवारी, २०१०

मोहिम मृगगड / बेलिवगड

होय नाही होय नाही म्हणता म्हणता मीदेखील तयार झालो नव्या वर्षातील पहिल्या मोहिमेला अर्थात मृगगड मोहिमेला. ठरल्या बेताप्रमाणे शनिवार, १६/०१/२०१० रोजी भल्या पहाटे ०६:०० वाजता विनोदला आकुर्डी वरून उचलून आम्ही (अभिजित, मोहन, रामेश्वर, विनोद, आणि मी) अभिजितच्या चारचाकीतून मोहिमेसाठी निघालो. वाटेत खोपोलीच्या पुढे आम्ही एका साधारण हॉटेलमध्ये नाश्ता केला. बिल पाहिल्यानंतर जरा हलकासा धक्काच बसला (पोहे = रु. २०, चहा = रु. १०). प्रतिचौकशी केल्यानंतर हॉटेलवाल्याकडून महागाई आणि चहा स्पेशल दिला ना असे उत्तर मिळाले.

जवळजवळ दीड वर्षांनी आमच्याबरोबर मोहिमेसाठी आल्याबद्दल विनोदचा हार, टॉवेल, आणि श्रीफळ देऊन जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ आणि शालीच्या ऐवजी हार आणि टॉवेल देण्याचे कारण हॉटेलवाल्या काकांनी अप्रत्यक्षपणे बिलाच्या रूपातून दाखवूनच दिले होते. आम्हीही महागाईच्या नावाखाली डाव साधला.

नाश्ता केलेल्या हॉटेलजवळ
मृगगडाच्या पायथ्याजवळ

विनोद साहेबांचा सत्कार करून आम्ही हॉटेलमधून पुढे निघालो. प्रवासामध्ये ऑफिसमधील गप्पागोष्टी चालू असताना वाटेमध्ये एका वळणावर एक दुचाकी रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे घसरलेली दिसल्यामुळे आम्ही तिथे थांबलो. दुचाकीवरील दोघांना थोडे खरचटले होते. मोहनने त्यांचा propper प्रथमोपचार केला आणि आम्ही बाकीच्यांनी पुढे आणखी अपघात होऊ नयेत म्हणून ऑइल सांडलेल्या जागेवर माती टाकली. मग वाढत्या ऊन्हाबरोबर आम्ही जांभूळपाडा गावाचा रस्ता धरला. जांभूळपाडापासून वाटेतील गावकऱ्यांना विचारीत विचारीत बेलिव गाठले (रस्त्यावर माहितीदर्शक पाट्या/फलक नाहीयेत - :( ... पुढील पंचवार्षिक योजनेत याचा विचार करण्यात येईल अशी अपेक्षा. ).

साधारण सकाळचे १०:१५ - १०:३०  झालेले असताना आम्ही बेलिव गावात पोहचलो. चारचाकी सावलीला लाऊन आम्ही गडावर चढाई करण्यास निघालो. प्रथमदर्शनी लांबून पाहताना गड खूपच साधारण वाटत होता पण जेंव्हा आम्ही गडाच्या शेवटच्या टप्प्यात पोहचलो तेंव्हा हा गड काय आहे ते आम्हाला जाणवले.

बेलिव गाव
मृगगड / बेलिवगड

गडाकडे वाटचाल करीत असताना तिथल्या गावकऱ्यांनी शाळेतील एखाद्या मुलाला घेऊन जा, तो व्यवस्थित वाट दाखवील असा सल्ला दिला. पण मुलांची शाळा सुटायला आणखी १५-२० मिनिटे होती तसेच आमच्यातील काही जणांचा असा अट्टाहास होता कि आपले आपण जायचे. मग स्वत: स्वत:च जायचे असे ठरवून आमची स्वारी पुढे निघाली. पण थोडेसे पुढे गेल्यावर योगायोगे आम्हाला शेळ्या हाकणारा पांडुरंग वाटेकरूच्या रुपात भेटला. त्याने आम्हाला गडावर जाण्याची वाटही दाखवली आणि शेवटी तोही आमच्याबरोबर गडावर येण्यास तयार झाला. आईशपथ सांगतो जर तो आमच्याबरोबर आला नसता तर कदाचित आम्ही गडाचा शेवटचा टप्पा सर करण्याचा विचार ही केला नसता. थोडेसे पुढे गेल्यानंतर आम्हाला गुहेसारखे एक मध्यम आकाराचे भोक दिसले. पांडुरंगाला हे काय विचारले असता त्याने माहित नाही, तिथे जाऊ नकात असे उत्तर दिले. पण माझी, अभिजित, आणि विनोदची उस्तुकता शिगेला पोहचली होती म्हणून आम्ही त्या भोकात काय आहे हे पाहण्याचे ठरवले आणि भोकात थोडेसे घाबरत घाबरतच प्रवेश केला. ते भोक उलट्या "L" च्या आकाराप्रमाणे होते आणि खूप लांबपर्यंत होते. त्याच्या पुढे एक खड्डा होता आणि त्याच्याही पुढे डाव्या बाजूला आणखी एक भोक जोडले होते. आम्ही उलट्या "L" पर्यंत मजल मारली आणि माघार घेऊन परत भोकाच्या बाहेर आलो.

पांडुरंग - आमचा वाटेकरी
उस्तुकता वाढवलेले गुहेसारखे भोक

मला अजूनही आपण विशेष काही चढाई केलेली नाहीये असे वाटत असल्यामुळे मी दुसऱ्या वाटेने जाण्याचे ठरविले आणि मी दुसऱ्या वाटेने पुढे निघालो. बाकीचे चौघे वाटेकरी सांगतोय त्या मार्गाने निघाले. खाली उतरताना ही वाट मी ज्या वाटेने वर आलो होतो त्या वाटेपेक्षा जरा बिकट होती हे जाणवले. फरक इतकाच कि मी ज्या वाटेने वरती आलो होतो ती वाट खूपच घसरडी होती.

दुसऱ्या वाटेने मी आगोदर पोहचलो. पुढे बघतो तर काय, भले मोठे कातळ. ते कातळ पाहून मी तर पार टरकून गेलो होतो. मला असे वाटून गेले कि झक्क मारली आणि या वाटेने आलो मी. बाकीचे दुसऱ्या वाटेने व्यवस्थित पोहचतील आणि मला जमले तर या अवघड वाटेने जावे लागेल, नाही तर परत खाली उतरून बाकीचे ज्या वाटेने गेले त्या वाटेने गेले त्या वाटेने जावे लागेल. पण मी आलेल्या वाटेने परत खाली उतरणे जरा धोकादायकच होते. खरे सांगायचे तर मी त्या काही सेकंदातील माझे टरकलेपण शब्दात सांगू शकत नाही. त्या टरकलेल्या अवस्थेत मी आता या कातळावरून गड कसा सर करायचा याचा विचार करायला सुरुवात केली. लांबून पाहताना या कातळावर ३ टप्प्यात खूप छोट्या पायऱ्या आहेत आणि हे पायऱ्यांचे ३ टप्पे एकमेकांना जोडलेले नाहीयेत असे जाणवत होते. मी पायऱ्यांच्या एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर कसे जायचे याचा विचार/हिशोब करीत होतो. या कातळावर सगळ्यात शेवटचा भाग चढायला खूप अवघड वाटत होता कारण लांबून तिथे आधारासाठी काही आहे हे दिसून येत नव्हते. आणि या सगळ्यात कहर म्हणजे वारे भयानक वेगात वाहत होते. मला अशी शंका वाटत होती कि आपण या वाऱ्यासमोर किमान पायऱ्यांचा एखादा टप्पा तरी पार करू शकू कि नाही. माझ्या मनात असे विचारांचे काहूर माझलेले असताना आमचा वाटेकरू मला समोर दिसला आणि माझ्या जीवात जीव आला. मला सगळ्यात जास्ती आनंद याचा झाला कि आम्ही सगळे वेगळ्या वाटेने का होईना एका ठिकाणी आलो. मग मी आमच्या वाटेकरूशी कातळ सर करण्याविषयी चर्चा केली. त्याने घाबरण्याची काही गरज नाही, वरपर्यंत व्यवस्थित वाट आहे, फक्त छोट्या पायऱ्या आहेत असे सांगितले. मी बाकीचे वर पोहचण्याची वाट पाहत होतो तोपर्यंत पठ्ठे बापूराव वाटेकरी कातळ सर करण्यासाठी केंव्हाच निघाले होते आणि काही मिनिटात साहेब वरपर्यंत पोहचलेही. वाटेकरू वर पोहचल्या नंतर मी ही वर निघालो. वाटेकरू त्याच वाटेवरून व्यवस्थित गेला असल्याने चढत असताना काहीही भीती वाटली नाही. मी गडावर जाऊन परत कातळावरील अर्ध्या वाटेत येऊन आजूबाजूचे डोंगर पाहत उभा राहिलो. थोड्या वेळाने माझे उरलेले सर्व सवंगडीदेखील वर आले. मग आम्ही आमच्या वाटेकरूला निरोप दिला आणि गड पाहण्यासाठी प्रस्थान केले.कातळ सर करण्याच्या नादात पांडुरंगाबरोबर फोटो काढण्याचे राहूनच गेले. जर पांडुरंग वाटेकरू आमच्याबरोबर नसता तर आम्ही गड सर करण्याचा विचार केला असता कि नाही हे मात्र मी सांगू शकत नाही.

त्रिवार धन्यवाद पांडुरंग!!!




वरती गेल्यावर आम्ही आजूबाजूचा निसर्ग डोळे भरून पाहून घेतला. या बाजूने खाली जाता येते का, त्या बाजूने जाता येते का, या बाजूला काय आहे, तो गड हाच आहे, नाही नाही तो गड तर, वगैरे वगैरे यावर चर्चा केली. तसे पाहता गडावर पाण्याचे टाके व्यतिरिक्त पाहण्यासारखे काहीही नाहीये. काही झाडे आहेत. यावरून असे दिसून येते कि या गडाचा वापर कदाचित टेहळणीसाठी केला जायचा. वरती आम्ही काही फोटो काढले, जेवण केले, थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मग परतीच्या मार्गाला लागलो. एकमेकांना सांभाळत आम्ही कातळ व्यवस्थितपणे उतरलो. अभिजित ने आम्ही कातळ उतरताणाचे व्हिडीओ शुटींग केले.

विनोद, अभिजित, अमर, आणि मोहन
राम

कातळ उतरल्यानंतर अभिजित, विनोद, आणि मी कातळाच्या डाव्या बाजूस असलेले पाण्याचे टाके बघून आलो.



मग आम्ही निवांतपणे गडाच्या पायथ्याशी आलो. बेलिववरून आम्ही एक धरण पाहायला गेलो (नाव आठवत नाहीये - :( ). धरणाकडे जात असताना वाटेत एका दुकानावर "पुराची रेषा" असे लिहिलेले पाहिले. हे काय आहे हे विचारले असता आमचे माहितीगार मोहन यांनी आम्हाला त्याची propper माहिती दिली. १९९७ मध्ये हा पूर्ण परिसर/गाव पाण्याखाली गेला होता आणि त्यावेळेस त्या रेषेपर्यंत पुराचे पाणी आले होते.

धरणाच्या पाण्यावरून कुणाचा दगड जास्ती टप्पे घेऊन लांब जातो हा खेळ खेळत काही वेळ खालवला, मग थोडा वेळ गप्पा मारून पुण्याकडे प्रस्थान ...



या मोहिमेमधील अनुभवावरून ठरवलेल्या काही गोष्टी अथवा सूचना / सल्ले =>
१. कोणत्याही गडाला कमी लेखू नका (Don't underestimate any FORT)
२. गडाची व्यवस्थित माहीती नसल्यास एखादा वाटेकरू बरोबर घ्या.
३. जवळ एखादा  टॉर्चं (Torch / Battery ) ठेवा.
४. प्रथमोपचाराचे (First  Aid  Box ) साहित्य जवळ ठेवा.


मार्ग => पुणे –> खोपोली –> जांभूळपाडा –> बेलिव

अंतर => ~ १२० कि.मी.
परिसर => रायगड, सुधागड तालुका



गड सर करताना काढलेले आणखी काही फोटो -





पुढची मोहीम => कळसुबाई शिखर आणि आजोबा गड (३० आणि ३१ जानेवारी) ...

धन्यवाद!!!

४ टिप्पण्या: